विलास खानोलकर
शंकरराव राजे रायबहादूर पत्नीसहित अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट येथे असे अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्रीस्वामीदर्शनार्थ येत असत. ब्राह्मणादी चारही वर्णांचे, पारशी यवनादिक, विविध जातीधर्मांचे भक्त श्रीस्वामींच्या दर्शनासाठी येत. त्यामुळे अक्कलकोट येथे कायम गर्दी उसळल्याने या परिसराला अक्षरश: जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे. येथील गर्दीत आपल्याला श्रीस्वामींचे दर्शन कसे घडावे? या विवंचनेत असलेल्या शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरणीसोबत झाली. सुंदराबाई लोभी वृत्तीची होती. शंकररावांनी सुंदराबाईंच्या कानावर त्यांची अडचण आणि व्याधी घातली, तेव्हा सुंदराबाईंनी श्रीस्वामीदर्शनाचा खात्रीशीर योग जुळवून आणण्याबद्दल दोन हजार रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्रीस्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्रीस्वामी त्यावेळी शेख नूरबाबाच्या दर्ग्यात होते. तिथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व म्हणाले, ‘आम्ही तुमचे मरण चुकवले.’ त्यानंतर शंकररांवानी तिथे बरेचसे अन्नदान केले, फकिरांना खाना दिला. कबरीवर कफनी चढवली. पुढे काही दिवसांनी श्रीस्वामींनी त्यांना कडुनिंबाच्या पानात मिरीचे दाने घालून खायला सांगितले. शंकररावांनी तसे करताच अल्पावधीतच ते व्याधीमुक्त झाले. पुढे काही काळानंतर शंकररावांनी अक्कलकोट येथे येऊन दहा हजार रुपये खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला तेव्हा श्रीस्वामींनी त्यांच्याकडून अक्कलकोट येथेच एक चुनेगच्चीचा मठ (राजेरायन मठ) बांधवून घेतला.
आधुनिक वटपौर्णिमेच्या शुभ दिनी
पुसती आई ताई मावशी।।१।।
रहस्य काय बरे सुखी संसार
ज्याने होणार नाही तो असार ।।२।।
स्वामी वदती ऐका माझा आदेश
सांगतो सोपे सोपे संदेश ।।३।।
कलह नसावा घरामध्ये
स्नेह जपावा मनामधे ।।४।।
तोंडात साखर मनात साखर
हृदयात ठेवा अमृताची घागर ।।५।।
माणुसकीचा वहावा झरा
हाच बोध मनामध्ये धरा ।।६।।
भांड्याला लागता भांडण भांडे
वाढता वाढता वाढे वाढे ।।७।।
सारे जग त्यातच बुडे
परग्रह त्यातच लुडबुडे ।।८।।
नका ठेऊ फुका अहंकार
यमलोकी जाताच
थांबेल फणकार ।।९।।
जे घरात तेच दारात
निघेल रस्त्यावरती वरात ।।१०।।
छोट्या गोष्टीत नको राजकारण
संपेल घरातले भात वरण ।।११।।
ज्याला लावला टिळा कपाळा
ज्याने दिला प्रगतीचा लळा ।।१२।।
ज्याने फुलविला सोन्याचा मळा
दाबू नका त्याचाच गळा ।।१३।।
नको घरादाराला गर्व धनाचा
नको वृथा
अभिमान पदाचा ।।१४।।
ठेवा कुटुंबप्रमुखाचा मान
छोट्यांनाही सांभाळून
वाढवा शान ।।१५।।
एकमताने घ्या निर्णय
भाऊबहिणीत ठेवा
प्रेम परिणय ।।१६।।
करा प्रगती घरची
होईल साऱ्या भारताची ।।१७।।
स्वामींचा हा संदेश
साऱ्या भक्तांना आदेश ।।१८।।