हिंदुत्व सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या रूपाने झालेल्या उठावानंतर राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेतल्या चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेल्या बंडानंतर आता शिवसेना कुणाची हा वाद सध्या रंगला आहे. शिवसेना नेमकी कुणाची आणि कोण बेकायदेशीर हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यातून गल्लीबोळातील सामान्य शिवसैनिकही ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशा संभ्रावस्थेत पडला आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या १९ पैकी बहुसंख्य खासदारांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपसोबत जुळून घ्यावे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी उघड भूमिका सेना खासदारांनी मांडल्यानंतर जनमत कुठे आहे याची पक्षप्रमुखांना आता जाणीव झाली असावी. एकनाथ शिंदे यांना राज्यभरातील शिवसैनिकांकडून कधी उघड तर कधी छुपा पाठिंबा मिळत आहे. पक्षप्रमुखांच्या दरबारी राजकारणाच्या सुरस कथाही शिवसैनिकांच्या कानावर येत आहेत. तो धाक आणि दरारा राहिलेला नाही. त्यामुळे बाळासाहेबांनी निर्माण केलेली ती शिवसेना आता खरंच शिल्लक राहिली आहे का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. शिवसेनेतील उभी फूट निर्माण झाल्याने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट तयार झाले आहेत. आमची शिवसेना खरी असा दावा प्रत्येक जण करत आहे. विधिमंडळात ४० आमदारांचा मोठा गट असलेल्या शिंदे गटाच्या प्रतोद भरत गोगावले यांना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जणू मान्यता मिळाली आहे. शिवसेनेचे अर्ध्यापेक्षा अधिक खासदार हे बंडाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत असल्याने, मातोश्रीतून कारभार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची आता पराभूत मानसिकता दिसून येत आहे. त्यातून पक्षाचे निवडणूक चिन्ह आपल्यासोबत राहावे यासाठी त्यांचा आटापिटा सुरू झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले ४० आमदार अजूनही आम्ही शिवसेनेत असल्याचे सांगत आहेत. मतदारसंघातील कामे पूर्ण होत नव्हती आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हिंदुत्वाच्या मूळ प्रवाहापासून दूर गेल्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही उठाव केला असे शिंदे गटातील आमदार बोलत आहेत. त्यामुळे कोणती शिवसेना खरी हा जनतेच्या मनातही पडलेला प्रश्न आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे, त्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती मूळ शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या विनंतीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सर्वच गोष्टी हातातून जाताना दिसत आहेत.
या धनुष्यबाण निशाणी स्वीकारण्यामागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही मोठा दृष्टिकोन होता. भारतीय निवडणूक आयोगाने १९८८ मध्ये सर्व राजकीय पक्षांची नोंदणी केली होती. प्रत्येकाने स्वतंत्र निवडणूक चिन्ह घ्यावे याबद्दल सूचना केल्या होत्या. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रभू रामचंद्राच्या हातातील धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असावे, अशी भूमिका मांडली होती. पक्ष नोंदणी करून शिवसेनेने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह घेतले. “या आधीच्या प्रत्येक निवडणुकीत उगवता सूर्य, ढाल तलवार, नारळ अशी चिन्ह कोणाकोणाला मिळतात, गोंधळ होतो. यापेक्षा सरळ धनुष्यबाण हे एकच चिन्ह घेतले, तर सर्वांसाठी बरं होईल.” ही त्यावेळी बाळासाहेबांचा विचार होता.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे त्यांची हिंदुत्वाची धार कमी झाली होती. हीच संधी हेरून मागच्याच वर्षी राज ठाकरेंनी भगव्यावर दावा केला होता. मराठी मुद्द्यावरून मनसेने हिंदुत्वाकडे वाटचाल केली. शिवसेनाचा प्रवासही अगदी तसाच होता. शिवसेनेच्या हिदुत्वाच्या भूमिकेनंतर राज्यात १९९५ साली सत्ता मिळाली होती. शिवसेनेचे फक्त मुद्देच नाही तर राज ठाकरेंनी शिवसेनेचे निवडणूक चिन्हही आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या शिवसेनेच्या अधिकृत ‘धनुष्यबाण’ या निशाणी अगोदर ‘रेल्वे इंजिन’ या निशाणीवर शिवसेनेचे अनेक आमदार निवडून आले होते. ही गोष्ट राज ठाकरे यांनी ध्यानात ठेवलेली दिसते.
धनुष्यबाणाच्या आधीच्या इंजिन या चिन्हांचा आहे. राज ठाकरे २००६ ते शिवसेनेतून बाहेर पडले. दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश न करता त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. तसेच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने चांगली मते मिळवली. त्यामुळे राजकीय चिन्हास मनसे पात्र झाली. मनसेला निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळाले तेही ‘रेल्वे इंजिन.’ त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे इंजिन सुसाट सुटले. १३ आमदार निवडून आले. नंतरच्या काळात २०२१ला इंजिनाची दिशा बदलली. ती डावीकडून उजवीकडे करण्यात आली. या रेल्वे इंजिनाने मुंबई मनपा निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक नेऊन पोहोचवले. पुढे २०१४ नंतर सातत्याने मनसेला पराभवाचे धक्के सोसावे लागत आहेत. राज यांची मनसे पुन्हा उभारी घेऊ पाहत आहे. महाविकास आघाडीत धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच हिंदुत्व आता मनसेने स्वीकारले आहे. रेल्वे इंजिनाची हिंदुत्वाच्या रुळावरळी दौड यशस्वी होईल का? याचं उत्तर काळच देऊ शकतो. आता शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाच्या भात्यात राहणार आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.