इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केले व स्वातंत्र्य चळवळीनंतर त्यांच्या जोखडातून आपला देश स्वतंत्र झाला. या काळातील ब्रिटिशांच्या अनेक गोष्टींची छाप अजूनही आपल्यावर कायम असल्याचे दिसत आहे. आताच असे म्हणण्याचे कारण म्हणजे युनायटेड किंगडममध्ये (ब्रिटन) देखील सध्या महाराष्ट्राप्रमाणेच राजकीय नाट्य रंगू लागले असून मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. ब्रिटनमध्येही महाराष्ट्राप्रमाणे ‘बंड’ झाल्याने राजकीय संकट उभे राहिल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याने बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदाची खुर्ची सोडावी लागली आहे. दिवसभरात ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी बंडखोरी करून राजीनामा दिल्याने सरकार अल्पमतात आले आणि बोरिस जॉन्सन यांनी अखेर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
याआधी त्यांनी हुजूर पक्षाच्या संसदीय गटनेतेपदाचा राजीनामा दिला होता. आता नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जॉन्सन हे काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत. या सर्व घडामोडींमध्ये भारतासाठी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. ऋषी सुनक हे भारतीय उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीमान्यासाठी मंत्र्यांचा दबाव दिसून आला, तर चोवीस तासांत जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत एकापाठोपाठ अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले. परिणामी बोरिस जॉन्सन यांचे सरकार अल्पमतात आले.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांनी बंडखोरी करत राजीनामा दिला, तर काहींनी त्यांच्यावर विश्वास नसल्याचाही आरोप केला. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. ब्रिटनचे तत्कालीन अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सर्वात आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर २४ तासांमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आणि पटापट ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला.
जॉन ग्लेन, प्रीती पटेल, ग्रँट शॅप्स, रिचेल मॅक्लिएन आदींनी आपले राजीनामे देत सरकारच्या अडचणींत वाढ केली. काही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस यांच्या निवासस्थानी जात आपले राजीनामे सादर केले, तर काहींनी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे पंतप्रधान बोरिस यांना राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. त्यात जॉन्सन हे आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी राजी नसल्याचे म्हटले जात होते. तसेच जॉन्सन यांच्याकडूनही आपल्या मंत्र्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांनी प्रत्येक मंत्र्यांसोबत स्वतंत्रपणे बैठका घेतल्या होत्या. ऋषी सोनक यांच्याऐवजी नदिम जहावी यांना अर्थखात्याची धुरा सोपवण्यात आली होती, तर स्टीव्ह बार्कले यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. मात्र मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या अविश्वासामुळे जॉन्सन यांनी हुजूर पक्षाच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांची पंतप्रधानपदावरूनही गच्छंती अटळ होती. अखेर त्यांनी आता पंतप्रधानपदाचाही राजीनामा दिला आहे.
ब्रिटनमध्ये महागाईने मागील ४० वर्षांतील उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी वाढल्याने नाराजी वाढली होती. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत हुजूर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचे असे झाले, जगभरात कोरोनाचा कहर कायम असताना प्रत्येक देशात कोरोनाचे निर्बंध लावण्यात आले होते. ब्रिटनमध्येही परिस्थिती तशीच होती. त्यावेळी ब्रिटनमध्ये चक्क पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याची बाब उघड झाली. ब्रिटनमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये जेव्हा कोरोनाची लाट शिगेला पोहोचली होती. तेव्हाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये जॉन्सन कोरोना नियमांचे उल्लंघन करत पार्टी करताना दिसत होते. या प्रकरणावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. दंड ठोठावल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर पुन्हा आवाज उठवत राजीनाम्याची मागणी केली. जॉन्सन यांनी दंड भरत जनतेची माफीही मागितली होती आणि राजीनामा देण्यास नकार दिला.
पंतप्रधान जॉन्सन यांच्या पार्टीची बातमी पुढे येताच ब्रिटनच्या जनतेने प्रचंड संताप व्यक्त केला होता. ‘सामान्य लोक त्यांच्या घरात कैद असताना पंतप्रधान स्वतः आनंद साजरा करत आहेत’, अशी कडवट टीका ब्रिटनच्या जनतेकडून करण्यात येत होती. जॉन्सन यांच्या घरी नियमांचे उल्लंघन करून झालेल्या या पार्टीमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत होती. पार्टीगेटप्रकरणी स्कॉटलंड यार्ड अर्थात लंडन महानगर पोलीस मुख्यालयाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार जॉन्सन यांच्यासह पत्नी केरी सायमंड्स यांचीही चौकशी झाली. डाऊनिंग स्ट्रीटच्या कॅबिनेट कक्षातच बर्थडे पार्टी करून लॉकडाऊनचा निर्बंध मोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. याबद्दल जॉन्सन यांच्याप्रमाणेच पत्नीलाही दंड ठोठावण्यात आला. सरकारी कार्यालयांत गैरवर्तन केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले. बोरिस जॉन्सन हे नियमांचे उल्लंघन करणारे आणि दंडाला सामोरे जाणारे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान बनले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा प्रचंड रोष आणि सतत होणारे आरोप यामुळे पुरते जेरीस आलेले बोरिस यांना अखेर पायउतार व्हावे लागले आहे.
स्वपक्षातील अनेक सदस्यांसह संसदेचे इतर सदस्य तसेच माजी मंत्र्यांनी पार्टीगेटवरून जॉन्सन यांच्यावर टीका केली होती. या प्रकरणामुळे मतदारांच्या लेखी पक्षाच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचे परखड मत अनेकांनी जाहीरपणे व्यक्त केले. राजकीय निरीक्षकांच्या मते अविश्वास ठरावाचा कौल ५७ वर्षीय जॉन्सन यांच्या बाजूने लागू शकतो. मात्र त्यांच्या नेतृत्वाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.