‘नेमेची येतो पावासाळा’, या म्हणीप्रमाणे पावसाळा आला की, मुंबई आणि परिसरात लहान-मोठ्या आणि तितक्याच जीवघेण्या अशा खड्ड्यांची मालिकाच सुरू होते. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या या मुंबई नगरीची पावसाळ्यात अनेकदा पाणी साचून ‘तुंबई’ झाल्याचे विदारक दृश्य सर्वत्र दिसते आणि हीच बाब सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला चटका लावून जाते. दर वर्षी पावसाळा सुरू होण्याआधीपासून नालेसफाईची ओरड सुरू होते. शहरात जागोजागी पाणी साचून सुरळीत असलेले जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने प्रथम नालेसफाई करून घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागते. त्यानंतर पालिका प्रशासन आणि संबंधित नगरसेवक हे नालेसफाई सुरू झाल्याची आणि किती प्रमाणात झाली याची जणू आवई उठवितात. कारण नालेसफाईची कामे हा संशोधनाचा विषय ठरावा, अशी त्याबाबत चर्चा होते.
दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होतात. पण प्रत्यक्षात नालेसफाई झाल्याचे दिसून येत नाही. कारण शहरातील अनेक प्रमुख आणि छोट्या-मोठ्या नाल्यांमधून पावसाळ्यात पाणी सहजतेने वाहून जात आहे, असे चित्र दिसत नाही व हे नाले तुंबले की, पाणी रस्त्यांवर येते आणि रस्त्यांचे रूपांतर जणू घाणयुक्त आणि मलयुक्त नद्यांमध्ये झालेले दिसते. नालेसफाईबरोबरच रस्त्यांवरील खड्डे हाही कधीही सुटू शकणार नाही, असा प्रश्न होऊन बसला आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे यंदाही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा जागोजागी तुंबली. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. या पावसामुळे मुंबईकरांची दैना झाली आणि नेहमीप्रमाणे सुरू झाले दोषारोपांचे सत्र. मोठ्या पावसात मुंबईकरांचे हाल होतात याला जबाबदार कोण? यावर नेहमीप्रमाणेच राजकारण सुरू झाले. पण मोठ्या पावसानंतर मुंबईची दैना का होते?, या प्रश्नाकडे मात्र सर्वच पक्ष डोळेझाक करीत आहेत.
गेल्या २६ जुलैच्या महाभयानक अशा प्रलयानंतर आपण कोणताही धडा घेतलेला नाही, हेच यातून सिद्ध होते. २६ जुलैच्या त्या प्रलयाने फार मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. विशेष म्हणजे मुंबई तुंबण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्लास्टिक पिशव्यांचा वारेमाप वापर आणि त्यांचा इतस्तत: फेकण्यामुळे झालेला कचरा. हा कचरा नाले, गटारांमध्ये अडकून पडला. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यावर पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याचा घटना घडली. ही गंभीर बाब ध्यानी अाल्यानंतर कित्येक वर्षांनी राज्य सरकारने आता प्लास्टिकवर बंदी घातली आहे. त्याची अंमलबजावणी अलीकडेच सुरू झाली असली तरी मुंबईत दररोज हजारो टन प्लास्टिक कचरा जमा होतो. या प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. याला प्रशासनाबरोबरच आपण नागरिकही तेवढेच जबाबदार आहोत, ही बाब येथे अधोरेखित कराविशी वाटते.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण केल्याचा महापालिकेचा दावाही पावसाने वारंवार फोल ठरवला आहे. मुंबईत याआधी मोठी मैदाने, उद्याने, मोकळ्या जागा खूप होत्या. त्यामुळे तिथे मातीत पाणी मुरले जायचे. गटारांतून पाण्याचा व्यवस्थित निचरा होत होता. आता मात्र मैदाने, मोकळ्या जागाच राहिल्या नाहीत. तथाकथित विकासकांनी आणि बिल्डरांनी मैदानांचा घास घेतला आहे. रस्तेदेखील सिमेंट आणि पेव्हर ब्लॉकचे बनले असून मुंबई जणू सिमेंटचे बेटच बनले आहे. त्यामुळे पाणी मुरायला जागाच उरलेली नाही. म्हणूनच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि समुद्रातील भरतीची वेळही एकच असली, तर ते सर्व पाणी समुद्रात न जाता नागरी वस्तीत शिरते. सरकारने प्लास्टिकवर घातलेली बंदी किती योग्य आहे, हे नागरिकांना उमगले असेल, असे समजायला हरकत नाही. गेले काही दिवस सतत पडलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते. मात्र यावेळी हिंदमाता परिसरात पाणी साचलेले दिसले नाही. त्याचा पालिकेकडून मोठा गाजावाजा केला जात असला तरी दादर पूर्व, माटुंगा, गांधी मार्केट, सायन, किंग्ज सर्कल, वडाळा, खार, सांताक्रुझ, अंधेरी, दादर, माहीम, भांडुप, मालाड, भायखळा, शिवडी, काळाचौकी, कॉटन ग्रीन अशा अनेक परिसरात पाणी साचले होते. पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झालेला दिसला. त्यामुळे वाहनांच्या मार्गातही बदल करण्यात आला.
मुसळधार पाऊस पडल्यावर रस्ते आणि लोकलची वाहतूक विस्कळीत होणे, ही नित्याचीच बाब झाली आहे. अशा अघोषित खोळंब्यामुळे शासनाचे, नागरिकांसह सर्वांचेच फार मोठे नुकसान होते. मुंबईवर गेली २५ वर्षे ज्यांची सत्ता आहे, त्या सत्ताधाऱ्यांचेच सर्वसामान्यांच्या या प्रश्नांकडे फार मोठे दुर्लक्ष झाले आहे, हे निश्चित. पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई व परिसरातील रस्त्यांवरचे खड्डे पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. मुंबईकरांना साचलेल्या पाण्यासोबत खड्ड्यांतूनही वाट काढावी लागत आहे. मुंबईत पाऊस पडला की, रस्त्यावर खड्डे पडणार हे जणू समीकरण ठरलेले आहे. हे खड्डे पडू नयेत, रस्ते शाबूत रहावेत, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले तरी समीकरण मात्र बदलले नाही. त्यामुळे मुसळधार पाऊस अन् पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गांसह अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे जणू साम्राज्यच पाहायला मिळते. या खड्डेमय मुंबईची तुंबई होणे जेव्हा थांबेल, तो सुदिन म्हणावा लागेल.