शिबानी जोशी
नागपूर शहराजवळ असले तरी पन्नास वर्षांपूर्वी खापरी हा भाग खूपच मागासलेला होता. या ठिकाणी आरोग्य सुविधांचा अभावच होता. आजूबाजूच्या पंधरा-वीस गावातील लोकांना नागपूरला येऊन वैद्यकीय सेवा घेणे परवडणारे नव्हते. ही बाब लक्षात घेऊन १९७४ साली स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वीचे सरसंघचालक माननीय बाळासाहेब देवरस यांची तिथे थोडी जमीन होती. ती जमीन त्यांनी दान केली. या जमिनीवर त्यावेळी शेती होती. गायीचा गोठा होता. सुरुवातीला पुढे गायी बांधलेल्या असत आणि बाजूला डॉक्टर वैद्यकीय सेवा पुरवत असत, असं चित्रं होतं. हळूहळू तिथे वेगवेगळ्या वैद्यकीय विधामध्ये औषधोपचार सुरू झाले. स्वामी विवेकानंद यांनी नेहमीच सेवाभावाला महत्त्व दिलं. ‘शिवभावे जीव सेवा’ हे ब्रीदवाक्य त्यांना त्यांच्या गुरूंनी दिलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की, ‘हा मंत्र जो मला माझ्या गुरूंनी दिला आहे, वेळ आली तर याचा मी संपूर्ण जगाला प्रत्यय आणून दाखवीन. सेवा करूनच तुम्हाला ईश्वरप्राप्ती होते. याचा प्रत्यय मी संपूर्ण जगाला आणून देईन’, असे स्वामी म्हणत असत.
संस्थेच्या संस्थापकांनी या सर्वांचा अभ्यास केला होता. त्यामुळे या रुग्णालयाला त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे नाव दिले. सुरुवातीला गर्भवती महिलांचे बाळंतपण घरीच होत असे, ही गोष्ट लक्षात घेऊन सुरुवातीला सुतिकागृह सुरू झाले. त्यानंतर तिथल्या लोकांच्या डोळ्यांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करता यावी, यासाठी नेत्ररुग्ण विभाग स्थापन करण्यात आला. थोडक्यात तिथल्या ग्रामीण लोकांच्या गरजा जशा लक्षात येऊ लागल्यात, तशा वेगवेगळ्या विभागांची सेवा तिथे सुरू करण्यात आली. त्यानंतर हर्निया यासारख्या छोट्या-मोठ्या सर्जरी सुरू झाल्या. आज ४८ वर्षांनी सर्व प्रकारची ऑपरेशन इथे होतात. तिथल्या गरजूंना औषधं मिळावीत, यासाठी एक सुसज्ज केमिस्ट शॉपही तिथे सुरू करण्यात आले. त्याशिवाय पॅथॉलॉजी, फिजीओथेरपी, योग थेरपिस्ट, अगदी डायलिसिसची सोय, एक्स-रे या सर्व सेवा बाहेरच्या पेक्षा जवळजवळ निम्म्या दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. काही काही अतिशय गरीब आणि गरजू रुग्णांना, तर इथे विनामूल्य सेवा पुरवली जाते. महात्मा जोतिबा फुले योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशा योजना राबवून निःशुल्क सेवा दिल्या जातात. खापरी आणि आसपास जवळजवळ दीडशे खेड्यांमध्ये अजूनही उत्तम आरोग्य सेवा पोहोचली नाही आहे. काही वर्षांपूर्वी इथल्या एका जवळच्या गावातील बाईचे दिवस भरत आले होते. तिला रुग्णालयात येण्याची इच्छा होती; परंतु येण्यासाठी कोणतंही वाहन नसल्यामुळे ती बाई चालत होती. चालताना तिच्या वेदना पाहून एका जेसीबीवाल्यांनी तिला जेसीबीत बसवलं आणि रुग्णालयापर्यंत आणलं; परंतु रुग्णालयापर्यंत येईपर्यंतच ती बाई जवळजवळ बाळंतीण झाली होती, तशा अवस्थेत तिला रुग्णालयात नेऊन रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी, डॉक्टरांनी तिची आणि बाळाची सुखरूप सुटका केली होती.
या सर्व गावातील लोकांना हे संघकार्य आहे, हे इतकं माहीत आहे की, एखाद्या गावकऱ्यांनी विचारले, काय रे, कुठे गेला होतास? तर तो सहज सांगून जातो की, संघात गेलो होतो. या रुग्णालयावर गावकऱ्यांचा इतका विश्वास आहे की, दररोज अंदाजे १५० ते २०० रुग्ण ओपीडीमध्ये येतात, तर दिवसभरात एकूण २०० ते २५० जणांवर येथे उपचार केले जातात. रुग्णालयात सध्या जवळपास १३५ जणांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. त्यामुळे स्थानिकांना इथे रोजगारही उपलब्ध झाला आहे. कोरोना काळातही हे संपूर्ण रुग्णालय कोरोना रुग्णालय मध्ये रूपांतरित केलं होतं आणि आसपासच्या गावातील जवळ जवळ १००० गरजूंना कोरोनाची ट्रीटमेंट विनामूल्य देण्यात आली होती. नुसते रुग्णालय उभारून चालत नाही, तर रुग्ण सेवा करणारे डॉक्टर आणि कर्मचारी मिळणंही अशा लांबच्या ठिकाणी अवघड असत, हे लक्षात घेऊन संस्थेने तिथेच शासन मान्यता प्राप्त नर्सिंग कोर्सही सुरू केला आहे. इथे दोन वर्षांच्या कोर्समध्ये अंदाजे ४० महिला नर्सिंग प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. त्यांना या रुग्णालयात किंवा इतर रुग्णालयात शंभर टक्के नोकरी मिळते.
बुटीबोरी इथे ही वैद्यकीय गरज लक्षात घेऊन डे केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. इथे ओपीडी सेवा दिली जाते तसेच पुढील उपचाराची गरज असलेल्या तिथल्या रुग्णांना खापरी येथील रुग्णालयात दाखल करून घेतलं जातं. आता खापरी इथे ५० बेडचे रुग्णालय सुरू असून अजून २७ बेडचे कार्डियाक रुग्णालय बांधण्याचे काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत हे रुग्णालय सुरू होईल, असं रुग्णालयाचे सध्याचे सचिव उल्हास बुजोणे यांनी सांगितले. अनेक मोठ-मोठ्या शहरांच्या जवळपास असलेल्या गावांमध्ये आजही वैद्यकीय सेवा पुरेशा उपलब्ध नाहीत तसेच इथल्या गरीब रुग्णांना शहरात राहून उपचार घेणेही परवडत नाही, अशांसाठी नागपूर लगतच्या खापरी भागात पन्नास वर्षांपूर्वी रुग्णालय सुरू करून संघ कार्यकर्त्यांनी एक उदाहरणच घालून दिले आहे, असे म्हणायला हरकत नाही.