Wednesday, July 24, 2024
Homeमहत्वाची बातमीउत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपलं

उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपलं

स्वाती पेशवे

पालनजी मिस्त्री त्यांची कार्यप्रवणता उल्लेखनीय होती. उद्योगाचे प्रणेते असणाऱ्या पालनजींनी हाती घेतलेल्या असंख्य प्रकल्पांमध्ये कमालीचा उत्साह दाखवला. प्रकल्प पुढे नेण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान असे. मुंबईतल्या अनेक प्रतिष्ठित इमारती शापूरजी पालनजी ग्रुपने बांधल्या आहेत. ज्यात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची इमारत, ब्रेबॉर्न स्टेडियम, ताजमहाल पॅलेस हॉटेल, षण्मुखानंद सभागृह आदी महत्त्वाच्या इमारतींचा समावेश आहे.

देशाला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवणारे आघाडीचे उद्योगपती पालनजी मिस्त्री यांच्या निधनामुळे खूप मोठी हानी झाली आहे, यात शंका नाही. वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. जन्माला आलेला जीव कधी ना कधी इथली यात्रा संपवून परतत असतो. मात्र पालनजींसारखे काही चेहरे दिसेनासे होतात तेव्हा ती संबंधित कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण देशासाठी दु:खद बाब ठरते. उद्योगविश्वाला आकार देण्यात, नवनवीन संकल्पना राबवण्यात आणि नवतेचं वारं खेळवून अनेकांना रोजगार देण्यात अग्रेसर असणारी अशी नावं हे देशाचं खरं वैभव असतात. केवळ पैशाने नव्हे, तर व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, उद्योगशीलता आदी गुणांच्या सहाय्यानं त्यांनी अवघं अवकाश व्यापून टाकलेलं असतं. म्हणूनच अशा महनीयांचा मृत्यू जिव्हारी लागतो. अब्जाधीश असणारे पालनजी मिस्त्री हे शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष होते. मध्यंतरी टाटा समूहात मोठा वाद घडवून आणणाऱ्या सायरस मिस्त्री यांचे ते वडील होत. रतन टाटा यांच्यानंतर सायरस मिस्त्री यांनी काही काळ टाटा समूहाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. १.०२ लाख कोटी रुपयांची संपत्ती असणाऱ्या पालनजींची दूरदृष्टी उल्लेखनीय होती. २०१६ मध्ये केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरवलं होतं. हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. ते जगातले १४३वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.

१९२९ मध्ये एका पारशी कुटुंबात पालनजी मिस्त्री यांचा जन्म झाला. शापूरजी पालनजी ग्रुपची स्थापना १८६५ मध्ये झाली. त्यामुळे लहान वयापासून त्यांना उद्योगाचं बाळकडू मिळालं. पालनजी मिस्त्री यांचं शालेय शिक्षण मुंबईतल्या कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमध्ये पूर्ण झालं. त्यानंतर लंडनमधल्या इम्पीरिअल कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. पालनजी यांनी २००३ मध्ये लग्न केलं आणि आयरिश नागरिकत्व घेतलं. मात्र त्यांनी बहुतांश जीवन मुंबईमध्येच घालवलं. वयाच्या अठराव्या वर्षी ‘शापूरजी पालनजी ग्रुप’ या कौटुंबिक व्यवसायात ते सामील झाले आणि १९७० च्या दशकात दुबई, कतार आणि अबूधाबी इथेे व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत केली. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी केवळ भारत आणि मध्य पूर्वमध्येच नव्हे, तर दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतही आपला बांधकाम व्यवसाय विस्तारला. पुढे बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पाच अब्ज डॉलर्सचं मूल्यांकन असलेल्या या समूहाचे ते अध्यक्ष झाले. त्यांच्या कंपनीच्या सर्व महत्त्वाच्या कामगिरीमध्ये मुंबईतल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इमारतीच्या बांधकामाचाही आवर्जून उल्लेख केला जातो. त्यांच्या समूहाचा व्यवसाय अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, जल ऊर्जा, वित्तीय सेवा, कापड, अभियांत्रिकी वस्तू, गृहोपयोगी वस्तू, शिपिंग, प्रकाशनं, जैवतंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि आर्थिक सेवांमध्ये पसरलेला आहे. या गटात सुमारे पन्नास हजार कर्मचारी असून ते जगातल्या ५० देशांमध्ये व्यवसाय करत आहेत.

पालनजी मिस्त्री हे टाटा समूहातले सर्वात मोठे वैयक्तिक शेअरहोल्डर होते आणि समूहात त्यांचा १८.४ टक्के हिस्सा होता. ते टाटा समूहात ‘फँटम’ या टोपणनावाने ओळखले जात. त्यांच्या निधनाबद्दल देश-विदेशातल्या अग्रणींनी तीव्र दु:ख व्यक्त केलं. त्यांनी वाणिज्य आणि उद्योगजगतात अतुलनीय योगदान दिलं असल्याचं स्मरण अनेकांनी केलं. पालनजी मिस्त्री यांच्या निधनामुळे एका युगाचा अंत झाला असल्याची खंतही अनेकांनी बोलून दाखवली. त्यांना अलौकिक बुद्धिमत्तेचं वरदान लाभलं होतं. देश त्याचा साक्षीदार होता. काम करताना त्यांची सौम्यता अनेकांना भावत असे. त्यांची कार्यप्रवणता उल्लेखनीय होती. उद्योगाचे प्रणेते असणाऱ्या पालनजींनी हाती घेतलेल्या असंख्य प्रकल्पांमध्ये कमालीचा उत्साह दाखवला. मुंबईतल्या अनेक प्रतिष्ठित इमारती शापूरजी पालनजी ग्रुपने बांधल्या आहेत. यात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची इमारत, ब्रेबॉर्न स्टेडियम, ताजमहाल पॅलेस हॉटेल, मलबार हिलचा तलाव, षण्मुखानंद सभागृह, मुंबई सेंट्रल स्टेशन, एनसीपीए यासह अनेक तारांकित हॉटेल्स आणि भव्य तसंच महत्त्वाच्या इमारतींचा समावेश आहे. मिस्त्री शापूरजी पालनजी कन्स्ट्रक्शन लिमिटेड, फोर्ब्स टेक्सटाइल्स आणि युरेका फोर्ब्स लिमिटेड यासह अनेक कंपन्यांचे मालक होते. ते असोसिएटेड सिमेंट कंपनीचे अध्यक्षदेखील राहिले. एकूणच व्यापार आणि उद्योगक्षेत्रातलं त्यांचं योगदान वादातीत होतं. पत्नी पॅटसी पेरिन दुबाश आणि चार मुलं म्हणजे शापूर मिस्त्री, सायरस मिस्त्री, लैला मिस्त्री आणि आलू मिस्त्री हे त्यांचं कुटुंब उद्योगविश्वात वेगळी ओळख राखून आहे. शापूरजी पालनजी समूहाचं व्यवस्थापन शापूर करतात. सायरस यांनी २०१२ ते २०१६ दरम्यान टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. शापूरजी पालनजी ग्रुपला मोठ्या उंचीवर नेणारे पालनजी मिस्त्री यांचं जीवन खूप रंजक आहे. एकीकडे उद्योगजगतातली अनेक यशोशिखरं त्यांनी सर केली असतानाच दुसरीकडे त्यांना टाटा समूहासोबत संघर्ष करावा लागला. ही तीच कंपनी, जिच्याशी ते लहानपणापासून जोडले गेले होते. पालनजींच्या कर्तृत्वाबद्दल सांगायचं, तर एसपी ग्रुपला बांधकाम जगताचा राजा बनवण्याचं श्रेय त्यांना जातं. त्यांच्या नेतृत्वाखाली शापूरजी पालनजींचा बांधकाम व्यवसाय देशाच्या सीमा ओलांडून अनेक देशांमध्ये पोहोचला.

‘फोर्ब्स’च्या म्हणण्यानुसार, पालनजी मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील एसपी ग्रूपला परदेशातून मिळालेली पहिली निविदा ओमानच्या सुलतानचा राजवाडा बांधण्यासाठी होती. शापूरजी पालनजी ग्रुपने १९७६ मध्ये ओमानच्या सुलतानचा आलिशान राजवाडा बांधण्यास सुरुवात केली. फोर्ब्सच्या मते, ऑक्टोबर २०१९ पर्यंत त्यांची संपत्ती १४.४ अब्ज डॉलर इतकी आहे. २०२१ मध्ये, शापूरजी पालनजी गट टाटांपासून वेगळा झाला आणि त्यांचं ७० वर्षं जुनं नातं संपुष्टात आलं. पालनजींनी शापूरजी पालनजी समूहाला बांधकाम क्षेत्रापुरतं मर्यादित राहू दिले नाही. सध्या अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, पाणी, ऊर्जा आणि वित्तीय सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्येही या समूहाचं मोठं काम आहे.

युरेका फोर्ब्स या कंपनीची स्थापना त्यांनी केली. तिची गणना भारतातल्या सर्वोत्तम वॉटर प्युरिफायर ब्रँड्समध्ये केली जाते. शापूरजी पालनजी ग्रुपच्या या कंपनीने देशातल्या शहरी लोकांना शुद्ध पाणी प्यायला शिकवलं, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. ‘युरेका फोर्ब्स’ने ‘ऍक्वागार्ड’ या नावाने वॉटर प्युरिफायर आणलं आणि लोकांना शुद्ध पाण्याचं महत्त्व पटवून दिलं. एवढंच नाही तर, कंपनीने ‘युरेका फोर्ब्स’ या नावाने व्हॅक्यूम क्लीनर, एअर प्युरिफायर, होम सिक्युरिटी उत्पादनं आणि इतर उत्पादनंही सादर केली. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, शापूरजी पालनजी ग्रुप हा बांधकाम क्षेत्रातला मास्टर मानला जातो. पालनजी मिस्त्री यांना व्यावसायिक जगतात खूप आदर होता. ते कधीच सार्वजनिक मंचांवर दिसले नाहीत. लहान वयातच पालनजींनी वडिलांना बांधकाम व्यवसायाच्या पलीकडे जाऊन अन्य व्यवसायात पदार्पण करण्याचा सल्ला दिला होता, यावरून त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. पालनजींच्या उद्योगांमध्ये वैविध्य दिसून येतं. यामध्ये असोसिएटेड सिमेंट कंपन्या, नौरोसजी वाडिया अॅण्ड सन्स, ब्रॅडी ग्रुप, स्पेशल स्टील्स आणि युनायटेड मोटर्ससह मुंबईतल्या मोठ्या व्यावसायिक घराण्यांमधले शेअर्स खरेदी करणं समाविष्ट होतं. या सर्वांची नंतर निर्गुंतवणूक करण्यात आली. टाटांना मिस्त्रींच्या हेतूंबद्दल नेहमीच संशय होता. त्यामुळे त्यांनी पालनजींना अनेक वर्षं दूर ठेवलं.

१९८० मध्ये जेआरडी टाटा यांनी पालनजींना टाटा सन्सच्या बोर्डावर संचालक बनवण्यास सहमती दर्शवली. संचालक या नात्याने पालनजी यांनी टाटा व्यवस्थापनाच्या निर्णयांचं पालन करणार असल्याचं स्पष्ट केलं. पालनजींनी कारभारात कधीही हस्तक्षेप केला नाही, कधीही आव्हान दिलं नाही, कधीही सत्ता मागितली नाही. दुर्दैवाने, त्यांचे पुत्र सायरस यांनी समूहाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रतन टाटा आणि त्यांच्यामधले संबंध हळूहळू बिघडले आणि २४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायरस यांना कोणतीही सूचना न देता अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. टाटांशी झालेल्या संघर्षामुळे मिस्त्री यांच्यावर वाईट परिणाम झाला. या कुटुंबाने टाटा समूहाशी केलेल्या व्यवहारातून परंपरेनं उपभोगलेला मोठा महसूल गमावला. आर्थिक मंदीचा बांधकाम आणि रिअल इस्टेट बाजारावर परिणाम झाला आणि या व्यवसायातल्या इतरांप्रमाणे एसपी ग्रुपलाही कोविडच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला. २०२२ पर्यंत शापूरजी पालनजी समूहाने युरेका फोर्ब्स आणि स्टर्लिंग आणि विल्सन रिन्यूएबल एनर्जी कंपन्यांमधला आपला संपूर्ण हिस्सा विकून थकित कर्जाचा एक मोठा भाग अदा केला. तथापि, टाटा सन्समधल्या १८.३७ टक्के समभागावरील या कुटुंबाच्या मालकीपुढे प्रश्नचिन्ह कायम आहे. अनेक मुत्सद्दी खेळ्या आणि उद्योगजगतातल्या संघर्षामुळे शापूरजी पालनजी यांचं कर्तृत्व उजळून निघालं. त्यासाठीच ते या क्षेत्राच्या इतिहासात ओळखले जातील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -