Sunday, March 23, 2025
Homeदेशनुपूर शर्मांनी देशाची माफी मागावी- सर्वोच्च न्यायालय

नुपूर शर्मांनी देशाची माफी मागावी- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर देशातील वातावरण बिघडले. तुम्ही माफी मागण्यास उशीर केल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. यावेळी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना देखील खडे बोल सुनावले.

याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना म्हटले की, तुम्ही स्वत: वकील असूनही बेजबाबदारपणाचे वक्तव्य केले आहे. सत्तेची हवा डोक्यात शिरता कामा नये. ज्या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकाने भडकवण्याचे काम केले तर त्यांच्या विरोधात गु्न्हा दाखल का करू नये..? असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला आहे.

दिल्ली पोलिसांना खडसावताना न्यायालय म्हणाले की, नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांमध्ये पहिल्यांदा एफआयआर नोंदवण्यात आला. मग, त्याविरोधात तुम्ही कारवाई का केली नाही..? असा सवाल न्यायालयाने केला.

या सुनावणी दरम्यान, नुपूर शर्मा यांचे वकील अॅड. मनिंदर सिंह यांनी सांगितले की, टीव्हीवर काही पॅनलिस्ट वारंवारपणे शिवलिंगाबाबत अपमानास्पद वक्तव्ये करत होते. नुपूर शर्मा यांचा कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. कोर्टाची ही भूमिका असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असेल असे सिंह यांनी म्हटले. तर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत काही जबाबदारीदेखील असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. एकच एफआयआर योग्य ठरवायचे असल्यास हायकोर्टात दाद मागा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. दिल्लीतील एफआयआरचे काय झाले, असा प्रश्न करताना दिल्ली पोलिसांनी तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरले असावे, अशा शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, नुपूर शर्मा यांनी यापूर्वीच आपल्या वक्तव्यावर ट्विट करत खेद व्यक्त केला आहे. कुणालाही दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी रागात काही गोष्टी बोलले. भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द परत घेते. माझ्या लाडक्या शिवाचा अपमान होत होता. वारंवार होणारा अपमान सहन होत नव्हता, अशा शब्दात त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -