सन १९८२ सालची गोष्ट आहे. श्रावण महिना नाग पंचमीचा दिवस होता. त्यादिवशी आमची ग्रामदेवता श्रीदेव रवळनाथाचा सप्ताह सुरू होता व हा सप्ताह पुढे सात दिवस चालतो. आम्ही गावचे मानकरी असल्यामुळे सप्ताहाची पहिली रात्र ही आमचीच असते. त्या रात्री मी देवळाजवळ गेलो, भजन झाले व इतर लोकांना म्हणाले, माझे वडील श्री. दत्ताराम हे घरी खूप आजारी असल्यामुळे मी घरी जातो. माझा भाऊ रमाकांत तेथे होता. तेव्हा आता तुम्ही सांभाळा म्हणून सांगितले व घरी येऊ लागलो. पण घरी न जाता दत्तमंदिरामध्ये आलो व त्याठिकाणी झोपलो. महाराज दत्तमंदिरामध्ये झोपत होते. त्या खोलीत मी झोपलो होतो. रात्री २ च्या सुमारास २२ ते २५ वर्षांचा अगदी तरुण इसम पायात बुट, पँट, शर्ट घातलेला.
मी झोपलो त्या ठिकाणी आला व माझ्या खिशातील ७०/८० रु. व टेबलावर ठेवलेले घड्याळ घेतले व आतील कपाट उघडले. त्यावेळी कपाटाचा आवाज आला. तो माझ्या कानावर पडला, त्यावेळी मी कोण रे म्हणून ओरडलो व तेवढ्यात घाबरून तोही ओरडला. मी झोपेत असल्यामुळे व घरी वडील आजारी असल्यामुळे वाडीतील बाबांचे बरे नाही म्हणून सांगायला घराकडून कोणीतरी माणूस आला असेल. मी कोचावर उठून बसलो, तर त्याने मला नमस्कार केला तोपर्यंत हा चोर आहे की, भल्यांपैकी आहे हे कळेना.
त्याने नमस्कार केला म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरविला व उठून पाहतो, तर टेबलावरील घड्याळ नव्हते. खिशात पैसेही नव्हते व कपाट उघडे होते. त्यावेळी मी त्याला विचारले, अरे तू पैसे घेतलेस, घड्याळ घेतलेस. पण तो काहीच बोलला नाही. त्यावेळी सर्व लाइट लावले तरी ती उठेना, मी तसाच दुकानांत जाऊन दाजी यांस उठविले व हा चोर आहे व त्याने घड्याळ, पैसे चोरले आहेत. चल तुला दाखवतो, असे म्हणून दोघेही दत्तमंदिरमध्ये आलो. पण दाजी म्हणाला, अरे तो गेला असेल. पण पहातो, तर काय तो तसाच होता. मग मी व दाजी यांनी त्याला बाहेर झोपायला घोंगडी दिली. त्यानंतर तो म्हणाला, तुम्ही दिलेल्या घोंगडीमध्ये तुमचे घड्याळ व पैसे आहेत. त्यानंतर आम्ही कुलूप लावून दुकानात आलो, त्यावेळी सगळ्या वस्तू अशाच उघड्यावर असायच्या.
त्यानंतर आम्ही त्याला म्हणालो, अरे तुला कोणीतरी मारतील तू सकाळी उठून निघून जा. तो हो म्हणाला, आम्हाला सकाळी ६ वाजता चहा करायची सवय होती. तो उठला आणि सरळ हॉटेलमध्ये आला. त्यावेळी दाजी त्याला म्हणाला, ‘अरे तू आता चहा घे आणि निघून जा. तुला कोणीतरी मारेल.’ अहो मी जाणार नाही. रात्रीचे महाराज कुठे गेले. त्यांना मला नमस्कार करायचा आहे. दाजी मला म्हणाला, अण्णा तो जात नाही तुझी वाट पहात आहे. मी म्हणालो, ‘अरे तू निघून जा, नाहीतर तुला पोलिसाकडे नेऊन देणार आहे.’ ‘महाराज मला काही करा, मी चोर आहे. आपण माझ्यावर दया केली आहे. मला रात्री मारले असते. पण तुम्ही दयाळू. महाराज तुम्हाला काय सांगू, मी खूप चोऱ्या केल्या. पण तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवलात. तुमचे पैसे सर्व घ्या. पण मला चांगली बुद्धी द्या.’ त्याला वाटले मी महाराज आहे. पण सर्व गुन्हे कबूल करून गेला. ही महाराजांची कृपा होय. त्यांना चोर सर्व सारखेच. पण त्या माणसात परिवर्तन झाले. आता तो एक चांगला माणूस झाला आहे.
– श्री समर्थ राऊळ महाराज