सीमा दाते
अवघ्या काही महिन्यांतच मुंबई महापालिकेच्या निवडणूक आहेत, या निवडणुका जिंकण्यासाठी आणि महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सगळेच पक्ष उत्सुक आहेत. सगळ्याच राजकीय पक्षाची तयारी गेले वर्षभर सुरू आहेच. यात भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात तयारी सुरू केली आहे, असे असताना आता शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेनचे महापालिकेतील गणित बिघडण्याची शक्यता आहे.
सध्या शिंदेंकडे शिवसेनेचे ४० आमदार असल्याचे बोलल जात आहे. यात मुंबईतील ५ आमदारांचा सहभाग आहे. भायखळाच्या यामिनी जाधव, दादर माहीमचे सदा सरवणकर, चांदिवलीचे दिलीप लांडे, बोरिवलीचे प्रकाश सुर्वे आणि कुर्ल्याचे मंगेश कुडाळकर सहभागी आहेत. मुंबईतील या ५ आमदारामुळे सध्या मुंबईत निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. सध्याची मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेना आणि भाजपच्या विरोधातच असल्याचे पाहायलाच मिळते आहे, त्यामुळे आता आमदार फुटीनंतर शिवसेनेचे संख्याबळ कायम ठेवण्यासाठी शिवसेनेपुढे नवीन आव्हान आहे, तर २०१७ मध्ये अवघ्या काही फरकाने महापालिकेचे सत्तापद हातातून गेलेल्या भाजपला यावेळी महापालिकेतील सत्ता हवीच आहे आणि यासाठी भाजपची आधीपासूनच रणनीती सुरू आहे.
सध्या मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ ९८ भाजपचे ८०, काँग्रेस २९, राष्ट्रवादी काँग्रेस ८, मनसे १, एमआयएम २, समाजवादी ६ असे आहे. शिवसेनेचे संख्याबळ शिवसेनेला कायम हेच ठेवावे लागणार आहे. मात्र आता आमदार फुटीनंतर हे संख्याबळ राहावे म्हणून जोरदार प्रयत्न करावे लागणार आहे, तर शिवसेनेचे गेले ४ वर्षे स्थायी समितीपद भूषविलेल्या यशवंत जाधव यांच्या पत्नी याही शिंदे गटात सामील झाल्या आहेत. यामुळे तर यशवंत जाधव यांचाही नगरसेवकांचा एक गट आहे. यामुळे हा गटही शिंदेना छुपा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इतर ४ आमदारांचेही खास कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होऊ शकतात. मात्र असे झाले, तर शिवसेनेला या आगामी महापालिका निवडणुकांसाठी पुन्हा एकदा आराखडा तयार करावा लागले. मुंबई महापालिकेवर सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेपुढे नवीन आव्हान असणार आहे.
मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, एमआयएम आणि आता आम आदमी पार्टीदेखील तयारीत आहे, हे सगळे पक्ष निवडणूक लढण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी तयारीत आहेत. त्यातल्या त्यात आम आदमी पार्टीने तर पश्चिम उपनगरात तयारीही सुरू केली आहे. शिवसेनेकडूनही शिवसंपर्क अभियानातून पक्षबांधणी सुरू केली. गेली ३० वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीतही मुंबई महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेला जीव पणाला लावून काम करत आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत नवीन-नवीन प्रकल्पाचे उद्घाटन महापालिकेने केले आहे. यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आलेली अनेक प्रकल्प आहेत, ज्याचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. एकीकडे शिवसेना पक्ष बांधणी करते, तर दुसरीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा. निवडणूक जिंकण्यासाठी व भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेना तयारीत आहे, तर दुसरीकडे भाजपही आपल्या बूथ संघटनेच्या माध्यमातून घराघरात पोहोचला आहे. गेले अनेक महिने भाजपचे नेत, गटनेते, नगरसेवक मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार समोर आणले आहेत. राणी बागेपासून ते रस्त्यांच्या कामातील अनियमितता, कोविड सेंटरचे घोटाळे या सगळ्याची भाजपकडून चौकशी करण्याची मागणी केली गेली होती. त्यामुळे मतदारांपुढेही भाजपने शिवसेनेतील पाच वर्षांतील कामे कशी चालतात, हे समोर आणले होते.
यामुळे सध्या या निवडणुकीत सगळे पक्ष असले, तरी गेले अनेक वर्षे मित्रपक्ष असलेले शिवसेना-भाजप मात्र आमने-सामने असणार आहेत. त्यातच आता भाजपची निवडणुकीची तयारी झाली असली, तरी शिवसेनेला पुन्हा आपला पक्ष पिंजून काढावा लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे जसे राज्य सरकार धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे, तशी मुंबई महापालिकेलाही याचा धक्का बसण्याची चर्चा सुरू आहे. ठाणे आणि मुंबई या दोन मोठ्या महापालिका शिवसेनेजवळ आहेत. त्यातल्या त्यात ठाण्याचे माजी महापौर आणि जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी राजीनामा दिला अाहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असतानाच आता मुंबईची ही भीती आहे. मुंबईतीही २५ हून अधिक नगरसेवक छुपा पाठिंबा देण्याची चर्चा सुरू असल्यामुळे महापालिकेत शिवसेनेचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.