संपूर्ण जगावर भीषण संकट म्हणून अचानक आलेल्या कोरोना महामारीने सर्वांनाच वेठीस धरले होते. या महामारीला रोखण्यासाठीची उपाययोजना, त्यापासून तत्काळ सुटका मिळण्यासाठीचे औषधोपचार कोणते याबाबत सारेचजण अनभिज्ञ असताना या महामारीला आळा घालण्यासाठी लसमात्रा शोधून काढण्याबाबत संशोधन आणि उत्पादन सुरू करण्याचे आदेश केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दिले. ही फार मोठी मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आणि त्याला चांगल्या प्रमाणात यश आले. पहिली लाट अधिक पसरू नये म्हणून लॉकडाऊनसारखे कटू पण तितकेच महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारने घेतले. नंतर आलेली दुसरी लाट मात्र जास्त घातक ठरली. या लाटेने अनेकजणांचा बळी घेतला. पण तोपर्यंत देशात हाती घेण्यात आलेली लसीकरणाची मोहीम केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या मदतीने यशस्वी केली. देशात जास्तीत-जास्त लोकांचे लसीकरण झाल्याने त्यांची प्रतिकारशक्ती वाढली आणि त्यानंतर देशभरातील कोरोना राग्णांची संख्या हळूहळू आटोक्यात येऊ लागली.
पण त्यानंतर चीनमध्ये व युरोप, अमेरिकेत काेरोनाचे नवे व्हेरिएंट आले आणि त्यांचीही दहशत सुरू झाली. पण आपल्या देशात नागरिकांचे लसीकरण झालेले असल्याने त्याचा परिणाम जाणवला नाही. दिल्लीसह देशाच्या काही भागांत कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, प्रतिबंधक लसीचा संरक्षक डोस घेण्याला मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद चिंताजनक होता व ही बाब लक्षात घेऊन लसीच्या पहिल्या दोन डोससाठी राबविण्यात आलेली मोहीम यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आता बूस्टर डोसबाबत दिसत असलेल्या निरुत्साहाची कारणे शोधण्यात आली. कोविडची साथ सुरू होऊन दोन वर्षे लोटली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत साथरोगाची मोठी दहशत होती. विशेषत: दुसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने वाढत होता, रुग्णालये अपुरी पडत होती, औषधांपासून ऑक्सिजनपर्यंत अनेक गोष्टींची कमतरता होती. याच काळात कोविडमृत्यूंची संख्या सर्वांत जास्त झाली. कोविडची दहशत याच काळात निर्माण झाली. रुग्णालये सज्ज ठेवण्यात आणि रुग्णांना आवश्यक उपचार सुविधा देण्यात केंद्र आणि राज्य सरकारला मोठे अपयश आले. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आणि विलक्षण वेगाने ती राबविण्यात आली.
साथीची तीव्रता कमी होऊ लागल्यावर लसीकरणाचा वेग काहीसा मंदावला; परंतु तोपर्यंत बहुतेकांना दोन्ही डोस मिळाले होते. बारा ते अठरा वर्षे या कुमारवयीन गटाच्या लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत देशात लसीचे १.८८ अब्ज डोस दिले गेले आहेत. बरोबर वर्षभरापूर्वीच्या परिस्थितीशी तुलना करता ही कामगिरी समाधानकारक म्हणावी लागेल. मात्र कोविडचा धोका अद्याप टळला नसल्याने आणि तिसरा संरक्षण डोस घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असल्याने, त्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे व तरच कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांचा प्रतिकार करता येईल, ही बाब अधोरेखित झाली. प्रतिबंधक लसीचे पहिले दोन्ही डोस केंद्र सरकारतर्फे सर्वांना मोफत देण्यात आले.
तिसऱ्या डोसबाबत ही स्थिती नाही. आरोग्य कर्मचारी, पोलीस आदी कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक यांना सरकारी रुग्णालयांत तिसरा डोस मोफत देण्यात येत होता. मात्र १८ ते ५९ या वयोगटातील लोकांसाठी खासगी रुग्णालयात तिसरा डोस सशुल्क होता. दुसरा डोस घेऊन ३९ आठवडे झालेली व्यक्ती संरक्षक डोस घेण्याला पात्र आहे. त्यासाठीचे लसीकरण सुरू होऊन दोन आठवडे झाले, तरी पात्र असणाऱ्या बहुतेकांनी त्याकडे पाठ फिरवलेली दिसली. राज्यात केवळ ७५ हजारजणांनी हा डोस घेतलेला दिसला. प्रतिबंधक लसीबाबत जागरूकता असलेल्या ठिकाणी, म्हणजेच महानगरांतही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प होते. मुंबईत, पुणे, ठाणे या ठिकाणी तिसरा डोस घेतलेल्यांची संख्या दहा हजारांच्या वर होती. बहुतांश नागरिकांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत. मात्र अनेकांनी बूस्टर डोसकडे मात्र पाठ फिरवली आहे. आपला भारत देश सध्या ७५वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे व देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती देताना १५ जुलैपासून पुढील ७५ दिवस बूस्टर डोसची मोहीम राबवण्यात येईल, असे सांगितले.
आतापर्यंत देशात लसीचे १९९ कोटी डोस देण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस मोफत असल्याने बहुतांश नागरिकांनी ते वेळेवर घेतले. मात्र बूस्टर डोस आतापर्यंत मोफत नव्हता. त्यामुळे अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली असल्याचे सरकारच्या पाहणीत आढळून आले. आता लोकांमध्ये जागरूकता वाढावी आणि त्यांनी बूस्टर डोस घेण्यासाठी स्वत:हून पुढे यावे यासाठी सरकारने ७५ दिवस बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने बूस्टर डोस घेण्याचा कालावधीदेखील कमी केला. आधी दोन डोस घेतल्यानंतर ९ महिन्यांनंतर बूस्टर डोस घेण्याची परवानगी होती. मात्र आता हा अवधी ६ महिन्यांवर आणण्यात आला आहे. देशात आतापर्यंत १८ ते ५९ वयोगटातील ७७ कोटी लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे. हा आकडा वाढवण्यासाठी सरकारने विशेष अभियान हाती घेतले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी मास्कची सक्तीही रद्द केली आहे. कोरोना संपला, अशी भावना यातून निर्माण झाली असून, त्यामुळेही बूस्टर डोस व लसीकरणाबाबत उदासीनता दिसत होती. मात्र कोविडचा धोका अद्याप कायम आहे. चौथ्या लाटेची भीती न बाळगता, सर्व प्रतिबंधक उपाययोजनांसह आणि रुग्णालयांच्या सज्जतेसह तिला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. सुरक्षित वावर, मास्क आणि हातांची स्वच्छता ही त्रिसूत्री लक्षात ठेवावी लागेल. संसर्गाचा धोका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करून या संधीचा लाभ घेऊन ही मोहीम यशस्वी करणे, हे सर्वांचे आद्य कर्तव्यच आहे.