विलास खानोलकर
गुरुर्ब्रम्हां गुरर्विष्णु गुरुदेवो महेश्वर।।
गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नम।।
आषाडी पौर्णिमेनिमित्त, गुरुपौर्णिमेसाठी शिर्डीत साईनाथ उत्सव तीन दिवस मोठ्या धामधुमीत साजरा होतो. लाखो भक्त साईंच्या आशीर्वादासाठी शिर्डीत दाखल होतात. जशा पंढरपूरला वारकरी दिंडी घेऊन जातात तसेच साईनाथांचे भक्त निरनिराळ्या ठिकाणाहून पालख्या घेऊन शिर्डीला येतात. संपूर्ण शिर्डी साईसंस्थानाच्या मंदिराला फुलांची आरास व विद्युत रोषणाई सुंदररीत्या केलेली असते. साईबाबांची पोथी, प्रतिमा, वीणा, पादुका यांची पालखीतून मिरवणूक निघते. श्रींचे समाधी मंदिर ते द्वारकामाईपर्यंत वाजत गाजत रथातून मिरवणूक निघते नंतर पुन्हा गांवातून श्रींच्या रथांची प्रतिमेसह बँडबाजासह लेझिम चिपळ्यासह मिरवणूक निघते. गुरुपौर्णिमेच्या रात्रभर देऊळ चौवीस तास उघडे असते. निरनिराळ्या कीर्तनकारांचे, प्रवचनकारांचे कार्यक्रम जोरात चालतात. शामा देशपांडे, कोतेपाटील, गोंदकर यांचे वंशज व नवीन विश्वस्त यांच्या उपस्थितीत आनंदात दिवाळी, दसरासारखा कार्यक्रम सनई चौघड्यासह साजरा केला जातो. उत्तम व्यवस्थेत सर्वांना तीन दिवस उदी, प्रसाद, भंडारा, भोजन दिले जाते. सर्व साईनाथांचे भक्त साईचे आशीर्वाद घेऊन खूश होतात.
साईनाथ माझे गुरू
देवकार्य होई सुरू ।। १।।
अवघे सुपंथ धरू
सत्कर्माने पृथ्वीवर उरू ।। २।।
साई माझा पिता
साई कार्य करविता ।। ३।।
सर्वत्र उभा साई होता
तोच संकटपार करविता ।। ४।।
साई माझी माता
साईच मज सांभाळता ।। ५।।
सत्कार्याने उजळतो आता
मानवतेचा धर्म गाता ।। ६।।
साई माझा सखा बंधू
मधाच्या पोळ्यातील मधू ।। ७।।
भक्ताला पळवीसी असता अधू
श्रीकृष्ण बलराम बंधू ।। ८।।
साई माझा परममित्र
साई साऱ्या कार्यात पवित्र ।। ९।।
साऱ्या उत्तम कार्याचे जनित्र
जगभर फिरे प्रेमळ नेत्र ।। १०।।
साईला वाटे मी त्याचा पुत्र
तोच सांभाळतो विश्वाचे सूत्र ।। ११।।
हिरे मोत्यांचे बंधन सूत्र
सारे साईचेच सुखी तंत्र ।। १२।।
ज्याला नाही बंधू-बहीण
साई बने बंधू-बहीण।। १३।।
तोच बंधू रक्षण करे बहीण
आशीर्वादाने एकत्र विहीण।। १४।।
साई करे रोगातून सुटका
दूर रोग आपटता सटका ।। १५।।
साई वाटे प्रेमाची उदी
प्रेमाची वाहे गंगा नदी ।। १६।।
पारकरे संकटाची नदी
भक्ताला देई मऊ मऊ गादी ।। १७।।
साई गुरुपौर्णिमेचा पूर्णचंद्र
साई सुखाचा शीतल चंद्र ।। १८।।
साई आकाशातील इंद्र साई
पृथ्वीवरचा नरेंद्र ।।१९।।
साईनाम सुखाचे छंद
साईनामाला गुलाबाचा सुगंध ।। २०।।
आज साईनामाचेच मंथन साई बाबांनाच वंदन ।। २१।।
साईचरणी लावतो चंदन
गुरुपौर्णिमेला साईला वंदन ।। २२।।
जळीस्थळी साईचे नाम
साई ज्ञानेश्वर मुक्ताई नाम ।। २३।।