Thursday, October 10, 2024
Homeकोकणरायगडपोलादपूर तालुक्यात ३८ ग्रामपंचायती अंधारात

पोलादपूर तालुक्यात ३८ ग्रामपंचायती अंधारात

पथदिव्यांचे वीजबिल न भरल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित

पोलादपूर (वार्ताहर) : भूवैज्ञानिकांनी पोलादपूर तालुक्याला भूस्खलनप्रवण व दरडग्रस्त तालुका म्हणून निश्चित केल्यानंतर रात्रीच्या वेळी अतिवृष्टीदरम्यान या गावांतील रस्त्यावर पथदिव्यांचा प्रकाशझोत असण्याची गरज असूनही तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३८ ग्रामपंचायतींनी पथदिव्यांची विद्युत बिले न भरल्याने बंद असल्याचा धक्कादायक अहवाल पंचायत समितीकडून प्राप्त झाला आहे. यादरम्यान, शासननिर्णयानुसार थेट विद्युत कंपनीला बिलांची रक्कम न देता जिल्हा परिषदेमार्फत बिल अदा करण्याची भूमिका स्पष्ट असूनही शासन बिल देणार असताना शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या महावितरण कंपनीने विद्युतपुरवठा खंडित करण्याचा प्रकार घडल्याने पोलादपूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यातदेखील अनेक ग्रामपंचायतींचा रात्रीचा पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात आला आहे.

शासनाने शासनाच्याच अंगिकृत महावितरण कंपनीला द्यायची रक्कम जिल्हा परिषदेमार्फत देण्याची शासन निर्णयामध्ये तरतूद केली असताना सदरच्या देयकांबाबत जिल्हा परिषदेने पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांकडे अहवाल मागवून देयकाची रक्कम भरण्यासाठी १० टक्के लेखाशीर्ष अनुदान देण्याची व्यवस्था २९ जून २०२२ च्या शासन निर्णयातून नमूद करण्यात आली आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या नियोजनामध्ये प्रशासन काळात दुर्लक्ष झाल्याने सदरची रक्कम महावितरणला अदा करण्याबाबत दुर्लक्ष झाले असल्याचे उघड झाले आहे. दुसरीकडे, काहीही झाले तरी शासनाने केलेली तरतूद स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत अदा होणार असल्याचे माहिती असूनही महावितरण कंपनीने पथदिव्यांचा विद्युतपुरवठा बिले न मिळाल्यामुळे खंडित केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त आणि पूरग्रस्त गावांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळीच बहुसंख्येने उद्भवणाऱ्या आपत्ती निवारणकामी पथदिव्यांचा प्रकाशझोत रस्त्यावर पडल्यास आपत्तीनिवारण आणि मदतकार्यासाठी सरसावणाऱ्यांना तसेच स्वत: बचावाचा प्रयत्न करणाऱ्या आपद्ग्रस्तांना दिलासा मिळू शकेल. तथापि गेल्या अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना रस्त्यावरून चालताना पुराच्या पाण्याचा तसेच दरडी रस्त्यावर आल्याचा अंदाज येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलादपूर पंचायत समितीच्या अहवालानुसार कुडपण, मोरसडे, पैठण आणि बोरघर या केवळ चार ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिवे सुरू असून उर्वरित ३८ ग्रामपंचायतींमध्ये काळोखाच्या साम्राज्यात अंधारवाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ३८ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ५२ महसुली गावे संभाव्य दरडग्रस्त असून सात गावे पुरग्रस्तही आहेत. यापैकी केवळ सवाद या ग्रामपंचायतीमध्ये रात्रीच्या वेळी पथदिवे सुरू ठेवण्याकामी महावितरण कंपनीवर राजकीय वजनाचा उपयोग झाल्याची चर्चा असताना हे राजकीय वजन तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींसाठी का खर्च झाले नाही?, असा सवालदेखील जनतेतून विचारला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -