Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमहाराष्ट्राची कप वुमन - सीमा खंडाळे

महाराष्ट्राची कप वुमन – सीमा खंडाळे

अर्चना सोंडे

समाजात आज देखील काही विषय असे आहेत, ज्याची उघडपणे चर्चा होणे निषिद्ध मानले जाते. जर हा विषय महिलांसोबत निगडित असेल मग तर विचारूच नका. असाच एक महिलांच्या आयुष्याशी निगडित असलेला विषय म्हणजे मासिक पाळी आणि या वेळी वापरले जाणारे शास्वत पर्याय. खरंतर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. स्त्रीच्या आयुष्याचा आहे. मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. अगदी शहरी भागातील स्त्रिया देखील या विषयावर मोकळेपणाने बोलत नाही. ग्रामीण भागात तर परिस्थिती आणखी भयावह आहे.

आपल्या समाजसेवा शाखेच्या पदव्युत्तर पदवीचा खरा उपयोग केला. मासिक पाळीच्या वेळी वापरण्यात येणारा कप डिझाईन करून महिलांना उपलब्ध करून दिले. खऱ्या अर्थाने ती ‘महाराष्ट्राची कप वुमन’ आहे. ही कप वुमन म्हणजे ऋतू एंटरप्राईजेसच्या संचालिका सीमा खंडाळे. धुळ्याच्या परदेशी कुटुंबात सीमाचा जन्म झाला. सीमाचे वडील, शिवराम परदेशी हे धुळे येथील नूतन हायस्कूल येथे प्राचार्य होते. तर आईचं स्वत:चं सरकारमान्य रेशन दुकान होतं. सीमाने शालेय शिक्षण, धुळ्यातील कानोसा हायस्कूलमध्ये, कमलाबाई शाळेतून, तसेच मुंबईतील आदर्श विद्यालय येथून केले.

धुळ्याच्या एका नामांकित महाविद्यालयातून तिने वनस्पतीशास्त्र हा विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी संपादन केली. बीएस्सी करण्याचा हेतू एकच होता की स्वत:ची नर्सरी सुरू करणे. तिला १० ते ५ अशा नोकरीच्या चौकटीत कधीच अडकायचं नव्हतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जितेंद्र खंडाळे यांच्याशी विवाह झाला. जितेंद्र हे एमएसईबीमध्ये कार्यकारी अभियंता आहेत. शासकीय नोकरी असल्याने विविध ठिकाणी बदल्या होत गेल्या. दरम्यान सीमाला दोन मुलं झाली. तेजस आणि कुणाल. आपल्या या दोन्ही मुलांच्या संगोपनास सीमाने प्राधान्य दिले. जरी जितेंद्र विविध ठिकाणी बदली होऊन जात होते. तरी सीमा आपल्या दोन मुलांसह भुसावळच्या एमएसईबीची वसाहत असलेल्या दीपनगरमध्ये तब्बल १७ वर्षे राहिली. दोन्ही मुले सीबीएसई मंडळाच्या शाळेत शिकू लागली. मुले मोठी होत होती. आपण देखील आपले मास्टर्सचे स्वप्न पूर्ण करावे, असं सीमाला वाटू लागलं. तिने दूरस्थ शिक्षण प्रणालीद्वारे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात समाजसेवा विषयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासाकरता २०१३/१४ मध्ये प्रवेश घेतला. तब्बल वीस वर्षांनंतर सीमा पुन्हा अभ्यास करू लागली. जिद्दीने तिने पहिल्याच प्रयत्नात दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि समाजसेवेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. प्लास्टिक हे मनुष्यजातीसाठी घातक आहे. त्यावर निर्बंध आणणे आवश्यक आहे. पण ते आपल्या हातात नाही. मात्र काही अंशी आपण प्लास्टिक वापरास प्रतिबंध करू शकतो. हे ध्यानात आल्यावर २०१५ पासून सीमा जुन्या साड्यांपासून पिशव्या तयार करू लागली. या कापडी पिशव्या ती मोफत वाटू लागली. ‘नो प्लास्टिक’ मोहिमेस चांगलाच प्रतिसाद मिळत होता. दरम्यान एका संवेदनशील विषयाकडे सीमाचं लक्ष गेलं. तो विषय होता मासिक पाळीच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचे सॅनिटरी पॅडला असलेला शाश्वत पर्याय, मेंस्ट्रुअल कप, ज्याला सीमाने एक मराठी नाव दिले, ऋतू कप! स्वतः अनुभवले आणि आपला अनुभव इतरांना सांगितला, सीमाला जाणवलं की, या विषयासंदर्भात अनेक समज-गैरसमज समाजात प्रचलित आहेत. ते गैरसमज दूर करून जनसामान्यांमध्ये याविषयी जागृती व्हावी या विचाराने सीमाने मोफत व्याख्याने देण्यास सुरुवात केली. समाजातील काही सद्गृहस्थांसोबत, सीमाने, स्वस्त, आरोग्यास योग्य, मेड इन इंडिया (महाराष्ट्र) असा एक मेंस्ट्रुअल कप डिझाईन करण्याचा प्रयत्न केला. आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये हा कप ऋतू कप या नावाने बाजारात आणला. इतर कंपन्यांचे कप बाजारात उपलब्ध होते पण ते कप तुलनेत महाग होते. सीमाने ५०% दराने कमी असा हा कप बाजारात आणला.

किमान ८-१० वर्षे या कपाला काही होणार नाही. मेडिकली ग्राडेड सिलिकॉनचा, लॅब टेस्टिंग केलेल्या मटेरियलचा असल्यामुळे कुठलाही संसर्ग होणार नाही. तसेच हा कप वापरताना आपण कुठलाही कचरा करीत नाही, म्हणजेच पर्यावरणही स्वच्छ ठेवू शकतो. एक कप बरीच वर्ष वापरीत असल्यामुळं आर्थिक खर्चही वाचतो. असे विविध फायदे कपमुळे झाले. या ऋतू कपला चांगलीच मागणी वाढली.आपल्या समाजात असा एक वर्ग देखील होता ज्याला हा कप परवडणारा नव्हता. किंवा मनात थोडा बाऊ असतो, तसेच पाळीच्या वाटेवर नुकतेच पाऊल ठेवलेल्या कुमारिका मुलींसाठी, दुसरा शाश्वत पर्याय, (जे आपल्या आजी व आई यांनी वापरला आहे, असा कापडी पर्याय, कापडी पॅड्स, नव्या स्वरूपात वापरण्यास प्रोत्साहित केले. लिकप्रूफ कपडा वापरून नवीन पद्धतीचे छानसे कापडी पॅड बनविणे.) तसेच ते स्वतःसाठी कसे बनविणे हे शिकविणे त्या आनंदाने करतात. अशाप्रकारे विविध मार्गांनी पर्यावरण पूरक भूमिका त्या मांडू लागल्या.

ऋतू एन्टरप्राईजेसच्या माध्यमातून सीमा खंडाळे आपले उत्पादन गरजूंपर्यंत पोहोचवू लागल्या. ऑनलाइन पद्धतीने अॅमेझॉनवरसुद्धा कप उपलब्ध होऊ लागले. तसेच सीमा खंडाळे या मासिक पाळीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या शाश्वत पर्यायांविषयी जनजागृती मोहीम राबवू लागल्या. आपल्या अशय सोशल ग्रुप संस्थेतर्फे अशा मोफत कार्यशाळेचे आयोजन देशात सर्वत्र त्या करू लागल्या. अल्पावधीत त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यामध्ये ‘सोशल अचिव्हर’, ‘बहिणाबाई पुरस्कार’, ‘तरुणाई पुरस्कार’, आदी पुरस्कारांचा समावेश आहे. भविष्यात हे काम वैश्विक स्वरूपात करण्याचे सीमा खंडाळे यांचे उद्दिष्ट आहे. मासिक पाळी या संवेदनशील विषयाला हात घालून निव्वळ समस्या न मांडता उपायाचा शोध घेऊन तो तळागाळातील महिलांपर्यंत नेणे हे कठीण कार्य आहे. हे कार्य सहज पद्धतीने तडीस नेणाऱ्या ॠतू इंटरप्रायजेसच्या ऋतू कपच्या प्रणेत्या सीमा खंडाळे खऱ्या अर्थाने कप वुमन आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -