अमरावती (हिं.स.) : नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कथित पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांडातील मुख्य आरोपीसह आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हे यांचा ६ आरोपींनी गळा चिरून खून केला होता. या हत्याकांडात एकापाठोपाठ एक मोठे खुलासे उघड होत आहेत. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, मृत उमेश कोल्हे याच्या हत्येत जवळचा मित्र युसूफ खान याचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उमेश कोल्हे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांच्या गळ्यावर ५ इंच रुंद, ७ इंच लांब आणि ५ इंच खोल जखमा आढळून आल्या. चाकूने मेंदूच्या मज्जातंतूला इजा झाल्याचे अहवालात पुढे म्हटले आहे. यासोबतच श्वासोच्छवासाची नळी, अन्नाची नळी आणि डोळ्याच्या नसांनाही मोठी इजा झाली आहे. विशेष म्हणजे, कुणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपी युसूफ हा उमेशच्या अंत्यसंस्कारात आला होता.
व्हाट्सअॅपवर शेअर केली पोस्ट
युसूफ खान हा ‘ब्लॅक फ्रीडम’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा सदस्य आहे. या ग्रुपमध्ये उमेशने नुपूर शर्माला सपोर्ट करणारी पोस्ट फॉरवर्ड केली होती. त्यानंतर युसूफ खानने ती पोस्ट ‘रहबरिया ग्रुप’ला पाठवली. त्या ग्रुपमध्ये हत्याकांडातील मास्टरमाइंडही होता. कोल्हे यांची ती पोस्ट पाहून चिडलेल्या आरोपीने १६ जून रोजी साथीदारांसोबत बैठक घेतली आणि उमेशच्या हत्येचा कट रचला. यानंतर कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.