डॉ. वीणा सानेकर
आपल्याकडे बालरंगभूमीची चांगली परंपरा आहे. विजय तेंडुलकर, सई परांजपे, रत्नाकर मतकरी, सुलभा देशपांडे असे दिग्गज लेखक – कलावंत बालरंगभूमीवर रमले. कुणी बालप्रेक्षकांकरता लेखन केले, कुणी अभिनय तर कुणी नाट्यदिग्दर्शन. बालरंगभूमीचा विकास व्हायला हवा नि ही चळवळ सर्वत्र फोफावायला हवी ही आस या सर्वांनी कायम जिवंत ठेवली. राजाराणीला घाम हवा, दुर्गा झाली गौरी, निम्मा शिम्मा राक्षस यांसारख्या बालनाट्यांनी प्रचंड दाद मिळवली. घाम म्हणजे काय, घामाला कुठला रंग असतो, हे ठाऊक नसलेले राजा-राणी घाम शोधायला निघतात, हे पाहताना परिश्रम म्हणजे काय, हे बालमनांवर सहज ठसते.
अहंकारी दुर्गेचा विनम्र गौरीपर्यंतचा प्रवास ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकाने किती देखणेपणाने उभा केला. आविष्कारच्या ‘चंद्रशाले’ने साकारलेले हे बालनाट्य मोठ्यांच्या मनावर देखील मोहिनी घालून गेले. बालनाट्य मुलांना काय देऊ शकते, याचे मूल्यमापन जर केले तर अनेक मुद्दे समोर येतात. बालनाट्य मुलांना आत्मविश्वास देते. त्यांना व्यक्त होण्याकरता व्यासपीठ देते. त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास करते. त्यांना विचार करायला प्रवृत्त करते. भाषेची जडणघडण करते. त्यांना भरभरून हसवते. हसता हसता अंतर्मुख करते आणि जीवनाचं तत्त्वज्ञान सहज शिकवून जाते.
परीकथा, साहसकथा, लोककथा यांच्यावर आधारित बालनाट्ये मुलांना आवडतातच तसेच मुलांचे समकालीन विषय त्यांना गुंतवून ठेवतात. मुख्य म्हणजे भाषेशी निगडित विविध अनुभव बालनाट्य मुलांना देते. पात्रांची शैली, बोलण्याच्या लकबी, बालनाट्यांमधली गाणी व त्या आनुषंगाने येणारी नादमयता या सर्वांतून मुलांवर जो ठसा उमटतो, तो त्यांना समृद्ध करतो.
प्रेक्षक म्हणून बालनाट्य पाहणे आणि कलावंत म्हणून बालनाट्यात काम करणे या दोन्ही अंगांनी बालनाट्य मुलांना खूप काही देते. जितका वेळ मुले ते पाहतात तितका वेळ त्या विषयात ती गुंतून राहतात नि नाटक संपले तरी त्यातले एखादे पात्र व त्याचे आवडलेले वाक्य किंवा गाण्यांच्या ओळी मुले गुणगुणत राहतात. शब्द व त्यांची गुंफण त्यांना अधिक जवळून अनुभवता येते.
कलावंत म्हणून काम करताना मुलांची तालीम सत्रे फारच रंगतात. या तालीम नाट्यशिबिरांमध्ये मुले नाटक रचतात. संवाद लिहितात. कल्पना रंगवतात. त्या कल्पना मांडायला शब्द निवडतात. एकमेकांच्या वाक्यांना प्रतिसाद देताना नवीन वाक्ये निर्माण करतात. हळूहळू सर्वांसमोर बोलण्याची मुलांची भीती कमी होते. सभाधीटपणा वाढतो.
मुलांच्या शाळांच्या सुट्ट्यांमधील बालनाट्य शिबिरांमध्ये मुलांना पाठवण्याकरता पालक पूर्वी उत्सुक असायचे, पण काळाच्या पटावर बरेच बदल झाले. मुलांना शिबिरांना नेण्याकरता नि आणण्याकरता पालकांना वेळ मिळेना. मुलांच्याही आवडी-निवडी बदलल्या. शिक्षणाचे माध्यम बऱ्याच घरांमध्ये इंग्रजी झाल्यामुळे मराठी बालनाट्यांचे आकर्षण वाटेनासे झाले. मुलांच्या मनोरंजनाच्या कल्पना बदलल्या. मोबाइलमधल्या गेम्समध्ये ती अधिक रमू लागली.
या सर्वांचे दूरगामी परिणाम मुलांवर झाले. मोबाइलमध्ये गुरफटलेली मुले घुमी झाली. त्यांची भाषा योजण्याची क्षमता क्षीण होऊ लागली. परस्पर संवादातल्या आनंदाला ती मुकू लागली. बालनाट्य मुलांना बोलते तर करतेच पण अर्थपूर्ण संवादाच्या शक्यता वाढवते.
मुलांच्या वाढीकरता संवादाचे आदानप्रदान हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. खेळीमेळीच्या वातावरणात मुले बालनाट्याच्या तालमीत गाणी रचतात, नृत्य करतात, प्रकाश, नेपथ्य, संगीत असे विविध घटक समजून घेतात. कुणी एखादे वाक्य विसरला, तर त्याचवेळी तो क्षण कसा सावरून घ्यायचा हेही शिकतात. लाज वाटणे, भीती, न्यूनगंड, दडपण या घटकांवर मात करायला शिकतात.
दृश्य कसे उभे करायचे, प्रसंग कसा रचायचा, विनोद कसा निर्माण करायचा हे तालमीतून मुलांना कळत जाते. राग, क्रोध, ममता, प्रेम, मत्सर, चिडचिड, अशा भावभावना व्यक्त करताना कोणते शब्द योजायचे याचे आकलन बालनाट्यातून होते. अलीकडच्या काळात माणसांचा तटस्थपणा वाढत चालला आहे. जो तो आपल्याच जगात रममाण झालेला दिसतो. नव्या पिढीला तर आपापल्या कोषात बंद राहण्याची सवय जडते आहे. अशावेळी बालनाट्य मुलांना मोकळेपणाने व्यक्त व्हायला शिकवते. त्यातून संवादाचा पूल सहजच बांधला जातो. भाषानुभवांची ही पुंजी मुलांना आयुष्यभर पुरते.