सुधागड – पाली (वार्ताहर) : हजारो किमीचा प्रवास करून परदेशी पाहुणा ‘तिबोटी खंड्या’ जिल्ह्यात दाखल झाला आहे. कर्नाळा व फणसाड पक्षी अभयारण्य, याबरोबरच माणगाव, सुधागड, श्रीवर्धन, पनवेल, रोहा, अलिबाग आदी तालुक्यातील जंगल भागात तिबोटी खंड्याचे दर्शन होत आहे. यामुळे पक्षीप्रेमी, पक्षीनिरीक्षक व छायाचित्रकार आनंदी झाले आहेत.
या पक्षाच्या सुंदर दिसण्यामुळे आणि विशिष्ट जीवनशैलीमुळे याला ‘रायगड जिल्ह्याचा पक्षी’ म्हणून नुकताच बहुमान मिळाला आहे. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पावसाच्या आगमनाची आतुरता असते, तशीच आतुरता पक्षीप्रेमी, पक्षीनिरीक्षक व छायाचित्रकार यांना परदेशी पाहुणा ‘तिबोटी खंड्या’ची असते.
माणगाव तालुक्यातील विळे येथील पक्षी अभ्यासक व निरीक्षक रामेश्वर मुंडे यांनी सांगितले की जवळपास २१०० किलोमीटरचे अंतर पार करून हा ‘oriental dwarf kingfisher’ म्हणजेच तिबोटी खंड्या पावसाळ्यात तिबेट (चीन) व श्रीलंकेहून कोकणात दाखल होतो. साधारणतः २० ते २२ सेमीपर्यंत लांबीचा म्हणजेच चिमणीच्या आकाराचा हा सुंदर आणि देखणा पक्षी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पक्षीप्रेमींची झुंबड उडल्याशिवाय रहात नाही.
पांढरा, निळा, काळा, गुलाबी, लाल, शेंदरी आणि पिवळा अशा सप्तरंगानी नटलेला हा पक्षी जंगलातील छोटे ओहोळ, नदी-नाले यांच्याजवळ गर्द झाडीमध्ये दिसून येतो. आणि जेव्हा कोणाची चाहूल लागते तेव्हा हा पक्षी शिळ मारत एवढ्या वेगाने उडत जातो की, पाहणाऱ्याला जणूकाही गर्द झाडीमधून इंद्रधनुष्य उडत जात असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.
अनोखे घरटे
जंगलामधील गर्द झाडी, काटेरी झाडांच्या मधून वाहत येणारे ओहोळ, नदी-नाले यांच्याकडेला भुसभुशीत मातीमध्ये अगदी जमिनीलगत तो आपले घरटे बनवतो, घरटे म्हणजे मातीमध्ये नर आणि मादी यांच्या जोडीने तयार केलेले जवळपास दोन ते तीन फूट लांबीचे बीळ असते, या बिळात पुरेशी जागा तयार करून त्या जागेत मादी चार ते पाच अंडी देते.
नर व मादी मिळून करतात पिल्लांचे संगोपन
अंडी नर व मादी दोघेही आलटून-पालटून उबवतात. जवळपास १८-२१ दिवसांनंतर या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. पिल्लांना खाद्य भरवण्यासाठी नर आणि मादी सतत चोचीमध्ये गवत किडे, छोटे खेकडे, पाली, छोटे मासे, सापसुरूळी (चोपई), छोटे बेडूक आणत असतात.
निसर्गाचे वरदान
निसर्गाने या पक्षाला दिलेली एक विशेष देणगी म्हणजे जर काही कारणास्तव या पक्षाचे घरटे मोडले किंवा त्या ठिकाणी सतत कोणाचा हस्तक्षेप वाढला, तर हा पक्षी आपले घरटे सोडून निघून जातो आणि दुसऱ्या जागेवर नवीन घरटे बनवतो. असे तो फक्त तीन वेळा करतो.
हल्ली या पक्ष्याच्या घरट्याच्या अवतीभोवती मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे याचे जिल्ह्यात येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हा पक्षी जर आपल्याला पाहायचा असेल, तर त्याला दुर्बिणीच्या सहाय्याने किंवा लांबूनच पाहावे. त्याच्या घरट्याच्या जवळ जाऊन त्याला त्रास होणार नाही, या पद्धतीने वागले पाहिजे म्हणजे या सुंदर पक्ष्याचे जतन आणि संवर्धन होईल. – रामेश्वर श्रीराम मुंडे, पक्षी निरीक्षक, सहा. शिक्षक, कुंडलिका विद्यालय, पाटणूस