मुंबई : शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी एका मागोमाग एक असे शासकीय आदेश जारी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ४८ तासांत १६० हून अधिक जीआर जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीज वर्षे एकही निर्णय न घेणारे सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या प्रकारात आपण लक्ष घालावे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना केली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. शिवसेनेच्या आमदारांना घेऊन ते आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले आहेत. दिवसेंदिवस शिवसेना आणि अपक्ष आमदार त्यांना जाऊन मिळत आहेत. तर बंडाच्या दुसऱ्याच दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे कोरोना झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून अंधाधुंद निर्णय घेतले जात आहेत, जीआर काढले जात आहेत. यामध्ये आपण तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी दरेकर यांनी पत्रातून केली आहे.
पोलीस बदल्यांचा देखील घाट घातला जात आहे. सरकारचे एक मंत्री भ्रष्टाचारात तुरुंगात गेले आहेत. यामुळे सरकारी निधीचा गैरवापर थांबवावा, अशी मागणी राज्यपालांकडे करत असल्याचे दरेकर यांनी पत्रात म्हटले आहे.