सत्ता गेल्यामुळे शिवसेना सैरभैर

Share

महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षांनंतर सत्तांतर झाले. विधान परिषद निवडणूक निकालानंतर अनाकलनीय घडामोडी घडल्या. शिवसेनेत फूट पडली. ५५ आमदारांपैकी तब्बल ४० आमदारांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली वेगळी राजकीय चूल मांडत हिंदुत्ववादी भाजपशी सोबत करत सत्ता संपादन केली. मुळातच शिवसेनेच्या अनेक आमदारांना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून महाविकास आघाडीच्या नावाखाली सत्तेत सहभागी होणे पसंत पडले नव्हते. कडवट हिंदुत्ववादी पक्ष ही शिवसेनेची प्रतिमा असताना मुस्लीम अनुनय करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होणे अनेक आमदारांच्या पचनीही पडले नव्हते. हिंदुत्ववादी पक्ष असणाऱ्या भाजपसोबत लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविणे व सत्तासंपादन करताना हिंदुत्ववादी सहकाऱ्यांची सोबत सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्तेसाठी सोबत करणे हीच मुळी शिवसेना आमदारांसाठी संतापजनक बाब होती. पक्षप्रमुखांनी सत्तासंपादनासाठी घेतलेली भूमिका नसानसांत हिंदुत्वाचा श्वास भिनलेल्या शिवसेना आमदारांना मान्य नव्हती. अडीच वर्षे या शिवसेना आमदारांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागत होता. घुसमट वाढत होती.

असंतोष वाढीस लागत होता. उद्रेक तर होणारच होता. फक्त या आमदारांना आपल्यातील असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी व हिंदुत्वाची सोबत करण्यासाठी योग्य संधीची प्रतिक्षा होती. शिवसेनेची मुख्यमंत्रीपदावर बोळवण करून खरे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच चालवत होती. राज्याचा अधिकाधिक निधी सत्तेतील शिवसेना व काँग्रेस या मित्रपक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसच पळवत होती. मतदारसंघातील विकासकामांसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी मिळतच होता; परंतु ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पडले, त्या उमेदवारांनाही निधी देताना मतदारसंघातील त्यांचे प्राबल्य वाढविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच वर्षांत नियोजनबद्धरित्या केले. हे सर्व शिवसेना आमदारांच्याच मतदारसंघात अधिकाधिक प्रमाणावर सुरू होते. शिवसेना आमदारांना विकासकामांच्या उद्घाटनाला न बोलविता राष्ट्रवादीचे पालकमंत्री कार्यक्रमासाठी आपल्या पडलेल्या उमेदवारांना मोठेपणा देत, असे एक प्रकारे शिवसेना आमदारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत होता. पक्षप्रमुख व मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगूनही शिवसेना आमदारांची दखल घेतली जात नव्हती. मातोश्रीवर व वर्षावर शिवसेना आमदारांची कैफीयत जाणून घेण्यास पिता-पुत्रांना वेळ नव्हता. शिवसेना आमदारांची अशा वेळी ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी अवस्था झाली होती. एकीकडे मतदारसंघात विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नाही, पराभूत उमेदवार मतदारसंघात विकासकामांसाठी निधी आणतात, स्वत:चे सरकार असतानाही निधी मिळविताना होणारी ससेहोलपट, पक्ष हिंदुत्वापासून लांब चालल्याने जनतेची नाराजी अशा सर्व अवस्थेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार जिवंत ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ५५ पैकी तब्बल ४०हून अधिक आमदारांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवसांचा असंतोष, घुसमट, सत्ता असूनही नेतृत्वाकडून होणारी उपेक्षा याचा एकत्रित मिलाफ होऊन हा उद्रेक घडला. या उद्रेकानंतर सत्ता गमविल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना सैरभैर झाल्याचे महाराष्ट्राला जवळून पाहावयास मिळाले, अनुभवयास मिळाले.

सत्ताकाळात शिवसैनिकांना सोडा, पण शिवसेना आमदारांनाही सहजासहजी वर्षावर, मातोश्रीवर तसेच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उपलब्ध न होणारे मुख्यमंत्री व पक्षप्रमुख शिवसैनिकांना आता सहजासहजी उपलब्ध होऊ लागले आहेत. शिवसैनिकांसह, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवा सेनेच्या युवांसोबत बैठका घेऊ लागले आहेत. संघटना वाढीच्या भाषा बोलू लागले आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधू लागले आहे. सत्ता गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांना हे उशिराने सुचलेले शहाणपण आहे. सत्ता असताना, सर्व एकत्रित असताना हे केले असते, तर कदाचित आमदार दुरावले नसते. संघटनेला खिंडार पडले नसते. एकीकडे असंतोष व दुसरीकडे बोलघेवड्या प्रवक्त्त्यांची बाष्कळ अर्थहिन भाषा, आमदारांवर होणारी टीका जनसामान्यांत विनोदाचा प्रकार बनू लागली आहे. ज्या माणसांचे संघटनावाढीत शून्य योगदान आहे, तो माणूस आमदारांविषयी कोणतीही बालिश वक्तव्ये करताना पक्षप्रमुखांनी त्यांना थांबविण्याऐवजी कानाडोळा गेल्याने प्रवक्त्त्यांची पोपटपंची वाढत गेली व आमदारांमध्ये असंतोष वाढत गेला. आज आदित्य ठाकरे यांनी आता निष्ठा यात्रा सुरू केली आहे. संघटना वाचविण्यासाठी पिता-पुत्रांनी धडपड सुरू केलेली आहे. अधिकाधिक आमदार सोडून गेले आहेत. नव्वद टक्के खासदार कोणत्याही क्षणी सोडून जाण्याची टांगती तलवार आहे. सत्ता गेल्यामुळे शिवसेना खऱ्या अर्थाने सैरभैर झालेली आहे. शिंदेसमर्थक आमदारांवर तोंडसुख घेतले जात आहे. एकीकडे सत्ता जाणे, दुसरीकडे संघटना खिळखिळी होणे, एकंदरीत शिवसेनेच्या बाबतीत आभाळच फाटले असताना संयम दाखविणे आवश्यक असताना केवळ तोंडसुख घेण्याचा एककलमी कार्यक्रम ठाकरे पिता-पुत्र व फारसा जनाधार नसणाऱ्या त्यांच्या नेतेमंडळींकडून सुरू आहे. यातून सत्ता सोडताना उद्धव ठाकरेंनी दाखविलेला मोठेपणा तकलादू असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या व त्यांच्या नेतेमंडळींकडून सुरू असलेल्या वाचाळपणामुळे महाराष्ट्रातील जनतेची सहानुभूतीही त्यांनी गमावली आहे. तोंडावर नियत्रंण नसल्याने व सत्ता गेल्याने संतुलन ढासळल्याने शिवसेनेची वाटचाल बिकट झाल्याचे स्पष्टपणे पाहावयास मिळत आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

52 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago