Friday, October 4, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखपुन्हा एकवार ‘नमो नमो’

पुन्हा एकवार ‘नमो नमो’

रविवारी देशातील लोकसभा-विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. अन्य पक्षांच्या तुलनेत अर्थातच भाजपला सर्वांधिक यश मिळाले. समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची (आप) सत्ता आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आमदार झाल्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) सिमरनजीत मान यांनी आपच्या उमेदवाराचा पराभव केला. काही महिन्यापूर्वीच झालेल्या पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत आपने सर्व पक्षांना चारीमुंड्या चीत करत स्वबळावर सत्ता संपादन केली. आज त्याच पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आपचा दणदणीत पराभव झाल्यावर अवघ्या काही महिन्यांत परिवर्तनाची लाट आल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यात लोकसभा पोटनिवडणुकीत रामपूर व आझमगड लोकसभा मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे. रामपूर व आझमगड हे आजवर समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले मानले जात होते. पण आता याच बालेकिल्ल्यामध्ये भाजपचे कमळ दिमाखात फुलल्याचे निवडणूक निकालामध्ये पहावयास मिळाले आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यात राजकीय परिवर्तनाचे वारे वाहतच असते. राजकारणात नेहमीच कोठे ना कोठे राजकीय वादळेही येतच असतात. सत्तापालटाच्या उलथापालथी या होतच असतात. काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातही राजकीय सावळागोंधळ सुरू झालेला आहे. पण देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी या नावाच्या लोकप्रियतेत व जनाधारात कोठेही परिवर्तन झालेले नाही. कुठेही ओहोटी लागलेली नाही. एकेकाळी गुजरातच्या राजकारणापुरते सीमित असणारे नरेंद्र मोदी हे नाव आता देशाच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जागतिक पातळीवर चमकू लागले आहे. १९४७ पासून देशातील विविध राज्यांमध्ये आजवर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. पण त्या मुख्यमंत्र्यांना देशाच्या राजकारणात अथवा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फारशी चमक दाखविता आलेली नाही. अपवाद काही राजकारण्यांनी देशाचे कृषिमंत्री, संरक्षणमंत्री अथवा अन्य काही खात्यांवर आपले नाव कोरले आहे. पण नरेंद्र मोदी अर्थातच नमो या नावाची जादू जी देशवासीयांच्या मनावर २०१४ पासून कोरली गेली आहे, ती आठ वर्षांनंतरही कायम असल्याचे कालच लोकसभा, विधानसभेच्या पोटनिवडणुकांतील निकालावरून पहावयास मिळाली आहे. भाजपला आज देशातंर्गत पातळीवर जे यश मिळाले आहे, देशाच्या सर्व राज्यांमध्ये भाजप जी गेल्या काही वर्षांपासून मुसंडी मारत आहे. अनेक राज्यांमध्ये सत्ताधारी आहे, काही राज्यांमध्ये विरोधी पक्ष म्हणून चमकदार कामगिरी करत असून सत्तासंपादनाच्या जवळ भाजप पोहोचली आहे. हे सर्व नमो नमोमुळे शक्य झाले असल्याचे व शक्य होत असल्याचे लपून राहिलेले नाही. नमो नमोचे वादळ देशाच्या राजकारणात गोंधळ घालण्यापूर्वी वाजपेयी, अाडवाणी, महाजन, राजनाथ सिंहपासून अनेक रथी-महारथी भाजपमध्ये सक्रिय होते. तथापि मोदींच्या काळात भाजपला जे सुवर्णयुग प्राप्त झाले आहे, तितकी गरुडभरारी मारणे मातब्बर नेतेमंडळींचा भरणा असतानाही भाजपला शक्य झालेले नाही. २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच काही महिने अगोदर नरेंद्र मोदी या नावाची चर्चा जोर धरू लागली होती. नरेंद्र मोदींच्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा आलेख पाहिल्यावर ‘मोदी आले, मोदींनी पाहिले आणि मोदींनी जिंकले’ इतकेच म्हणणे योग्य ठरेल.

२०१४ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते काल-परवापर्यंत झालेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकांच्या पोटनिवडणुकीतही देशवासीयांना आजही मोदींचेच नेतृत्व हवे असल्याचे मतपेटीतून स्पष्ट झाले आहे. राम जन्मभूमी, राम मंदिराच्या विषयापासून लालकृष्ण अडवाणींनी काढलेल्या रथयात्रेपर्यंत भाजपने सत्तासंपादनासाठी सर्व प्रयोग करून पाहिले. पण भाजपच्या त्या प्रयत्नांना मर्यादाच पडल्या होत्या. अटलबिहारी वाजपेयी हे दोन वेळा भाजपचे पंतप्रधान झाले असले तरी भाजपला स्वबळावर सत्ता संपादन करण्याइतपत बहुमत मिळालेले नव्हते. २०१४ साली भाजपने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हे नाव प्रमोट केले. याच नावावर भाजपने निवडणूक लढली व जिंकली. या निवडणुकीत ‘अच्छे दिन’ आणि ‘अब की बार- मोदी सरकार’ या दोनच घोषणांच्या बळावर भाजपने स्वबळावर सत्ता मिळविली. जे काँग्रेसला यश मिळाले नव्हते, ते भाजपने विशेषत: नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामध्ये पंडित नेहरू, इंदिरा गांधी व त्यानंतर राजीव गांधींच्या मृत्यूच्या सहानुभूतीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भाजपचे मात्र तसे नव्हते. गुजरातेत नरेंद्र मोदींनी केलेली विकासकामे याच एकमेव मुद्द्यावर भाजपने निवडणूक लढली व जिंकली. २०१४ साली नरेंद्र मोदी या नावाची इतकी हवा होती की, त्या काळात भाजपने ५४३ लोकसभा मतदारसंघातही नरेंद्र मोदींना उमेदवार केले असते, तर किमान ४०० मतदारसंघातून मोदी विजयी झाले असते, असे राजकीय समीक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

त्या काळात ज्यांना राजकारणातले ओ की ठोही कळत नाही, अशा बालवयातील अजाण मुलेही ‘अब की बार, मोदी सरकार’ असा जयघोष करताना स्वत:हून फिरत होती. मोदी नावाची जादू असलेली मुले आता आठ वर्षांत मोठी झाली असून त्यातील ९० टक्के मुले आता कट्टर मोदी समर्थक झाली आहेत. सत्तेवर असलेल्यांच्या विरोधात नकारात्मक मतदान होऊन लोकप्रियतेला काही प्रमाणात ओहोटी लागते, हे आजवरचे चित्र आहे; परंतु मोदींच्या बाबतीत उलटेच घडत आहे. मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख २०१४ पासून उंचावत चालला असून तो आजतागायत कायम असल्याचे कालच्या लोकसभा विधानसभा निवडणूक निकालातून पहावयास मिळाले आहे. नमो नमोचा नारा आता देशाच्या कानाकोपऱ्यांत प्रभावीपणे गुंजू लागला आहे. जिथे भाजप प्रवेश आजवर मिळाला नव्हता, त्या राज्यांमध्ये भाजपचा प्रभाव वाढीस लागला आहे. राजकारणातल्या भ्रष्टाचाऱ्यांना ईडीमुळे लगाम घातला जात आहे. मोदींच्या प्रभावामुळे राज्याराज्यांतील अनेक राजकीय घटक भाजपमय होऊ लागल्याने भाजपची ताकद वाढीस लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -