पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड डोलवी कंपनीने गडब परिसरातील जमिनी अल्प मोबदल्यात खरेदी केल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच पहिल्याच पावसात गावाच्या पलीकडे असणाऱ्या घरांना पावसाच्या पाण्याचा वेढा बसल्याने गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. त्यातच रात्रीची वेळ असल्याने कुठे जायचे? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जे एसडब्ल्यू कंपनीने पाणी जाण्याचा निचरा न केल्याने गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील ठरावीक लोकांना ठेका दिल्याने जी बांध बंदिस्ती बांधली आहे, त्यामुळे नाल्याचा आकार अरुंद झाला आहे. त्यातच पाणी जाण्यासाठी मार्ग न राहिल्याने संपूर्ण पाणी गावाकडे फेकले जाते. परिणामी पावसामुळे गावात मोठा पूर आल्याचा भास होतो. त्यामुळे लोकांना कंपनीकडे गाऱ्हाणे मांडण्याशिवाय पर्याय उरत नाही.
खारमाचेला गावातील निम्म्यापेक्षा जास्त जमिनी अल्प दरात खरेदी केल्याने राहिलेल्या जमिनींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे. शेतात वाढणाऱ्या मँग्रोमच्या झाडांमुळे कंपनीला जमीन विकण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कंपनी वेळोवेळी आपली कटू नीती शेतकऱ्यांना दाखवते आणि त्याला हा गरीब शेतकरी बळी पडतो. त्यामुळे गडब गावाला पुराचा धोका संभवतो. काही वर्षांनी कंपनीमुळे गडब गाव उठवण्याची वेळ नाकारता येत नाही.