सोलापूर (हिं.स.) : संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त होण्यासाठी यावर्षी शौचालये बांधण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. लोकांनी स्वच्छतेला महत्व देऊन स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी म्हणून राज्यात या मोहीमेची व्याप्ती अधिक वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पाणी पुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभाग यांच्या वतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता व ग्रामसभा दिंडी समारोप कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात संपन्न झाला.
यावेळी आमदार तानाजी सावंत, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पाणी पुरवठा विभागाचे सह सचिव अभय महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे प्रकल्प संचालक रणधीर सोमवंशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील अनेक गावे स्वच्छ आणि समृध्द होत आहेत. राज्यात वैयक्तिक शौचालये बांधण्याची मोहीम सुरू आहे. पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक शौचालये उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. तसेच यापूर्वी बांधलेली शौचालये दुरुस्ती अभावी वापराविना पडून राहू नये यासाठी दुरुस्ती व डागडुजी ला शासन मदत करेल, असे त्यांनी सांगितले.