Tuesday, May 6, 2025

विशेष लेखसंपादकीयमहत्वाची बातमी

वाढत गेला कार्यकर्त्यांमध्ये असंतोष...

वाढत गेला कार्यकर्त्यांमध्ये असंतोष...

उदय निरगुडकर

गेल्या काही वर्षांमध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांमध्ये खुषमस्कऱ्यांचं कोंडाळं ठामपणे उभं राहिलं. मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना मशिदींचे अनधिकृत लाऊडस्पीकर राज ठाकरे काढतात, ही बोच कट्टर सैनिकांमध्ये होती. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचं खच्चीकरण करत असल्याने भाजपशी युती करण्याची भावना तीव्र होत होती. वस्तुस्थितीपासून झालेली नेतृत्वाची फारकत, वैयक्तिक राग-लोभ यांनी पक्षहितावर केलेली मात या सगळ्यांमुळे ही हिट विकेट होताना दिसत आहे.

तर वाचकहो, घटनाक्रम तुमच्यासमोर आहे. तो मी पुन्हा उगाळत नाही. त्यात क्षणाक्षणाला नवनव्या घडामोडींची भर पडतेय. उद्धवजी आपल्या राजीनाम्याची घोषणा केव्हाही करतील, अशी परिस्थिती आहे. केव्हाही राजीनाम्याची घोषणा करणं आणि प्रत्यक्षात राजीनामा देणं या दोन भिन्न बाबी आहेत. एक मात्र नक्की की, भारताच्या राजकारणात पहिल्यांदाच सत्तारूढ पक्षाचे आमदार पक्ष सोडून विरोधी पक्षामध्ये सामील होताहेत. आजवर विरोधी पक्ष फुटायचा, आता सत्तारूढ पक्ष फुटतोय, यातच सगळ आलं. बहुमताच्या जोरावर एकनाथाची शिवसेना ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि संपूर्ण पक्षच मिळवू शकतो, हे उघड आहे. कदाचित तसं होईलही. सध्याच्या घडीला मात्र यासंदर्भातली काही निरीक्षणं नोंदवून निष्कर्ष तपासून पाहण्याची गरज आहे. तटस्थपणे पाहता, एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्व आणि शिवसेना निष्ठेबद्दल शंका घेण्याजोगी एकही आगळीक आजवर घडलेली नाही. किंबहुना कोणत्याही पक्षाला असा अहोरात्र परिश्रम करणारा कार्यकर्ता, नेता मिळणं हे भाग्यच आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पहिली ठिणगी पडली. काम करायला, राबायला, पैसा ओतायला, कार्यकर्ते जमा करायला, केसेस अंगावर घ्यायला, कार्यकर्त्यांच्या केसेस सोडवायला एकनाथ आणि प्रत्यक्ष गौरवाच्या वेळी मात्र डावललं जाणं हे एकनाथ शिंदे गेले काही महिने सहन करत होते, अशी त्यांची तीव्र भावना आहे. त्यांच्या मागे असलेलं संख्याबळ पाहता संघटनेवरची पकड, नेता, कार्यकर्त्यांचा विश्वास या बाबतीत शिंदे ठाकरे यांच्यापेक्षा सरस निघाले. त्याला कारणीभूत ठरली ४० वर्षं आनंद दिघे शैलीमध्ये केलेली अफाट मेहनत आणि जोडलेले कार्यकर्ते.

गेली अनेक वर्षं शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर कार्यरत होती. आता मात्र शंभर टक्के राजकारण करणं आनंद दिघे यांच्या मुशीत घडलेल्या कट्टर हिंदुत्ववादी सैनिकाला परवडणारं नव्हतं. गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांमध्ये खुषमस्कऱ्यांचं कोंडाळं ठामपणे उभं राहिलं आहे. जे अजूनही त्यांना सत्य परिस्थिती जाणवू देत नाहीत, स्वीकारू देत नाही. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो शिवसेनेच्या हिंदू ब्रँडपासून दूर जाण्याचा. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना मशिदींचे अजानसाठीचे अनधिकृत लाऊडस्पीकर सत्तेत नसलेले राज ठाकरे काढतात, ही बोच कट्टर हिंदू शिवसैनिकाच्या मनात खोलवर आहे. मालवणी, अमरावती, अचलपूर इथलं हिंदू पलायन थंडपणे पाहणं हे एके काळी ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ अशी आरोळी देणाऱ्या शिवसैनिकांसाठी अशक्य होतं. भारतात इतरत्र ‘काश्मीर फाइल्स’ करमुक्त होतो, मग महाराष्ट्रात का नाही?, असा प्रश्न शिवसैनिकच दबक्या आवाजात विचारत होते. मुस्लीम आरक्षणासाठी सरकार म्हणून आग्रह धरताना हे सरकार आपलं आहे का?, असा प्रश्न त्या शिवसैनिकाला पडत होता. गडकोटांवर मजारी उभ्या राहिल्या आणि पद्धतशीरपणे किल्ल्यांचं मुस्लिमीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा खांद्यावर घेतलेल्या भगव्याचं आणि मनगटातल्या ताकदीचं, शरीरात असलेल्या जिगरीचं काय करायचं?, असा प्रश्न त्याला पडला होता. मराठीसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेला ‘मराठी भाषा भवन’ बांधता येत नाही पण ‘उर्दू भाषा भवना’चा ठराव मात्र पारित होतो, हे पचवणं अवघड होतं.

पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड अनेकांच्या मनात खोलवर जखम करून गेलं. नवाब मलिक निर्दोष असल्याचं बोलताना आपण नेमकं कोण आहोत?, असा प्रश्न शिवसैनिकाला पडला होता. एक प्रकारे हिंदुत्व हा आत्मा गमावल्यामुळे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याची भीषण जाणीव सामान्य शिवसैनिकाला झाली होती. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला उद्धव ठाकरे यांना विचारायची होती. पण ते उपलब्ध नव्हते. २० एप्रिलच्या सुमारास मी ‘कोल्हापूरच्या निकालाचा अन्वयार्थ’ हा लेख लिहिला होता. त्या निकालाने कोल्हापूरची लाल माती प्रत्येक आमदाराला आणि इच्छुकाला लागली आहे, असा निष्कर्ष काढला होता. त्याच लेखात स्पष्टपणे म्हटलं होतं की, अनेक मतदारसंघातले विरोधक जेवढे दूर वाटत आहेत त्यापेक्षा अनेक पटींनी उमेदवारांना जवळ वाटत आहेत, हा या निवडणुकीचा अन्वयार्थ किती खरा होता, हे आता लक्षात येत आहे.

इथे आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची गरज आहे. गेल्या काही काळात राष्ट्रवादी काँग्रेस पद्धतशीरपणे शिवसेनेचं खच्चीकरण करतेय हे कार्यकर्त्यांच्या, आमदारांच्या, मंत्र्यांच्या लक्षात येत होतं. पण पक्षप्रमुख ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नव्हते. एक वेळ भाजपशी बोचणारी युती परवडली. पण मुळासकट उखडून टाकणारी राष्ट्रवादीची आघाडी नको, अशी भावना तीव्र होती. गावागावांत शिवसैनिकांची गळचेपी होत होती. तडीपारी लागत होती. निधी वाटपात अन्याय होत होता आणि याचं उत्तर कोणाला विचारायचं? असा प्रश्न शिवसैनिकाला पडला होता. प्रत्येक वेळी तीच ती भावनिक आवाहनं आणि मूळ मुद्द्यांना बगल याबद्दल तरुण सैनिक प्रश्न विचारता झाला तेव्हा त्याची उत्तरं नेतृत्वाकडे नव्हती. ईडी, आयटी यांच्या दहशतीखाली काही आमदार भाजपच्या गळाला लागले असतीलसुद्धा. पण त्याहीपेक्षा आपण सध्या या पक्षातून निवडून येऊ शकत नाही ही भीती, भावना अधिक तीव्र होती.

इथे नेतेमंडळींच्या मानसिकतेचा मुद्दाही लक्षात घ्यायला हवा. वर्षानुवर्षं जनतेत मिसळून काम करणाऱ्या आमदाराला, कार्यकर्त्याला, खासदाराला आपल्या पायाखालची हिंदुत्वाची जमीन सरकत असल्याची जाणीव होत होती. पण शिवसंपर्क अभियानात वारंवार सांगूनसुद्धा काही उपयोग होत नाही, या अनुभवामुळे एक प्रकारची हताशा आली होती. आज शिवसेनेचे ४० आमदार गेले तरी कुठेही फारसा उद्रेक दिसत नाही. या थंडपणामागील कारण काय? यातच शिवसेनेची अवनती दडली आहे. भाजपने आपले आमदार फोडले हा नैतिक आक्रोश एकीकडे दिसत आहे. मात्र शिवसेनेने अनेकदा मनसेचे नगरसेवक गळाला लावले. तेव्हा या नैतिकतेची व्याख्या काय होती? आजच्या राजकारणात कोणीच कोणाची नैतिकता काढू नये. इतके सर्व घसरले आहेत. दुर्दैवाने जे दिल्लीत काँग्रेसच्या बाबतीत घडत आहे तेच शिवसेनेबाबत मुंबईत घडत आहे. कार्यकर्ते आणि सत्य परिस्थिती यांच्यापासून झालेली नेतृत्वाची फारकत, वैयक्तिक राग-लोभ यांनी पक्षहितावर केलेली मात या सगळ्यामुळे ही हिट विकेट होताना दिसत आहे.

इथे आवर्जून लिहिण्यासारखा आणखी एक मुद्दा आहे, संजय राऊतांबद्दलचा. त्यांच्याबद्दलचं शिवसैनिकांचं मत तर पक्षप्रमुखांनी जाणून घ्यायला हवं होतं. इतर पक्षांवर रोज शेलक्या भाषेत टीका करताना आपण आपल्या पक्षाची हानी करत आहोत, याबद्दलचं नेत्यांचं विवेकभान सुटलं होतं. सेनेसाठी बंड नवं नाही. या आधी भुजबळांबरोबर १७ आमदार गेले आणि निवडणुकीत सर्वच पडले. नारायण राणे यांच्याबरोबर ११ जण गेले आणि राणे वगळता सर्व पडले. पण तो काळ वेगळा होता. एकनाथ शिंदे हे अधिक खोलवर रुजलेलं नेतृत्व आहे. या नाट्याचे पहिल्या अंकाचे काही प्रवेश आता संपत आहेत. अजून पुष्कळ प्रवेश, मध्यांतर, क्लायमॅक्स बाकी आहेत. मात्र सर्व स्तरांमधल्या शिवसैनिकांच्या मनात माजलेला कोलाहल पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना टिपता आला नाही, हे वास्तव आहे. हा स्वर नेतृत्वाने टिपायला हवा होता, हा सर्व घडामोडींचा सारांश. आज शिवसेनेचा ताबा ठाकरेंच्या हातून जायची वेळ आली आहे. हे अचानक घडलेलं नाही. मात्र असे अनेक मुद्दे बराच काळ दुर्लक्षित राहिले आणि आज त्याचा स्फोट झाला, हे आता तरी जाणून घेणं महत्त्वाचं. यापुढील काळात घडणाऱ्या घडामोडींचा अन्वयार्थ प्रत्येकजण आपापल्या परीने लावेल पण अवघ्या राजकीय विश्वाने आवर्जून लक्षात घ्यावा असा मुद्दा आहे, तो कार्यकर्त्यांच्या हृदयातली बोच जाणून घेण्याचा आणि त्यांच्यामध्ये मिसळण्याचा. हे मर्म समजून घेतलं तरी पुरेसं...

Comments
Add Comment