दीपक परब
माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यश-नेहा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नेहा-यशचा सुखी संसारही सुरू झाला आहे. अशातच नेहाने १०० कोटींचं डील जिंकलं आहे. यश-नेहाच्या लग्नानंतर यशच्या आजोबांनी नेहाच्या खांद्यावर एक विशेष जबाबदारी सोपवली. आजोबांनी नेहावर कंपनीची जबाबदारी सोपवली. नेहाकडे पहिलीच जबाबदारी १०० कोटींचं डील जिंकण्याची होती. त्याप्रमाणे नेहा यशस्वीपणे १०० कोटींचं डील जिंकली आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात पॅलेसवरील सर्व मंडळी नेहाचे कौतुक करताना दिसणार आहेत.
नेहा १०० कोटींचं डील जिंकू नये यासाठी सिम्मी काकूने अनेक प्रयत्न केले होते. नेहाने रात्रभर जागून बनवलेले प्रेझेंटेशन सिम्मी काकूने डीलीट केले होते. तसेच या प्रेझेंटेशन जागी नेहा-यशचा लग्नाचा व्हीडिओ टाकला होता. पण नेहाने त्या प्रेझेंटेशनचा चांगला अभ्यास केल्याने सिम्मी काकूच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे सिम्मी काकूची चांगलीच फजिती झाली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत आता नवं वळण येणार आहे. मालिकेत आता अविनाश परीचा ड्रायव्हर म्हणून दिसणार आहे. परीला तिच्या खऱ्या वडीलांची ओळख पटणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अविनाश पॅलेसवर आल्यामुळे मालिकेत एक नवं नाट्य सुरू होणार आहे. अविनाशच्या मदतीने सिम्मी काकू नवी खेळी खेळणार का? असाही प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे हे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
अटलजींवरचा सिनेमा येतोय!
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा, तर मराठीत ऐतिहासिक चित्रपटांचा सीझन सुरू आहे. अनेक दिग्गजांवर सिनेमे येत आहेत आणि लोकांचीही त्यांना पसंती मिळत आहे. आता भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरच्या सिनेमाची घोषणा झाली आहे. ‘मैं रहूं या ना रहूं, ये देश रहना चाहिए – अटल’ असे या सिनेमाचे नाव आहे. हा सिनेमा त्यांच्या आत्मचरित्रावरच्या पुस्तकावर आधारित आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून अजून तरी सिनेमातल्या कलाकारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. पण सिनेमाचं शूटिंग २०२३ मध्ये सुरू होणार आहे. हा सिनेमा वाजपेयींच्या ९९व्या जयंतीला २५ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होईल. त्यांच्या जन्मदिनी सिनेमा थिएटरमध्ये पाहता येईल. या टीझरमध्ये वाजपेयींच्या आवाजात भाष्य ऐकू येतं.या सिनेमाचे निर्माते आहेत विनोद भानुशाली आणि सुशांतसिंह राजपूत खटल्यामुळे चर्चेत आलेले संदीप सिंह.
मराठमोळ्या रुचिरा जाधवचा बोल्ड लूक
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. रुचिराने नुकतेच तिचे बिकिनीतील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. स्वीमिंग पूलमध्ये रुचिराने केलेलं बोल्ड फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. बिकिनीमध्ये रुचिराचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. रुचिरा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे रुचिराला प्रसिद्धी मिळाली.