सुकृत खांडेकर
एका निवडणूक प्रचारात भाषण करीत असतानाच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची ८ जुलै रोजी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली. या घटनेने सारे जग हादरले. विज्ञान-तंत्रज्ञान, आधुनिकता, सायबर युगात जपानची सुरक्षा व्यवस्था अत्युच्च असताना एका माजी राष्ट्रप्रमुखाची हत्या होते हे खरोखरच धक्कादायक होते. जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, शिंजो आबे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कमतरता नव्हती. पण कोणाचा बेजबाबदारपणा किंवा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला, ते एनपीजेच्या चौकशीत स्पष्ट होईल. हत्येमागे कोणाचा हात आहे? हे उलगडण्यासाठी अमेरिकन तपास यंत्रणाही जपानला मदत करीत आहेत. व्हीव्हीआयपींची सुरक्षा व्यवस्था कठोर असतानाही हल्लेखोर बंदूक घेऊन शिंजो यांच्याजवळ कसा पोहोचू शकला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याने दोन गोळ्या शिंजोंवर नेम धरून झाडल्या, त्याला वेळीच सुरक्षा अधिकारी का रोखू शकले नाहीत? शिंजोंचा हल्लेखोर वयाच्या विसाव्या वर्षी नौदलात सामील झाला होता. ज्या विंगमध्ये तो काम करीत होता तेथे त्याला शस्त्र बाळगण्याचा प्रश्नच येत नव्हता. सन २००५ मध्ये त्याने नोकरीचा राजीनामा दिला.
नंतर जो एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करीत होता. ज्या ठिकाणी त्याने शिंजो यांची हत्या केली, त्या नारा शहरात तो सुरुवातीला एका अपार्टमेंटमध्ये राहात होता. ग्रॅज्युएशन फेअरवेल बुकमध्ये त्याने स्वत:च लिहिले होते, भविष्यात काय करायचे आहे हे आपणास ठाऊक नाही…. शिंजो आबे यांच्या प्रचारसभेत त्यांच्याजवळ पोहोचणारा हल्लेखोर पत्रकार म्हणून तिथे गेला होता. असे चौकशीतून उघड झाले आहे. त्याच्याकडे कॅमेरासारखी दिसणारी हातातील बंदूक होती. गोळीबार झाल्यावर त्याचा खुलासा झाला. हल्लेखोराने या बंदुकीचे स्वत:चे डिझाइन तयार केले होते. ती कॅमेरासारखी दिसावी, अशी त्याने बनवली होती. एका काळ्या रंगाच्या पॉलिथीनमध्ये त्याने बंदूक ठेवलेला कॅमेरा गुंडाळला होता. त्याने अवघ्या शंभर मीटर अंतरावरून शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडल्या. शिंजो यांचे फोटो काढण्यासाठी तो त्यांच्या जवळ गेला असावा, असे तेथील लोकांना वाटले. प्रत्यक्षात त्याने त्यांच्यावर जवळ जाऊन दोन गोळ्या झाडल्या. पोलिसांनी तत्काळ यामागामी तेत्सुया या ४२ वर्षांच्या गुन्हेगारावर झडप घालून पकडले.
जपानमध्ये बंदुकीचा परवाना मिळणे महाकठीण आहे. तेरा कोटी लोकसंख्या असलेल्या जपानमध्ये गोळीबारात मृत्यू पडलेल्यांची संख्या अगदी नगण्य आहे. केवळ जपानी नागरिकांनाच बंदुकीचा परवाना मिळू शकतो. पण त्यासाठी कडक नियम व निकष आहेत. ज्याला बंदुकीचा परवाना पाहिजे असेल त्याने कोणत्या कोणत्या शूटिंग असोसिएशनचे सदस्य असणे गरजचे आहे.
बंदुकीचा परवाना मंजूर करताना अत्यंत बारकाईने चौकशी केली जाते. सर्वाधिक काळ म्हणजे जपानच्या पंतप्रधानपदावर नऊ वर्षे राहिलेले शिंजो आबे यांनी पाच वेळा भारताला भेट दिली. त्यांची भारताची मैत्री चांगली होती. सन २००६ मध्ये जपानचे चीफ कॅबिनेट सेक्रेटरी असताना ते प्रथम भारतात आले होते. नंतर ते जपानचे पंतप्रधान झाल्यावर २००७ मध्ये दुसऱ्यांदा भारतात आले. या भेटीत त्यांनी संसदेमध्ये दोन सागरांचा संगम, असे संबोधून भारतीय संसद सदस्यांची मने जिंकली होती. तेव्हा डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते, लोकसभा अध्यक्षपदी सोमनाथ चटर्जी होते व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी होते. इंडो-पॅसिफिक आणि भारत-जपान नाते कसे दृढ आहे, यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला होता.
सन २०१२ ते २०२२ या काळात पुन्हा पंतप्रधान असताना ते तीन वेळा भारतात आले होते. भारताला सर्वात जास्त वेळा भेट देणारे ते जपानचे पंतप्रधान होते. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा सन्मान देऊन गौरवले होते. २६ जानेवारी २०१४ ला भारताच्या ६५व्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे आबे हे जपानचे पहिलेच पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी उपस्थित होते. २०१५ मध्ये शिंजो तिसऱ्यांदा भारतात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे हैदराबाद हाऊसमध्ये स्वागत केले होते. विशेष म्हणजे वाराणसी येथे झालेल्या गंगा पूजन आरतीमध्ये ते मोदींसमवेत सामील झाले होते. गंगा आरतीपासून शिंजो व मोदी यांच्यातील मैत्रीसंबंध अधिक दृढ झाले.
२०१७ मध्ये शिंजो आबे भारतात गांधीनगरला भेटीसाठी आले तेव्हा विमानतळावरून उघड्या मोटारीतून मोदी व शिंजो यांच्या आठ किलोमीटर रोड शोला लाखो लोकांची गर्दी लोटली होती. भारत-जपानच्या बाराव्या शिखर संमेलनाला हजर राहण्यासाठी ते आले होते. सन २०१९ मध्ये केवळ चार महिन्यांच्या काळात मोदी-आबे यांची जी-२० शिखर संमलेनासह आंतरराष्ट्रीय मंचावर एकूण चार वेळा भेट झाली. २५ जानेवारी २०२१ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा सन्मान दिला. नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे हे खास दोस्त होत, अशी जगभर या दोघांची ओळख होती.
सन २००७ मध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जपानला भेट दिली होती. तेव्हा पंतप्रधान असलेल्या शिंजो आबे यांच्याशी विकासाच्या मुद्द्यावर केलेल्या चर्चेतून मैत्रीची तार जोडली गेली. आबे यांनी मोदी यांच्यासाठी खास मेजवानी योजली होती. २०१२ मध्येही मोदी चार दिवसांच्या जपान भेटीवर गेले होते. तेव्हा आबे हे विरोधी पक्षनेते होते. २०१४ मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जपानमधील क्योटोचा दौरा केला होता. तेव्हा पंतप्रधान आबे व मोदींनी क्योटोमधील मंदिराला एकत्र भेट दिली होती. तसेच २०१६ मध्ये दोघांनी जपानमध्ये बुलेट ट्रेनमधून एकत्र प्रवास केला होता. शिंजो यांच्या घराण्याला मोठी राजकीय परंपरा आहे. त्यांचे वडील शिंतारो आबे हे जपानचे परराष्ट्रमंत्री होते. त्यांचे आजोबा नोबुसुके किशी हे जपानचे पंतप्रधान होते. शिंजो आबो यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतले. काही काळ एका खासगी कंपनीत नोकरी केल्यावर ते राजकारणात उतरले. १९९३ मध्ये ते पहिल्यांदा जपानच्या पार्लमेंटवर निवडून आले. सन २००५ मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान जुनुचिरो खोइझुमी यांनी त्यांची नेमणूक चीफ कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून केली होती. शिंजो आबे यांच्या मृत्यूने भारताने एक सच्चा शेजारी मित्र गमावला आहे.