रिक्षाचालक ते मुख्यमंत्री

ठाणे (प्रतिनिधी) : मुंबईनंतर ठाणे शहर हे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू समजले जाते. स्वर्गीय आनंद दिघे यांनी या शहरात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. त्यांच्यापाठोपाठ जिल्ह्यात शिवसेना नामशेष होणार, असे वाटत असताना एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या ताकदीवर आणि संघटन कौशल्य दाखवून शिवसेनेला पुन्हा ऊर्जितावस्था दिली. रिक्षाचालक ते शिवसेना गटनेता असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. घरात कोणताही राजकीय वारसा नसताना एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्याच्या नव्हे, तर राज्याच्या राजकारणात एक उंची गाठली आहे.


एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८०च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे नगरविकास मंत्री या पदापर्यंतची त्यांची वाटचाल झाली.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला.


गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता.


१९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच नेतृत्व होते.


जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील नगरविकासमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) ही खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली.

Comments
Add Comment

Kalyan Crime : कल्याण हादरले! १७ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली; तरुण मजुराचा जागीच मृत्यू, तर दुसरा मृत्यूशी देतोय झुंज

कल्याण : कल्याण शहरात एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. येथील विकास

ई-चलन न भरल्यास उमेदवारी अर्ज होणार बाद!

वाहतूक शाखेकडे इच्छुक उमेदवाराने भरले तब्बल दीड लाखांचे ई-चलन ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास

ठाणे ‘सिव्हिल’ने तरुणीला दिले नवे आयुष्य

अपघातग्रस्त तरुणीवर जबड्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी ठाणे : नेरळ परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण