समर्थ राऊळ महाराज
अशाच प्रकारे चेंदवण गावचे श्री. राजाभाऊ पोयरेकर व त्यांचे कुटुंब, नातेवाईक महाराजांच्या कोणत्याही उत्सव प्रसंगी पिंगुळीस येत असत; परंतु एकदा त्यांना काय दुर्बुद्धी सुचली कोण जाणे. एका वर्षी आपला नित्य नेम चुकवून पोयरेकर कुटुंबीय, नातेवाइकांसह जवळच्या काळसे गावात गेली. त्यांच्याबरोबर एक ६ वर्षांचा व दुसरा १० वर्षांचा असे दोन मुलगे पण गेले होते. काळशाला जाताना नेरूरपार खाडी पार करून जात होती. अचानक ही दोन्ही मुले पाण्यात पडली. त्यावेळी सर्वजण घाबरून गेले व त्यांनी श्री राऊळ महाराजांची करुणा भाकली. बाबांचा धावा सर्वांनी केला आणि काय आश्चर्य २० ते २५ फूट खोल पाण्यात पडलेली ती दोन्ही मुले सुखरूपपणे वर आली. सर्वांना फार फार आनंद झाला. व सर्वांनाच महाराजांच्या या अगाध लीलेचे कौतुक वाटले.
यावरील घटनेवरून या अचाट दैवी सामर्थ्यांची कल्पना येते. आता त्यांनी आपला नित्यनेम कधीच मोडला नाही. ती दोन्ही मुले आता मोठी होऊन महाराजांच्या सेवेलाच त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे आणि ‘जो जे वांच्छील ते ते प्राप्त होईल’ या उक्तीनुसार आपल्याला जे पाहिजे असेल, ते जर नम्र भावनेने महाराजांजवळ मागितले, तर ते महाराज कृपा करून आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. मात्र श्रद्धा व सबुरी पाहिजे.