मुंबई : राज्यात आज ५२१८ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज रोजी एकूण २४८६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज ४९८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण ७७,७७,४८० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१७,४७,७६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,५०,२४० (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत दिवसभरात २४७८ नवे रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात मुंबईत २४७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे.
तीन लाटा थोपवण्यात यश आल्यानंतर मुंबईत कोरोना नियंत्रणात होता. मात्र काही दिवसांपासून पुन्हा मुंबईत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या हजार ते दोन हजारांच्या दरम्यान चढउतार करत होते. मात्र गुरुवारी दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ६१४ एवढी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात बरे झालेल्या रुग्णाची संख्या २३६५ एवढी आहे.
दरम्यान ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून गुरुवारी २४ इतकी होती. तर कोविडसह इतर आजार असल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तिसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कसक्ती शिथिल करण्यात आली होती. तसेच कोरोनाचे नियमही सैल करण्यात आले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, हात धुणे या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना तज्ज्ञांकडून दिल्या जात आहेत. तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरताना प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे.