पुणे : राज्यातील चार कोटी जमीनमालकांचे आता प्रोफायलिंग तयार करण्यात येणार आहे. या प्रोफाइलमध्ये जमीनमालकाचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी यांची माहिती असणार आहे. त्यानंतर सातबारा उताऱ्याशी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी लिंक करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे. या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंद, बोजा आदींची माहिती खातेदाराला एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून समजणार आहे. तसेच जमिनींची परस्पर विक्री होत असल्यास ही बाब खातेदारांना एसएमएसच्या माध्यमातून समजणार असून, या माध्यमातून फसवणूक रोखणे शक्य होणार आहे.
गेल्या काही वर्षांत जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. परस्पर जमिनींचे व्यवहार करणे, बोगस कागदपत्रे सादर करून सातबारा उताऱ्यावर नावे दाखल करणे, बोजा चढविणे, वारस नोंद घालणे असे प्रकार होत आहेत. फसवणूक झाल्यानंतरच जमिनींच्या मालकाला याची माहिती कळते. असे प्रकार टाळण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीची माहिती संबंधित जमीन मालकाला समजण्यासाठी महसूल विभागाने सातबारा उताऱ्याशी मोबाईल क्रमांक लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे.