विलास खानोलकर
ब्रह्मा विष्णू महेशाचेच अवतार त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्तगुरू व त्यांचेच पुढील आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ अवतार म्हणजे स्वामीसमर्थ महाराज. श्रीस्वामींचा भक्तगण साऱ्या जगभर पसरला आहे व अनेक ठिकाणी त्यांची देवळे, मंदिरे व मठ स्थापन करण्यात आले आहेत. असाच एक जगप्रसिद्ध मठ म्हणजे नांगरगाव लोणावळ्यातील तपोभूमी म्हणजे श्रीस्वामीराज जनकल्याण केंद्र आज जवळपास बावीस वर्षे “अहर्निषम् सेवामहे’’ याप्रमाणे भक्त कल्याणासाठी गोरगरिबांसाठी कार्यरत आहे. सुरुवातीला गरीबांसाठी अन्नदानाने सुरू झालेले हे केंद्र पूर्ण मावळ, लोणावळा, पुणे प्रांतात सुप्रसिद्ध आहे. रोज १२ ते ३ अन्नदान चालते. तसेच शिक्षणसेवा, हीच राष्ट्रसेवा मानून अनेक विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके, शालेय साहित्य, दप्तरे वाटण्यात येतात. तसेच परिपूर्ण शालेय मार्गदर्शन, कॉम्प्युटर मार्फत मार्गदर्शन दहावी-बारावी मार्गदर्शन चालते. विद्यार्थी दत्तक योजनाही राबविली जाते. तसेच रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून हजारो पेशंटासाठी मोफत निरनिराळे वैद्यकीय शिबिरे घेतली जातात. त्यामार्फत चष्मा वाटप, मोतीबिंदू ऑपरेशन मोफत केली जातात. कान-नाक, घसा, हृदयाचे डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर, फ्री ईसीजी, रक्त तपासणी व रुग्ण उपचार मोठ्या प्रमाणात चालतात. तसेच तरुणांना उद्योगपती होण्यासाठी केंद्रसरकार/महाराष्ट्र सरकारची कौशल्य विकास योजनाही राबविण्यात येते. स्वामींची प्रसन्न चित्ताने बसलेली मूर्ती अत्यंत आनंदाने साऱ्या परिसरातील भक्तजनांना हसतहसत तेजस्वी नेत्राने आशीर्वाद देत असते.
हिरव्यागार वनराईत स्थापन झालेली संस्था, २ मजली प्रशस्त इमारत झाली आहे. संस्थेचे लवकरच इस्पितळ व वृद्धाश्रम चालू करण्याच्या विचारात आहे. संस्थेचे अध्यक्ष बाळ कशाळीकर, सचिव अभय वैद्य, खजिनदार कोरगांवकर व स्वामीभक्त सदस्य अनिल कुलकर्णी, महादेव टिकम मेहनत घेऊन स्वामीभक्त सेवा करत असतात. उत्कृष्ट, नयनरम्य परिसरातील लोणावळा हायवे-टच नांगर गावातील स्वामीराज जनकल्याण केंद्र सर्व स्वामीभक्तांना सदोदीत साद घालत आहे व सांगत आहे,“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”
लोणावळ्यात अवतरले स्वामी
भक्त म्हणती सेवेकरी आम्ही।।१।।
साऱ्यांवरती स्वामींची कृपा
लहानांवरती जास्तीच कृपा ।।२।।
विद्यार्थ्यांवर प्रचंड कृपा
माता कन्यका सदाकृपा ।।३।।
पालक बालक शीतल कृपा
नवजन्मावर अतिनील कृपा ।।४।।
अपंगांनाही सावरे स्वामीकृपा
अंधाची काठी स्वामीकृपा।।५।।
वृध्द विकलांग बरी कृपा
रोगी महारोगी सत्वर कृपा ।।६।।
फक्त निष्ठा हवी पायी स्वामी
रस्ता दाखविती खरेच स्वामी ।।७।।
हवी निशंक विश्वास स्वामी
श्वासा श्वासात वसले स्वामी।।८।।
निर्मळ निर्गुण सदाहरीत स्वामी
गर्वीष्टांचे गर्वहरण करती स्वामी ।।९।।
नको स्वामीस पैपैसा नामी
स्वामीकडे नाही काही कमी ।।१०।।
वाममार्गाला जाणारे होतील कमी
गर्व कमी होऊन जाईल मी ।।११।।
एकमेकांत वाढवेल प्रेम स्वामी
कुटुंबावर परिणाम दूरगामी।।१२।।
कुटुंबात जसा कुटुंब प्रमुख नामी
सौरमंडळात उच्च ग्रही स्वामी ।।१३।।
काळोख्या नभात चंद्र सम स्वामी
पहाटेच्या दवबिंदूवर रंग उधळे
स्वामी ।।१४।।
कोकीळ कंठी गाई स्वामी
विठू मैनातही वसे स्वामी ।।१५।।
सोनचाफ्याच्या सुगंधात स्वामी
गुलाबाच्या गुलकंदात
स्वामी ।।१६।।