Tuesday, November 12, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखआम्ही 'वारकरी' केव्हा होणार?

आम्ही ‘वारकरी’ केव्हा होणार?

ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक

महाराष्ट्रीय संतांनी भागवत धर्माची पताका उंचावत लोकांना समाजात मानवता रूजविण्याचा प्रयत्न केला. अन्याय, अत्याचार, दुराचार प्रवृत्तीवर वार करून समाजात मैत्रीभाव टिकावा. आनंदी कर्तव्यदक्ष समाज निर्मीतीसाठी संतांनी प्रयत्न केले. आज संतांच्या विचारांचे खरे वारकरी होण्याची नितांत गरज आहे. वारी करूनही आमच्यातील राग, लोभ, द्वेष, मोह, मस्तर संपत नसेल, तर आम्ही वारकरी कसे?

महाराष्ट्राचे दैवत पंढीराचा पांडुरंग येथील जनजीवनाच श्रद्धास्थान आहे. आषाढी आणि कार्तिकी या पंढरपूरच्या यात्रा. लाखो भाविकांची गर्दी. कोरोनाच्या महामारीवरून या महायात्रेवर चर्चा राजकारण सुरू झाले आहे. तसेही या देशात श्रद्धेला प्रबोधनासाठी आणि मानव कल्याणासाठी कमी राजकारणासाठी जास्त वापर होताना दिसतो. देवाची पूजा कोणी प्रथम करायची. शासनाचे कर्तव्य काय? यावर माध्यमांमधून चर्चा होतात. पण या यात्रांमागील खरा उद्देश फार कमी चर्चेला येतो. या विषयावर अशी चर्चा करणे म्हणजे आमच्या श्रद्धा दुःखावल्या म्हणून कंठशोष सुरू होतो. मुळात पंढरपूर यात्रेशी माझ्या अल्पबुद्धीने वेगळा आशय असावा. कारण ‘वारकरी’ शब्दाचा खरा अर्थ वारी करणे नसून अन्याय अत्याचार दुराचाराच्या विरोधात ‘वार’ करणे त्याला वारकरी म्हणण्याचा प्रघात पडला असावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात – आपुले वारकरी भाविक। तेचि वारकर्ते पाईक। करोनि दुष्टासि लाविला धाक। शिवाजीच जणू सर्वही॥ या ओवीला राष्ट्रसंतांनी जगदगुरू तुकाराम महाराजांना समर्पित करीत तुकाराम महाराजांच्या किर्तनात अध्यात्मासोबतच अन्याय-अत्याचाराविरोधात लढण्यासाठी टाळकरी म्हणजेच, सैनिकी प्रशिक्षण देण्याचे काम चालते असावे. ज्ञानबा-तुकाराम गजर करीत वारकरी जे पवित्रे घेतात, ते भाला तलवार आणि भाला चालविण्याचे पवित्रे आहेत. सूक्ष्मतेने अभ्यास केल्याने राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचा अर्थ कळतो. प्रश्न आता शिल्लक राहतो. संत नामदेव, संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेल्या पंढरपूर यात्रेमागचा खरा उद्येश काय असावा? माझ्या अल्प बुद्धीने पंढरपूरमध्ये या संतांचे संमेलन भरायचे. तुम्ही थोडा विचार करा जातीय व्यवस्थेचा. सामाजिक समस्यांचा, अन्याय, अत्याचाराचे निर्वारण करण्यासाठी जे नेतृत्व पुढे आले. त्यांना जनतेंनी संत संबोधले. संत नामदेव शिंपी, गोरोबा कुंभार, सावता माळी, तुकाराम महाराज, चोखामेळा ही सर्व लोकसमूहाचे नेतृत्व करणाऱ्यांचे अधिवेशन, पंढरपुरात वर्षातून दोनदा भरून, सामाजिक प्रश्नांवर विचारविनमय करून, लोकहिताचे निर्णय प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प ही संत मंडळी घेत असावी. त्या काळात वाहतुकीचे साधन मर्यादित, पदयात्रा करीत गावा-गावात प्रबोधन करीत ही संतमंडळी जायची. त्यातूनच पालखी कल्पना ही नंतर उदयास आली असावी, त्या संतांचे स्मरण म्हणून त्यांच्या विचारांचा वसा चालवणाऱ्यांनी पालख्या काढून त्यांचा जयजयकार करीत पंढरपूरला आषाढी-कार्तिकी यात्रेचे स्वरूप आले असावे. आजही भारतीय लोकशाहीत दोन अधिवेशन पावसाळी, हिवाळी दिल्ली-मुंबईत भरत असतात. भागवत धर्मात ज्याला आपण वारकरी संप्रदाय म्हणून संकुचित करतो, त्या प्रबोधन चळवळीत पंढरपूरच्या वारीला आणि पंढरपूरला, पंढरपूरपासून सहा कोसावर राहून संत सावता महाराज कधीच गेले नाही. तरी त्यांना आणि त्यांच्या साहित्याला वारकरी संप्रदायात सन्मानाच स्थान आहे. मित्रांनो आता यात्रा स्थळांवर गर्दी करून कोरोनासारख्या महामारीला जवळ करण्यापेक्षा, आता आपल्या गावचे कसे पंढरपूर करता येईल? संत विचारांप्रमाणे जात, पंथ, धर्म विरहित मानवतेवर आधारित, गावातील सर्व घटकांच्या समृद्धीचा विकास व्हावा, यासाठी संघटित प्रयत्न झाला, तर प्रत्येक गावाचे तीर्थ होईल. प्रत्येक गावाचे पंढरपूर होईल.

महाराष्ट्रीय संतांनी भागवत धर्माची पताका उंचावत लोकांना समाजात मानवता रूजविण्याचा प्रयत्न केला. अन्याय, अत्याचार, दुराचार प्रवृत्तीवर वार करून समाजात मैत्रीभाव टिकावा. आनंदी, कर्तव्यदक्ष समाजनिर्मितीसाठी संतांनी प्रयत्न केले. आज संतांच्या विचारांचे खरे वारकरी होण्याची नितांत गरज आहे. वारी करूनही आमच्यातील राग, लोभ, द्वेष, मोह, मस्तर संपत नसेल, तर आम्ही वारकरी कसे?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -