सीमा दाते
‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था झाली आहे, सध्या मुंबईकरांची. दर वर्षी मुंबईकरांना पावसामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागले. सलग चार दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पाडल्यामुळे मुंबईची तुंबई झाली होती. मात्र यामुळे रोज नोकरीवर जाणाऱ्या, मुंबईकरांचे हाल झाले. मात्र मुंबईच्या झालेल्या या परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
७ मार्चला मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर अनेक कामे उशिरा सुरू करण्यात आली होती. नालेसफाईची कामेही उशिरा सुरू करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने १०० टक्क्यांहून अधिक नालेसफाई झाली असल्याचा दावा केला आहे. मात्र मुंबईतील पावसामुळे महापालिकेचे दावे फोल ठरले आहेत. या वर्षी हिंदमाता येथे साचलेल्या पाण्याचा निचरा काही वेळेतच झाला. यामुळे महापालिकेच्या कामाचं कौतुक केलं जातंय. मात्र तरीही दर वर्षी ज्या ठिकाणी पाच साचले जाते, त्या ठिकाणांऐवजी इतर नवीन ठिकाणीदेखील पाणी साचले होते. जागोजागी मुंबईतल्या सखल भागात पाऊस झाल्यामुळे पाणी साचले. दादर, माटुंगा, हिंदमाता, काळाचौकी,चेंबूर, सायन, गांधी मार्केट, अंधेरी, विरा देसाई रोड, मिलन सब वे, अंधेरी सब वे अशा कित्येक भागांत पावसामुळे पाणी साचले होते. रस्त्यावर ट्राफिक, वाहतुकीचा खोळंबा, अनेक ठिकाणी वाहतूक वळवली, लोकल उशिरा, अशा कित्येक समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागलं. हा पाऊस पाहिलाच मुसळधार पाऊस होता आणि असे असतानाही इतक्या समस्या मुंबईकरांसमोर आल्या होत्या. अजून तर पावसाचे तीन महिने बाकी आहेत आणि पहिल्याच पावसात ही अवस्था असेल, तर बाकीच्या दिवसांत मुंबईकरांना किती त्रास काढावा लागेल, हे तर सांगायलाच नको.
यंदा पावसाळ्यात हिंदमाताच्या कामगिरीमुळे महापालिकेचे कौतुक करण्यात आले. इतकेच नाही तर स्थानिकांचा त्रास यावेळी कमी झाला. यामुळे त्यांना स्थानिकांनाही दिलासा मिळाला आहे. काही वेळातच साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. दरम्यान हिंदमाता परिसरातील सेंट झेव्हियर्स मैदान आणि प्रमोद महाजन मैदान येथे मुंबई महापालिकेकडून साठवण जलाशय म्हणजेच भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या आहेत. सेंट झेव्हियर्स मैदानात बांधलेल्या भूमिगत टाक्यांत पाणी साचले जाते आणि ते पाणी वाहून प्रमोद महाजन मैदानात नेले जाते. यामुळे हिंदमाता परिसरात साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होतो. या टाकीत २ कोटी ८७ लाख लिटर पाणी साठवले जाते. मुंबई महापालिकेचा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरत असून यामुळे येथील स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.
मात्र पावसामुळे झालेल्या मुंबईच्या तुंबईला जबाबदार कोण?, गेले तीस वर्षे ज्यांनी महापालिकेत सत्ता गाजवली ते सत्ताधारी यावेळी जबाबदारी घेणार का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जातो. यंदा महापालिकेने मुंबईतील फ्लडिंग स्पॉट शोधून काढले होते. त्यानंतर महापालिकेकडून फ्लडिंग स्पॉट बुजवण्यात जरी आले असले तरी नवीन फ्लडिंग स्पॉट तयार झाल्यामुळे महापालिकेच्या डोक्याला ताप झाला आहे. दुसरीकडे मुंबईत खड्ड्यांच्या समस्या दर वर्षीप्रमाणे पुन्हा सुरू झाल्या आहेत, तर खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, यंदा १ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील रस्त्यांवर सुमारे ७ हजार २११ खड्डे बुजवले असल्याचा दावा केला आहे.
तर गेल्या वर्षी याच कालावधीत महानगरपालिकेने सुमारे १० हजार १९९ खड्डे बुजवले होते, म्हणजेच यंदा खड्ड्यांच्या समस्येत घट झाली असल्याचा दावाही पालिकेने केला आहे. पण तरीही समस्या ‘जैसे थे’च दिसून येत आहेत. त्यामुळे या वर्षी पुन्हा मुंबईकरांना दर वर्षीप्रमाणे त्रास सहन करावा लागणार आहेच. पण त्याची जबाबदारी मात्र कोण घेणार? हा अद्यापही प्रश्न आहेच.