महाराष्ट्रात महिला मंडळांची कमतरता नाही. गावोगावी आपल्याला महिला मंडळ दिसून येतात. महिलांनी एकत्र यावे, सांस्कृतिक कार्यक्रम करावे, थोडं समाजकार्य करावे यासाठी ही महिला मंडळं स्थापन होतात; परंतु आपल्या आजूबाजूच्या ७-८ पाड्यांमधल्या महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी स्थापन झालेलं पेण इथलं ‘अहिल्या महिला मंडळ’ हे एक आगळंवेगळं महिला मंडळ म्हणावं लागेल.
पेणमधल्या काही महिला काहीतरी काम करावं म्हणून एकत्र आल्या होत्या. त्याच दरम्यान १९९४ साली पुण्यामध्ये महिला चेतना परिषद झाली. या परिषदेला जवळजवळ ३३ जणी पेण इथून गेल्या होत्या. तिथल्या विचारांनी भारावून जाऊन या महिलानी समाजकार्य करायचं असेल, तर एक संघटना हवी असं मनात घेतलं होतं. त्याच वेळी १९९४-९५ साली नाशिकमध्ये शनिवार-रविवार असे ४ वेळा अशी पुन्हा एकदा ट्रेनिंग दिली गेली. त्यालाही या सर्व महिला उपस्थित राहिल्या होत्या. त्याच ठिकाणी आम्हाला असं सांगितलं गेलं की, आजूबाजूला ज्या महिला आहेत, त्या केवळ आत्मनिर्भरच नाही, तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वाससुद्धा आला पाहिजे. तिने आपल्या मुलांचं चांगलं संगोपन करावं, घरातील वृद्धांची चांगली देखभाल करावी, स्वच्छता यासाठी आपापल्या आजूबाजूच्या परिसरात काहीतरी काम आपण करावे, असे सांगितले गेले आणि त्यातूनच मग १९९६ साली अहिल्या महिला मंडळाची स्थापना झाली, असे मंडळाच्या अध्यक्ष वासंती देव सांगतात.
१९९७ ला संस्था रजिस्टर झाली. २५ वर्षांपासून मंडळातर्फे विविध क्षेत्रात आजूबाजूच्या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक उपक्रम सुरू झाले. आज जवळजवळ १६ ते १७ उपक्रम सुरू आहेत. प्रत्येक उपक्रमासाठी एक वेगळी समिती नेमली जाते. आज सर्व उपक्रमात मिळून जवळजवळ ४५ महिलांचा कर्मचारी वर्ग इथे काम करत आहे तसेच या सर्व कामांसाठी जवळजवळ ५० कार्यकर्त्याही इथे सामाजिक कार्य करायला येत असतात. संस्थेचे संपूर्ण काम महिलांकडूनच केलं जातं. अगदी गरज पडेल तेव्हाच पुरुष सहकाऱ्यांची मदत घेतली जाते, हे या महिला मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला विविध पिठं तयार करणे, महिलांसाठी शिवणाचे क्लास अशा कामांनी मंडळाची सुरुवात झाली. त्याच दरम्यान हेटवणे धरण प्रकल्प त्या भागात सुरू झाला होता आणि तिथल्या लोकांनी त्या भागात एक प्राथमिक शाळा सुरू करण्याची मंडळाला विचारणा केली. मंडळांने त्या भागात प्राथमिक शाळा सुरू केली आणि कामाला खऱ्या अर्थाने गती आली. आज तिथे दोन बालमंदिर आणि पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा सुरू असून १९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १९९९ सालापासून ‘स्वाद भारती’ हा उपक्रम मंडळाने सुरू केला.
गरीब विद्यार्थी तसेच लांबून कामासाठी शहरात आलेल्याना सकस आहार अल्प दरात मिळावा यासाठी ही योजना सुरू झाली आहे. १९९६ सालीच ‘स्वयंसिद्धा’ हा उपक्रम हाती घेऊन आजूबाजूच्या गरीब महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी शिवण, चित्रकला, विणकाम, गणपती तयार करणे याचं प्रशिक्षण दिलं जातं. आतापर्यंत ३०० आदिवासी महिलांनी या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलं आहे. १९९६ सालीच “माहेर” हा उपक्रम हाती घेण्यात आला. नोकरी करणाऱ्या महिलांना घरी विविध प्रकारचे पदार्थ तयार करायला वेळ नसतो, अशा महिलांना घरगुती आणि दर्जेदार पदार्थ मिळावे त्यासाठी लोणची, खाऊ, गोड पदार्थ तयार करून विक्री केली जाते. आदिवासी आणि दुर्गम भागातील महिलांचे अनेक प्रश्न मंडळाच्या नजरेसमोर आले. नवऱ्याने दारू पिऊन मारझोड करणे, बालविवाह अशा अनेक समस्यांमध्ये महिलांना सल्ला देण्यासाठी काऊन्सलिंग सेंटरची उभारणी करण्यात आली. आतापर्यंत या केंद्रामुळे आठ जोडप्यांचा संसार पुन्हा आनंदाने सुरू झाला आहे तसेच पाचजणांनी दारूचे व्यसनही सोडलं आहे. कामधंद्यासाठी शहरात जाणाऱ्यांची संख्या आता खूप वाढत असून वृद्ध एकटे पडत आहेत, अशांसाठी २००३ साली “संजीवन वृद्धाश्रम”ही संस्थेतर्फे सुरू करण्यात आलंय. डॉक्टर गजानन घाटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचे घर संस्थेला दान केलं. याच ठिकाणी अत्यल्प दरामध्ये वैद्यकिय सुविधा पुरविल्या जातात.
केवळ सामाजिक कार्यच नाही, तर सांस्कृतिक कार्यदेखील संस्थेतर्फे केले जाते. संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी मानली जाते. तिचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी “इंदिरा संस्कृत पाठशाळा” सुरू करण्यात आली आहे. आजपर्यंत तिथे विविध वयोगटातल्या १०० जणांनी संस्कृत प्रशिक्षण घेतले आहे. शास्त्रीय नृत्यची आवड असणाऱ्या मुलींसाठी “नटराज नृत्यालयाची” स्थापना करून तिथे नृत्याचे वर्ग चालवले जातात. आतापर्यंत साठ मुलींनी या ठिकाणी कथ्थक प्रशिक्षण घेतले आहे. लहान मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी ‘स्वानंद संस्कार वर्ग’ दररोज संध्याकाळी चालतो. या ठिकाणी मुलांना विविध खेळ, झाडावर चढणे, निसर्गाशी नातं जपणे आणि इतरही संस्कार हसत खेळत शिकवले जातात. त्याशिवाय महिलांना स्वस्त व शुद्ध जळण मिळावी म्हणून सौरचुली देणे, शेतकाम करताना वापरण्यासाठी रेनकोट देणे, कुपोषित मुलांसाठी शिबिरे घेऊन औषध देणे, महिलांसाठी गर्भार अवस्थेत असताना वैद्यकीय सेवा देणे, असे उपक्रम चालतात. आजूबाजूच्या जवळ जवळ १३ ते १५ किलोमीटर परिसरातल्या गरीब मुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांची निवासी व्यवस्था मंडळातर्फे केली जाते. आज तिथे जवळजवळ ३० आदिवासी मुली निवास करून शिकत आहेत. महिलांना नर्सिंग, कॉम्प्युटर, शिवण शिक्षण दिले जाते. यात लहान मुलांचे कपडे, दुलया शिवणे, मसाले बनवणे, लोणची याच प्रशिक्षण दिले जाते. अशा तऱ्हेचे प्रशिक्षण देऊन आजपर्यंत अंदाजे १०० महिलांना रोजगारही मंडळातर्फे पुरवण्यात आला आहे.
या महिलांना घर सांभाळून घरच्या घरीच काम करता येतात. वेगवेगळ्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार बनवून देण्याचे कामही मंडळातर्फे केलं जातं. या कामामुळे ही अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. जवळजवळ ९०० ते १००० मुलांना शालेय पोषण आहार मंडळातर्फे पुरवला जातो. अशा विविध आयामांवर काम सुरू आहे. मुला-मुलींना शिक्षण, महिलांच्या हाताला काम, वृद्धांसाठी वृद्धाश्रम ही काम सुरू आहेत. त्याशिवाय स्वतःची एक शाळेची स्वयंपूर्ण वास्तू तसेच महिलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देणार एक मोठं केंद्र सुरू करण्याची अशी मंडळाची भविष्यातील योजना आहे. शिवाय आजूबाजूच्या आदिवासी वाड्या-वस्त्यांवर प्रत्यक्ष जाऊन त्यांना सर्वांगीण मदत करणे हे काम वाढवण्याचा देखील भविष्यात विचार आहे. शाळेच्या बांधकामाचे काम सुरूही झाले आहे. समाजातील सर्व वयोगटातील आणि सर्व घटकांचा विचार करून प्रत्येक वयोगटासाठीच्या त्या वयातील गरजांचा विचार करून ‘अहिल्या महिला मंडळ’ पेण तालुक्यातील सात-आठ गावांमध्ये विविध उपक्रम राबवत आहे. महिलांनी महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी चालवलेली महिलांची ही आदर्श संस्था म्हणावी लागेल.