शिबानी जोशी
मराठवाड्यातील परभणी या जिल्ह्यात संघकार्य सुरुवातीपासूनच अनेक कार्यकर्ते करत होते आणि करत आहेत. राष्ट्रीय विचाराने प्रेरित झालेल्या काही कार्यकर्त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांमध्येही परभणी जिल्ह्यात काही कार्य करायच ठरवल, ते करायला एका संघटनेचे उभारणी झाली पाहिजे, हे लक्षात घेऊन जनकल्याण सेवा संस्था १९८९ सुरू केली. सुरुवातीला मनोहर शहाणे यांची संस्थेचे अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.सुरुवातीला काही शिक्षक, डॉक्टर या कार्यासाठी तत्परतेने पुढे आले. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील कामान संघटनेच्या कार्याला पहिल्यांदा सुरुवात झाली.
१९९१ साली परभणी शहरातील दहावी-बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. रक्तदानाची गरज लक्षात घेऊन १९९१ सालीच रक्तदान शिबिरे संघटनेने आयोजित केली. परभणी शहरात चार आणि जिल्ह्यात तीन शिबिरे आयोजित करण्यात आली. यादरम्यान दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केलं. त्यानंतरही १९९२ साली रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. त्या काळात रक्तदानाला लोक मागे राहात असत. त्यांना प्रोत्साहित करून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात कार्यकर्त्यांना यश आलं. त्याच वेळी रक्तदात्यांची एक सूची तयार करण्यात आली. आजही त्या सूचीमार्फत रक्ताची गरज असेल, त्या लोकांना रक्तदाते उपलब्ध करून देण्याचा मोठं काम परभणी शहरात सुरू आहे.
स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुण वयातच मुलांमध्ये पोहोचले पाहिजेत, यासाठी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने १९९२ साली परभणी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये व्याख्यान आयोजित केलं गेल तसेच अंदाजे तीन हजार मुलांना स्वामी विवेकानंद यांचे आकर्षक चित्र देण्यात आलं होत. परभणी येथील मराठवाडा हायस्कूल या प्रथितयश संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना १९९२ साली मोफत वह्या तसेच गणवेशाचे वाटप करण्यात आले. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबीरही संस्थेतर्फे आयोजित केलं जाते. जिल्ह्यातील वसमत इथे असलेल्या वसतिगृहातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवलं गेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रातील कामानंतर वैद्यकीय क्षेत्रातील काम रक्तदान शिबिराच्या मार्फतच सुरू झाल्यानंतर वसमत तालुक्यातील ७, ८ खेड्यांमध्ये जाऊन वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या संस्थेतर्फे केलं जातं. यामध्ये तालुक्यातील आठ ते दहा नामवंत डॉक्टर्स सहभागी होत असतात.
सांस्कृतिक क्षेत्रातही विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यात मुख्यत्वे आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक व्हावेत या दृष्टीने स्पर्धा व्याख्यानमाला यांचे आयोजन केलं जातं. देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा, गीता पठण स्पर्धा अशा स्पर्धा कोरोना पूर्वकाळात तीन वर्षे घेतल्या गेल्या होत्या. कोरोना काळामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांना थोडी खीळ बसली असली तरीही कोरोना काळात लोकांना मदत करण्याचे काम संस्थेने अविरतपणे केल. करोना रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करणे तसेच धान्य वाटप अशी कामे संस्थेतर्फे करण्यात आली. पूर्वांचल भागातून येणाऱ्या काही विद्यार्थ्यांची सोयही संघटनेतर्फे करण्यात येते. त्या मुलांचे शिक्षण, राहण्याची सोय संस्था करत असते. त्याशिवाय परभणी जिल्ह्यातील गरीब, गरजू होतकरू मुलांनाही शिक्षण आणि राहण्याची सोय संस्थेतर्फे करून दिली जाते.
परभणीतील नागरिकांना उत्तमोत्तम वक्ते यांचे विचार ऐकता यावेत, यासाठी गेल्या २५ वर्षांपासून ३ दिवसीय व्याख्यानमाला दर वर्षी आयोजित केली जाते. मराठवाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले संघाचे स्वयंसेवक ह. बा. दळवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेमध्ये मा. गो. वैद्य, अशोक मोडक, दामू अण्णा दाते, अनिरुद्ध देशपांडे, जयंत रानडे, प्रकाश पाठक, मुकुंद कुलकर्णी, आनंद हर्डीकर यांच्या सारखे अनेकजण येऊन मार्गदर्शन करून गेले आहेत. या व्याख्यानमालेची लोकप्रियता खूपच असून, बसायला जागा पुरत नाही इतके लोक हे विचार ऐकायला येतात. याशिवाय विविध प्रासंगिक अडीअडचणीच्या काळातही परभणीतील नागरिकांना मदत करण्याचं काम संस्था करत असते. काही वर्षांपूर्वी परभणीमध्ये मुसळधार पावसामुळे एका भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी तिथे राहणाऱ्यांचे शाळेमध्ये स्थलांतर करणे, त्यांना अन्न वितरण अशा प्रकारचे कार्य ही संस्थेने पार पाडले होते. आशा करायला एक्स एन एक्स सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये देशभक्ती संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम त्यांच्याकडून गेली बत्तीस वर्षे अव्याहतपणे सुरू आहे आणि कोरोना काळामुळे काहीसे थांबलेले काम आता पुन्हा नव्या जोमाने, तरुण कार्यकर्त्यांच्या मदतीने सुरू झाले आहे.