जम्मू (हिं.स.) : जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रा तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील अनेक भागात रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे पहलगाम आणि बालटाल भागात दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच वातावरण निरभ्र होईपर्यंत भाविकांना बेस कॅम्पमध्ये थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काश्मीर खोऱ्यात पुढील २४ ते ३६ तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्री उशिरापासून खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. गेल्या ३० जून रोजी यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४० हजार २३३ भाविकांनी येथे भेट दिली आहे. आतापर्यंत ७२ हजारांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फापासून बनवलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. अमरनाथ यात्रा ११ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर संपणार आहे.