Tuesday, April 22, 2025
Homeमहत्वाची बातमी“झायदस वेलनेस दीर्घ मुदतीसाठी योग्य”

“झायदस वेलनेस दीर्घ मुदतीसाठी योग्य”

डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजारात या आठवड्यात शेअर बाजारात तेजी पहावयास मिळाली. निर्देशांक निफ्टीने \R१६२७५ हा या आठवड्यात उच्चांक नोंदविला. पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांकाची गती तेजीची झालेली असून दिशा अजूनही मंदीची आहे. पुढील आठवड्यासाठी अल्पमुदतीच्या चार्टनुसार १५६०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निफ्टीमध्ये घसरण होणार नाही. आपण मागील लेखात सांगितल्याप्रमाणे निफ्टी १६५०० ते १५५०० या पातळीत काही काळ वेळ घालवू शकतात. त्यामुळे १६५०० च्या वर जोपर्यंत निफ्टी जात नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये मोठी तेजी येणार नाही. पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टी १६३५० ते १६४०० पर्यंत तेजी दाखवू शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करीत असताना दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करणे नेहमीच फायदेशीर ठरत असते. आपण ज्या ठिकाणी पार्किंग नाही, अशा ठिकाणी जर आपली गाडी चुकीच्या पद्धतीने पार्क केली, तर आपली गाडी उचलली जाते. त्याचप्रमाणे शेअर बाजारात आपण आपला पैसा चुकीच्या शेअरमध्ये चुकीच्या पद्धतीने गुंतवला, तर तोदेखील असाच नुकसानीच्या स्वरूपात उचलला जातो. त्यामुळे या शेअर बाजारात योग्य शेअर आणि त्या शेअरमधील आपला गुंतवणुकीचा कालावधी याचा विचार करूनच गुंतवणूक करणे अतिशय आवश्यक असते.

शेअर बाजारात आज अनेक कंपन्या आहेत. त्यापैकी आरोग्य उत्तम राहण्यासाठी उपयुक्त अशी अन्न उत्पादने बनविणारी आणि या प्रकारच्या क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी म्हणजे ‘झायदस वेलनेस’. आज प्रामुख्याने ‘निके मार्केट’मध्ये कार्यरत असणारी ही कंपनी आहे. शेअर मार्केटचा उपसंच असलेले मार्केट म्हणजे ‘निके मार्केट’. आपल्या ‘विशिष्ट’ उत्पादनातून मार्केट्ची म्हणजेच लोकांची गरज ओळखून ती गरज पूर्ण करणे आणि ती करीत असताना आपल्या उत्पादनाची अतिशय योग्य किंमत ठेवणे ही ‘निके मार्केट’ची ढोबळमानाने व्याख्या करता येईल. शेअर मार्केटच्या या उपसंचामधील या कंपन्या प्रामुख्याने आपल्या कंपनीच्या ‘विशिष्ट उत्पादनावरच’ मोठ्या प्रमाणात भर देत असतात.

या कंपनीचे नाव पूर्वी ‘कार्नेशन नुटरा अॅनालॉग फुड्स लिमिटेड’ असे होते. जानेवारी २००९ पासून नाव बदलून ‘झायदस वेलनेस’ असे करण्यात आले. आज ‘झायदस वेलनेस’ ही कंपनी ही निके उत्पादनात कार्यरत असल्यामुळे या कंपनीची उत्पादने आणि त्याचे फायदे याबद्दल लोकाना जाणीव करून देण्यासाठी एकूण उत्पन्नापैकी जवळपास २५% उत्पन्न ही कंपनी फक्त जाहिरातींवर खर्च करते. आज जवळपास १० हजार करोड रुपये मार्केट कॅपिटल असून कंपनीचा पी.ई. रेशो ३३ आहे.

सातत्याने डीव्हिडंट देणाऱ्या या कंपनीच्या उत्पादनांना आज बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आज कंपनी शुगर, स्क्रब, बटर व न्युट्रिशन या तीन विभागात निके कार्यरत आहे. आज भारतातील सर्वाधिक खपला जाणारा कमी कॅलरी स्वीटनर ब्रँड म्हणजे ‘शुगर फ्री’ आजदेखील त्यांचे हे उत्पादन निके मार्केटमध्ये स्वत:ची लीडरशिप पोझिशन टिकवून आहे. याशिवाय या कंपनीच्या एवरयुथ, न्युट्रिलाइट, अॅक्टिलाइफ या उत्पादनांनी देखील स्वत:ची ओळख आज बाजारपेठेत निर्माण केलेली आहे. आज १६०० रुपये किमतीला ‘झायदस वेलनेस’ कंपनीचे शेअर्स मिळत असून पुढील ५ ते १० वर्षांचा म्हणजेच दीर्घमुदतीचा विचार करता हा शेअर चांगली वाढ दर्शवू शकतो. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स पैशाचे योग्य नियोजन करून जर टप्प्याटप्प्याने खरेदी केले, तर चांगला फायदा होऊ शकेल. आपण ‘झायदस वेलनेस’ हा शेअर दीर्घमुदतीसाठी याच आपल्या लेखमालेतून ७०० रुपये किमतीला असतानाही सांगितलेला होता. त्यानंतर या शेअरने २४०० रुपये किमतीपर्यंत मजल मारलेली होती. शेअर बाजारात काही महिन्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आता पुन्हा एकदा फंडामेंटल विश्लेषणानुसार हा शेअर आकर्षक किमतीला मिळत आहे. अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसिस) तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार महिंद्रा अँड महिंद्रा, वोल्टमॅप, सिमेन्स, अपार इंडस्ट्रीज यासह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे.

कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७९६६ या पातळीच्यावर आहे. तोपर्यंत कच्चे तेलात आणखी वाढ होऊ शकते. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे सोन्याने मध्यम मुदतीच्या चार्टनुसार ५१७९७ ही पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आता जोपर्यंत सोने ५०१०० या पातळीच्या वर आहे. तोपर्यंत सोन्यामध्ये मध्यम मुदतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. शेअर बाजारात गेले काही महिने उच्चांकापासून मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. त्यामुळे दीर्घमुदतीसाठी योग्य शेअर निवडून निर्देशांकांची दिशा आणि गती बघून टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. गुंतवणूक करीत असताना बऱ्याच वेळा आपण शेअर अल्पमुदतीसाठी घेतला असेल आणि त्यानंतर जर त्या शेअरमध्ये घसरण झाली, तर बरेच गुंतवणूदार शेअरची किंमत खरेदी किमतीपेक्षा खाली आली म्हणून स्टॉपलॉस न लावता तो घेतलेला शेअर लाँग टर्म म्हणून ठेवून देतात आणि त्यामुळे गुंतवणूक अडकून पडते. गुंतवणूक करीत असताना आपला त्या शेअरमधील गुंतवणुकीचा कालावधी तो घेण्यापूर्वीच ठरवणे आवश्यक आहे, म्हणजे आपली गुंतवणूक अडकणार नाही.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -