Saturday, October 5, 2024

पाऊस

डॉ. मिलिंद घारपुरे

मस्त तुफान कोसळणारा पाऊस!!! छान तुडुंब चमचमीत झालेले जेवण. सोलकढी पापड खिचडी किवा आंबट वरण भात. (सामिष लोकांनी तत्सम कालवण गृहीत धरावे). भिजलेल्या मुंबईच्या बातम्या बघत तनामनाने पाऊस झेलत रहा. खिडक्यांचे पडदे लावा. बाहेर अंधार, आत गुडूप अंधार. कोसळणाऱ्या पावसाच्या आवाज!!! एकदम ट्रान्समध्ये नेणारा. पत्र्यावरचा, फांद्यांवरचा, रस्त्यावरचा, पानातून ठिबकणाऱ्या थेंबांचा मध्येच गडगडाट. सात वेगळे सूर मिळून एक राग तयार व्हावा तसा. एखाद्या सराईत गायकाने आपल्या सफाईदार गळ्यातून दैवी तान घ्यावी किंवा खूप काळ “सा” लावून धरावा अगदी तसा,

…एखादा छानसा पिक्चरही चालेल किंवा मऊमऊ दुलई गळ्यापर्यंत ताणून ओढून घेऊन तो पावसाचा गांधार ऐकत झोपून जा…

…आता उठा, पण जागे होऊ नका. दुलईत गुरफटून घेऊन अजून थोडा वेळ लोळा… खरे जागे व्हाल तुम्ही, ते मस्त

कडक आल्याचा चहाचा दरवळण्याने… गरम गरम कुरकुरीत कांदा भजी…

तना मनाने निवांत पसरत मंद आवाजात गारवा ऐका. उगाचच कुठल्यातरी जुन्या आठवणी काढा. बघ माझी आठवण येते का वगैरे (मनातल्या मनात बरं) असं म्हणा. भूतकाळात जा, खुदकन मनात अगदी मनापासून खदखदून हसा एखाद्या खोडकर मुलासारखं. अगदीच काही जमलं नाही, तर कुठल्यातरी ट्रिपचा पावसाळी शाब्दिक प्लॅन बनवा… फोन हातात घ्या “साल्या (इतक्या सभ्य शब्दात नाही) आहेस कुठे? म्हणून दोन-तीन मित्रांना झोपेतून उठवा निरर्थक चावट बोला.

आता बायकोला कांदेपोहे हवेत, अशी विनंतीवजा ऑर्डर द्या, कोथिंबीर आणि लिंबू मारके. फोडणीतल्या करकरीत कांद्या-लिंबाचा आस्वाद घेत अजून एक वाफाळत्या चहाचा घोट घ्या…

निथळणारी कर्दमलेली चिंब संध्याकाळ बघत जसराजचा “बरखा ऋतू, आयी ऋतू आयी” असे म्हणणारा आणि तितकाच चिंब भिजलेला मेघ मल्हार ऐका… येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी, बघा काही जाणवतेय का!!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -