नवी दिल्ली (हिं.स.) : भारताला क्रीडा क्षेत्रातील जगातील अव्वल १० देशांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रित दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. गुजरातमधील केवडिया येथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी ठाकूर म्हणाले की, “राज्य आणि केंद्र सरकारने ‘टीम इंडिया’च्या भावनेने एकत्रितपणे धोरणे आखणी, पायाभूत सुविधांची निर्मिती तसेच कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले तर खेळ आणि खेळाडूंची प्रगती होईल. म्हणूनच राज्याच्या सीमांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे. केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय परिषदेला उपस्थित असलेल्या राज्यांच्या क्रीडा मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना ही परिषद ज्ञानाचे आदानप्रदान करण्याचे व्यासपीठ म्हणून पाहण्याचे आवाहन केले आणि देशातील क्रीडा परिसंस्थेला बळकट करण्यासाठी सामायिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी प्रत्येक राज्याच्या सर्वोत्तम पद्धती सर्वांसमोर मांडण्याचे आवाहन केले. “खेळांचा विकास करण्याचा प्रयत्न करताना सर्व राज्यांना अनेक समान अडचणींना सामोरे जावे लागते आणि चर्चेद्वारे काही सामाईक उपाय शोधले जाऊ शकतात.” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा आयोजित करण्याच्या व्यवहार्यतेवर चर्चा करून खेलो इंडिया स्पर्धेचा विस्तार करण्यावर परिषदेत विचारविमर्श केला जाईल.आर्चरी लीग, हॉकी लीगच्या धर्तीवर खेलो इंडिया लीग स्पर्धेचा इतर अनेक खेळांपर्यंत विस्तार करण्याचाही प्रस्ताव आहे. जास्तीत जास्त स्पर्धा आयोजित केल्या तर खेळाडूंना त्यांची गुणवत्ता दाखवण्याची आणि आणखी प्रगती करण्याची संधी मिळेल.” असे ते म्हणाले.
खेलो इंडिया योजनेचे इतर विविध पैलू उदा.- खेळाच्या मैदानांचे जिओ-टॅगिंग, राज्यांमधील प्रशिक्षण केंद्रे/अकादमी, क्रीडा स्पर्धांमधून प्रतिभावान खेळाडू निवडणे आणि विकास, महिला, दिव्यांग, आदिवासी आणि ग्रामीण भागात खेळांना प्रोत्साहन, स्वदेशी खेळ आणि त्यांचे महत्त्व, डोपिंगविरोधी शिक्षण आणि जनजागृत, क्रीडा सहाय्यक व्यावसायिकांसाठी परिसंस्था तयार करणे यासह इतर मुद्द्यांवर परिषदेदरम्यान चर्चा केली जाणार आहे.