पल्लेकेले (वृत्तसंस्था) : रेणुका सिंग, मेघना सिंग, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड या भारताच्या गोलंदाजांनी सोमवारी अप्रतिम सांघिक गोलंदाजी केली. त्यामुळे यजमान श्रीलंकेला ५० षटकांत केवळ १७३ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या भारताच्या स्मृती मन्धाना (नाबाद ९४ धावा) आणि शफाली वर्मा (नाबाद ७१ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसराही सामना जिंकत भारतीय महिला संघाने २-० अशी मालिकाही खिशात घातली आहे.
श्रीलंकेच्या १७४ या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या भारताने दडपण झुगारून फलंदाजी केली. सलामीवीर स्मृती मन्धाना आणि शफाली वर्मा या दोघीही यजमानांच्या गोलंदाजांवर तुटून पडल्या. विजय तर भारताच्या आवाक्यात होताच, पण त्यासाठी भारत किती विकेट गमावतो आणि किती षटकांत हे लक्ष्य पूर्ण करतो? याकडे लक्ष लागले होते. पाहुण्यांच्या सलामीवीरांनी बिनधास्त फलंदाजी करत २५.४ षटकांत १७४ धावांचे लक्ष्य सहज गाठले. त्यात स्मृती मन्धानाने ८३ चेंडूंत नाबाद ९४ धावा तडकवल्या. त्यात ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. शफालीने ७१ चेंडूंत ७१ धावा ठोकल्या. या खेळीत तिने ४ चौकार आणि १ षटकार लगावला.
तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकत भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. रेणुका सिंग, मेघना सिंग, दीप्ती शर्मा या गोलंदाजांच्या तिकडीने श्रीलंकेच्या फलंदाजीचा कणा मोडला. त्यातून सावरणे श्रीलंकेला शेवटपर्यंत जमले नाही. रेणुकाने ४, तर मेघना आणि दीप्तीने प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. राजेश्वरी गायकवाडला बळी मिळवता आला नसला तरी तिने आपली १० षटके पूर्ण टाकत अवघ्या २४ धावा दिल्या. धावा वाचविण्यात तिला चांगलेच यश आले. अमा कांचनाने संयमी खेळी खेळत श्रीलंकेतर्फे सर्वाधिक नाबाद ४७ धावा केल्या. भारताच्या रेणुका सिंगला सामनावीर पारितोषिकाने गौरविण्यात आले.