Tuesday, January 21, 2025
Homeदेशगुजरातमध्ये जलप्रलय; ६३ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये जलप्रलय; ६३ जणांचा मृत्यू

नवसारी : गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत झालेला मुसळधार पाऊस आणि पुरामुळे तब्बल ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे १० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ८ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातही मुसळधार पावसाचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे.

गुजरातमधील अंबिका नदीला अचानक आलेल्या पुरामुळे सरकारी कर्मचारी अडकले. त्यानंतर वलसाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय तटरक्षक दलाला माहिती देऊन मदत मागितली. चेतक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे बचावकार्य करण्यात आल्याचे आयसीजीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत होते. अखेर शर्थीच्या प्रयत्नांनंतर १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच, वलसाड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज, १२ जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात पावसामुळे १० हजार ७०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री दर तासाला परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील पुराबद्दल ट्वीट केले असून ते म्हणाले की, “गुजरातच्या विविध भागांत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीच्या संदर्भात मी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी बोललो आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. गुजरात प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ लोकांना मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.

गुजरातमध्ये नर्मदा नदीला पूर आला आहे. देडियापाडा आणि सागबारा येथे ८ तासांत मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे कर्जन धरणाचे ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या ९ दरवाजातून २ लाख १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भरुचमधील १२ गावे आणि नर्मदेच्या ८ गावांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. पुरामुळे येथील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कर्जन नदीचे पाणी थेट नर्मदा नदीला मिळते, त्यामुळे भरूचजवळ नर्मदेची पातळी वाढते. आपत्ती व्यवस्थापन मंत्री राजेंद्र त्रिवेदी म्हणाले की, सध्या राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस पडत आहे. प्रशासन सतर्क असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत वीज कोसळल्यामुळे ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -