डब्लिन (हिं.स.) : भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने आयर्लंडवर ४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने २-० ने आघाडी घेत मालिकाही आपल्या नावे केली आहे.
या आधी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडवर विजय मिळवला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत यजमानांना २२८ धावांचे आव्हान दिले होते. दीपक हुडाचे धडाकेबाज शतक आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने २० षटकांमध्ये सात गडी गमावून २२७ धावा केल्या होत्या.
भारताचा सलामीवीर ईशान किशन तीन धावा करून बाद झाला. मार्क अडायरच्या चेंडूवर तो बाद झाला. पॉवर प्ले अखेरीस भारताने एक बाद ५४ धावांपर्यंत मजल मारली आहे. संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा भारतीय डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. दीपक हुड्डाने २७ चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले आणि पुढे अवघ्या ५५ चेंडूंमध्ये शतकी कामगिरीही केली. शतकवीर दीपक हुड्डा १०४ धावांवर बाद झाला. जोशुआ लिटीलच्या चेंडूवर तो बाद झाला. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
त्याच्या पाठोपाठ सलामीवीर संजू सॅमसनने देखील ३१ चेंडूमध्ये ५० धावा पूर्ण केल्या. सूर्यकुमार यादव १५ धावा करून तंबूत परतला. भारताचा धडाकेबाज फलंदाज दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाला. क्रेग यंगने त्याला स्वस्तात माघारी धाडले. अक्षर पटेलदेखील शून्यावर बाद झाला. क्रेग यंगच्या गोलंदाजीवर जॉर्ज डॉकरेलने त्याचा झेल टिपला. आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग रवी बिश्नोईच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्याने केवळ १८ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. हॅरी टेक्टर ३९ धावा करून बाद झाला.
भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर दीपक हुड्डाने त्याचा झेल घेतला. यजमानांना १७ चेंडूंत ३७ धावांची आवश्यकता आहे. लोर्कन टकर पाच धावा करून बाद झाला. उमरान मलिकच्या चेंडूबर बदली क्षेत्ररक्षक म्हणून आलेल्या युझवेंद्र चहलने त्याचा झेल टिपला. त्यामुळे उमरान मलिकने पहिला आंतरराष्ट्रीय बळी आपल्या नावावर केला. आयर्लंडचा कर्णधार बलबर्नीने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर रवी बिश्नोईने त्याचा झेल टिपला.