Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमुरबाड रेल्वेमार्गासाठी शिंदे सरकार सरसावले

मुरबाड रेल्वेमार्गासाठी शिंदे सरकार सरसावले

प्रकल्पाचा निम्मा खर्च उचलणार, फडणवीसांची ग्वाही

ठाणे (प्रतिनिधी) : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला कल्याण-नगर या बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्पाचा खर्च आता नव्याने स्थापन झालेले राज्य सरकार उचलणार असल्याची माहिती राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे पहिला टप्पा समजल्या जाणाऱ्या २७ किमीचा नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम लवकर चालू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून कल्याणहून मुरबाडपर्यंत रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या प्रयत्नानेच या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या कामात राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलावा, अशी मागणी २०१९ मध्ये कपिल पाटील यांनी केली होती. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुंबईत मंगळवारी भेट घेतली. तसेच नियोजित रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी देण्याची विनंती केली. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी रेल्वे अत्यावश्यक आहे. मुरबाडवासियांना रेल्वेसेवा देण्यास भाजपा कटीबद्ध आहे, असे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात ५० टक्के वाटा उचलण्यासंदर्भात हमी देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या निर्णयामुळे नियोजित मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा निधी मिळणार असल्यामुळे कामाला निश्चितच वेग येईल. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली. मुंबई जवळ असून दुर्लक्षित राहिलेल्या शहापूर मुरबाड या भागांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदरचा रेल्वे मार्ग वरदान ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -