Monday, July 15, 2024

आधार

माधवी घारपुरे

आधार’ एक तीन अक्षरी अगदी साधा शब्द. याला उकार नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही. पण तो कोणत्याही रूपात माणसाला मिळाला की, माणूस आनंदाने कोलांटी पण मारू शकतो. हा शब्द आकाशालाही गवसणी घालू शकतो. आधार नसला, तर अनेक अर्थांनी माणसाचं जगणं निराधार होतं. नीरस होतं. खरं तर आपल्या लक्षातच येत नाही की, झोपणं, चालणं, बसणं सगळं आधारावरच आहे. धरतीचा आधार म्हणूनच धरतीमाता, झाडं उभी आहेत, कारण जमिनीखाली मुळांचा आधार आहे. मुळं आहेत मातीचा आधार आहे म्हणून… फांद्या झाडाच्या आधारानं… पानं, फुलं, फळं फांद्यांच्या आधारानं, झाडांना किंवा फांदीनं आधार काढला की, पान सुटलं, खाली पडलं, सुकलं, गळून पडलं की कुजलं, फूल अलग झालं की कोमेजलं. पाया हलला की, घर जमीनदोस्त आणि विश्वासाचा आधार गेला की माणूस तुटला…

अशी मालिका चालूच राहणार. आधार म्हटला की, आपल्यासमोर येतो तो मानसिक आधार, आर्थिक किंवा भावनिक शारीरिक आधार. पण नकळतपणे ध्यानात येते की, गाण्याला सुरांचा आधार आहे. नृत्याला पायांचा आधार आहे. चित्रकाराला बोटांचा आधार आहे. नृत्याला पायांचा आधार आहे. चित्रकाराला बोटांचा आधार आहे. मजा आहे ना? ‘बुडत्याला काडीचा आधार’ ही म्हण त्यातूनच आली असावी. थोडी जरी मदत, सहाय्यता मिळाली की, त्या आधारे माणूस वर येतो.

एका जुन्या कथेची आठवण मला होते. नाव निश्चितपणे सांगता येणार नाही. पण एक प्रचंड श्रीमंत कोट्यधीश उद्योगपती होता. त्याची कीर्ती दूरवर पसरली. त्याच्या कष्टामुळे, माणसं सांभाळण्यामुळे. पण वसंत ऋतू जर बाराही महिने राहिला, तर त्याला महत्त्व कुठले? काही कारणांनी त्याच्या उद्योगाला, प्रगतीला ओहोटी लागली. कल्पना करता येणार नाही, पण असे उद्ध्वस्त झालेले उद्योगपती आपण पाहतो. तो उद्योगपती इतका निराश झाला की, आत्महत्या करण्याशिवाय त्याच्या मनात दुसरा विचार स्थिरावत नव्हता. तो आपला जीव द्यायला गेला, तत्पूर्वी जरा बागेत बसला. त्याची उद्विग्नता पाहून शेजारी बसलेला माणूस म्हणाला, “का रे इतका उद्विग्न का? जीवबीव देणार काय?”

“हो तुम्हाला कसं कळलं? मी एक उद्योगपती होतो.” “थांब थांब पुढे बोलू नको, मी पण उद्योगपतीच होतो. नाही नाही आहे. हे बघ माझे चेकबुक. मी तुला १ लाखाचा चेक देतो. शेवटचा प्रयत्न कर, यशस्वी होशील. पण पुढच्या वर्षी याच दिवशी मला १ लाख परत करायचे. जा.”

उद्योगपतीला आश्चर्य वाटलं, ना ओळख पाळख पण एवढा दिलदारपणा! आपण असं करूया, हा चेक आज नको, ८ दिवसांनी बँकेत भरू. पुन्हा सगळं बळ एकवटून त्याने उमेदीनं माणसांना गोळा केले. पुन:श्च हरि ओम म्हणून सुरुवात केली. जरा जाम बसतोय वाटल्यावर म्हणाला, अजून महिन्यांनी भरू. याची वॅलिडिटी ६ महिने आहे. बघता बघता धंद्याचं झाड बहरलं. मुळांना आधार मिळाला. फळं-फुलं बहरली आणि लाखाचा चेक तसाच राहिला. बरोबर वर्षाने उद्योगपती त्या बागेत गेला. दुसऱ्या उद्योगपतीला पाहून म्हणाले, “नमस्कार साहेब, आपण इथे कसे?” दोघांना एकच प्रश्न. उद्योगपतीने सांगितले, तर डॉक्टर म्हणाले, “ओ माय गॉड! अहो उद्योगपती म्हणवतो तो खरंच उद्योगपती होता. आता माझा पेशंट आहे. तो पळून येतो मध्येच आणि इथे सापडतो. त्याचा चेकबीक काही खरं नाही” मित्रांनो, कथा संपली. पण आपल्या उद्योगपतीला हिमालयाएवढा आधार होता तो त्या १ लाखाच्या चेकचा. केवढं मानसिक, भावनेचं आर्थिक आधाराचं सामर्थ्य मिळालं!

भगवंतानी गीता सांगून अर्जुनाला बळाचा आधार दिला. वसिष्ठांनी योगवसिष्ठ सांगून रामाला वैफल्यातून बाहेर काढले. अष्टवक्रांनी अष्टवक्रगीता जनकाला सांगून आधार दिला. महर्षी कर्वे, सिंधुताई सकपाळ, रेणू दांडेकर, मेधा पाटकर हे सर्वजण कुणाचा ना कुणाचा आधार बनले.

प्रश्न इतकाच की, मला जर कुणाचा आधार लागतो, तर मीसुद्धा कुणाचा आधार का होऊ नये? भगवंत आपल्याला किती देतो? याची गणना नाही. अन्न, पाणी, हवा तर सोडाच. पण ऐश्वर्य, सुख, वैभव, समाधान, प्रेमळ कुटुंब, मदत करणारा शेजार, मित्र परिवार, पैसा, शिक्षण यादी लांबवली तरी मारुतीच्या शेपटीसारखी संपणारच नाही.

सर्कशीत झुल्यावर खेळणारी मुलं-मुली सर्वांना आवडतात. त्यांचं कौतुक होतं, पण मला मात्र खालची जाळी आवडते. मुलं पडली, तर ती आधार देते. लहानपणी मुलांना आई-वडिलांचा आधार भक्कम असतो, पण वृद्धापकाळी सर्वच मुले माता-पित्याचा आधार बनतात, असं नाही. मग त्या निराधारांना ‘आधार’ संस्थेचा आधार घेऊन आनंद मानावा लागतो.

इतकंच म्हणावं वाटतं, दवाखान्यात असलेल्या उद्योगपतीने मानसिक स्थिती ठीक नसतानाही बुडत्याला आधार दिला. श्रीकृष्णाने डोंगर उचलून त्याला करंगळीचा आधार दिला नि काय झाले?हात देता आधाराचा त्याने आकाश पेलले, अन् छत आकाशाचे वर झुलूही लागले..!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -