Thursday, October 10, 2024
Homeमहत्वाची बातमीदाक्षिणात्य चित्रपटांच्या छायेखाली...

दाक्षिणात्य चित्रपटांच्या छायेखाली…

श्रीशा वागळे

मागील काही महिन्यांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांनी दणकून कमाई केली. या चित्रपटांच्या कमाईचा आकडा एक हजार कोटी रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे हिंदी चित्रपट मात्र २००-३०० कोटी रुपयांच्या क्लबपलीकडे जात मोठी कमाई करणं आवश्यक आहे. दाक्षिणात्य चित्रपटांशी स्पर्धा न करता स्वतःचं वेगळेपण जपत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याच जाणकारांचं मत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीदरम्यान मोठी चढाओढ पहायला मिळाली. दाक्षिणात्य कलाकार हिंदीतल्या कलाकारांवर कुरघोडी करत असल्याचं दिसून आलं. आपली चित्रपटसृष्टी श्रेष्ठ असून आपल्या भाषेत चांगल्या दर्जाचे चित्रपट निर्माण होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या तुलनेत हिंदी चित्रपटसृष्टी मागे पडत असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. गेल्या महिन्यांमधल्या दाक्षिणात्य चित्रपटांनी हिदी पट्ट्यामध्ये मोठं यश मिळवल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये खंड पडला नाही. दाक्षिणात्य चित्रपट आता देशव्यापी झाले आहेत. दक्षिणेसोबत हिंदी पट्ट्यातल्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याचं गुपित त्यांना उलगडलं आहे. प्रेक्षकांचं पूर्ण मनोरंजन व्हावं, याची खबरदारी दाक्षिणात्य चित्रपटांकडून घेतली जात आहे. हे चित्रपट जगभरात जवळपास हजारो कोटी रुपयांची कमाई करताना दिसत आहेत.

एकीकडे दाक्षिणात्य चित्रपट मोठी कमाई करत असताना हिंदी चित्रपटसृष्टी मात्र २०० ते ३०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये अडकून पडली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीने त्या पलीकडे जाऊन विचार करणं आवश्यक आहे. जगभरातल्या प्रेक्षकांना आकर्षित करणारे विषय हिंदी चित्रपटसृष्टीने हाती घेणं आवश्यक असल्याचं जाणकारांचं मत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत एखाद-दुसरा दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब होऊन येत असे. आता मात्र त्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. हिंदीतल्या प्रेक्षकांना दाक्षिणात्य चित्रपटांची भुरळ पडताना दिसत आहे. ‘बाहुबली द बिगिनिंग’पासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने मोठी भरारी घ्यायला सुरुवात केली. या चित्रपटाने प्रभास नावाच्या अभिनेत्याची ओळख सपूर्ण जगाला, विशेषतः हिंदीतल्या प्रेक्षकांना करून दिली. आधी दक्षिणेतले एखाद-दुसरे कलाकार हिंदीत येत असत. त्यामुळे हिंदीतल्या प्रेक्षकांना तेवढीच नावं माहित असायची. मात्र गेल्या चार-पाच वर्षांमध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली. हिंदी चित्रपटसृष्टीपुढे दाक्षिणात्य चित्रपटांचं आव्हान उभं ठाकल्याचं दिसून येत आहे.

आज हिंदी पट्ट्यात फारशा माहीत नसलेल्या दाक्षिणात्य कलाकारांचे चित्रपट दणकून कमाई करत आहेत. ‘पुष्पा’ हे याचं उत्तम उदाहरण ठरला. अल्लू अर्जून हा कलाकार हिंदी पट्ट्यात फारसा परिचित नव्हता. मात्र त्याच्या ‘पुष्पा’ने हिंदी पट्ट्यात शंभर कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला. खरं तर ही गोष्ट बॉलिवूडसाठी अनपेक्षित म्हणावी लागेल. त्याच काळात रणवीर सिंहचा ‘८३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र प्रेक्षकांनी ‘८३’पेक्षाही ‘पुष्पा’ला पसंती दिल्याचं दिसून आलं. अल्लू अर्जुनचे संवाद प्रेक्षकांच्या ओठी होते. ‘८३’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट होता. भारताच्या १९८३ मधल्या विश्वचषक विजयावर आधारित असलेल्या या चित्रपटाला क्रिकेटवेड्या भारतामध्ये भरपूर कमाईची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसं होऊ शकलं नाही. दीपिका पदूकोण, रणवीर सिंह असे नावाजलेले कलाकार आणि कबीर खानसारखा लोकप्रिय दिग्दर्शक असूनही चित्रपट निर्मितीमूल्य वसूल करू शकला नाही. दुसरीकडे ‘पुष्पा’ सातत्याने चांगली कमाई करत होता. हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या विचारसरणीत आणि चित्रपटांच्या मांडणीत बदल करणं किती आवश्यक आहे हे ‘पुष्पा’च्या यशावरून लक्षात येतं.

अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ आणि ‘पृथ्वीराज’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकले नाहीत. सम्राट पृथ्वीराजसारख्या ऐतिहासिक चित्रपटाकडून मोठ्या यशाची अपेक्षा असताना शंभर कोटी रुपयांचा आकडा गाठणं या चित्रपटाला शक्य झालं नाही. अक्षयकुमारचा ‘बच्चन पांडे’ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. मात्र हा चित्रपटही आपटला. अक्षय कुमार हे खरं तर बॉलिवूडमधलं खणखणीत वाजणारं नाणं. अक्षय कुमारचा परिसस्पर्श असलेले चित्रपट चालतात, असा सर्वसाधारण समज आहे. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांचे चित्रपट आपटत असताना अक्षय कुमारने बॉलिवूडला चांगलं यश मिळवून दिलं. मात्र आता अक्षय कुमारची जादू फिकी पडत चालली आहे की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतर आपण पुन्हा हाऊसफुल्ल, राऊडी राठोडसारखे प्रेक्षकांचं धमाल मनोरंजन करणारे चित्रपट करणार असल्याचं वक्तव्य अक्षय कुमारनं केलं होतं. मात्र ‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशामधून बोध न घेता पुन्हा विनोदी चित्रपटांकडे वळण्याचा अक्षय कुमारचा निर्णय हास्यास्पद म्हटला पाहिजे. मुळात अक्षय कुमार सम्राट पृथ्वीराज यांच्या भूमिकेत शोभून दिसला नाही. अक्षय कुमार आणि चित्रपटाची नायिका मानुषी छिल्लर यांच्या वयातलं अंतरही नजरेत चांगलंच भरत होतं. एका तरुण आणि धाडसी सम्राटाच्या भूमिकेमध्ये वयस्कर अक्षय कुमार फारसा शोभून दिसला नाही आणि त्याला पृथ्वीराजच्या अपयशाला सामोरं जावं लागलं. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर त्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपट निश्चितच उजवे ठरलेले दिसतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -