अर्चना सोंडे
आयुष्याला कोणत्या क्षणी काय वळण मिळेल, हे कोणालाही सांगता येणार नाही. शालेय जीवनात अबोल असणारे आपल्या पुढल्या आयुष्यात उत्तम वक्ते झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या ऐकिवात असतील. काहीजण लहानपणी एवढे लाजरे-बुजरे असतात की, त्यांचं पुढे कसं होईल, असा प्रश्न पडतो. मात्र हेच मोठे झाल्यावर रंगमंच गाजवून जातात. ‘ती’सुद्धा अशाच जातकुळीतील. काहीशी लाजरी-बुजरी स्वभावाची. तिच्या घरच्यांना प्रश्न पडायचा की, पुढे कसं होणार. मात्र नियतीने असे काही चक्र फिरवले की, आज ती साड्यांना देखील बोलतं करते.
“साडीमध्ये दिसतेस देखणी… म्हणून
नेस आवर्जूनी…
हळूच कानात गुणगुणते… साडी काही बोलते… साडी काही सांगते…”
अशा शब्दांतून साडी सजीव करते. पारंपरिक साड्यांची उद्योजिका म्हणून आज तिची उद्योग जगतात एक वेगळीच ओळख आहे. ही उद्योजिका म्हणजे शशिकला वाटवे होय.
विलास रामचंद्र ओव्हाळ आणि सुशिला विलास ओव्हाळ हे एक मध्यमवर्गीय कुटुंबातील दाम्पत्य. नाकासमोर चालणं असा यांचा स्वभाव. या दाम्पत्यास दोन मुले आणि एक मुलगी. ही मुलगी म्हणजेच शशिकला. शशिकला लहानपणापासूनच लाजऱ्या-बुजऱ्या स्वभावाची. इतकी की, अगदी मावशी आली तरी ती मावशीसोबत जास्त बोलत नसे. शशिकलाचे आजोबा (आईचे वडील) नानाभाऊ काळे यांचा शशिकला आणि तिच्या भावांवर जास्त प्रभाव होता. खरंतर नानाभाऊ तसे प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचेच होते. व्यवसायाने उद्योजक. समाजकार्याची आवड असल्याने प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. त्यामुळे घरी लोकांचा राबता असायचा. गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव, दहीहंडी असो वा शिवजयंती, नानाभाऊ या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अग्रणी असायचे. क्लायंट, ऑर्डर्स हे शब्द नानाभाऊंमुळे शशिकलाला लहानपणीच अवगत झाले. मामा दगडू काळे यांनी रुजविलेले संस्कार आयुष्यात उपयोगाचे ठरले. शिक्षणासाठी त्यांचा खूप हातभार लागला.
शशिकला मात्र अबोल स्वभावाची. तिचा हा अबोल स्वभाव कमी व्हावा म्हणून तिला नाटकामध्ये भाग घेण्यास तिच्या आई-बाबांनी प्रोत्साहित केले. गोरेगावच्या विद्याविकास शाळेत शशिकलाने नाटकांमध्ये अभिनय केला. पुढे पाटकर महाविद्यालयात तिचे पदवीचे शिक्षण सुरू झाले. शिक्षण पूर्ण होताच तिचा चंद्रकांत वाटवे या उमद्या तरुणासोबत विवाह झाला. चंद्रकांत हे व्यवसायाने कमर्शिअल आर्टिस्ट. एक प्रकारे दोन कलाकारांचा सुखी संसार सुरू झाला. लवकरच या संसारवेलीवर कन्यारत्नरूपी फूल उमलले. बाळाच्या संगोपनात काही काळ गेला. मुलगी जरा मोठी झाल्यावर काहीतरी करावं असं वाटत होतं. मात्र नोकरी वा व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास नव्हता. हा आत्मविश्वास यावा यासाठी शशिकलाने एक व्यक्तिमत्त्व विकासाचा कोर्स केला. या कोर्सच्या आनुषंगाने शशिकलाने कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात हवं तसं यश मिळालं नाही.
दरम्यान मुलगी दहावीला गेली. मुलीकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरले. त्यामुळे सर्व काही बाजूला सारून मुलीवर लक्ष केंद्रित केले. मात्र काहीतरी केलं पाहिजे, हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. याच दरम्यान एका अॅपची जाहिरात यूट्यूबवर पाहण्यात आली. शशिकलाने तो अॅप डाऊनलोड केला. ऑनलाइन शॉपिंगचा तो अॅप होता. या अॅपच्या माध्यमातून तिने व्यवसाय सुरू केला. ओळखीचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांना ती अॅपच्या माध्यमातून वस्तू विकू लागली. मात्र या अॅपची सेवा नीट नव्हती. कॉटनची साडी मागवली, तर भलतीच साडी येऊ लागली. मागविलेल्या एखाद्या वस्तूऐवजी भलतीच वस्तू डिलिव्हर होऊ लागली. या वाईट अनुभवामुळे शशिकलाने तो अॅपच बंद करून टाकला.
पण आता पुढे करायचं काय, हा प्रश्न तसाच राहिला. आपल्याला कपड्यांच्या व्यवसायातच काम करायचे हे मनाशी पक्कं होतं. मग साडी या विषयातच काम करायचं ठरलं. शशिकलाच्या पतीने, चंद्रकांत यांनी सूरतहून साड्या आणून विकायची कल्पना सुचवली. मात्र सगळेच सूरतहून साड्या आणून विकतात. मग आपलं वेगळेपण ते काय…? असा प्रश्न होता. यातून एक कल्पना उदयास आली, ती म्हणजे आपला भारत देश हा साड्यांचा माहेरघर असलेला देश आहे. इथल्या प्रत्येक राज्यातील, प्रांतातील साडी वेगळी आहे. ती परिधान करण्याची पद्धत निराळी आहे. या साड्यांचा स्वत:चा इतिहास आहे. हे सर्व संशोधनाअंती कळल्यावर ठरलं की पारंपरिक पद्धतीच्या भारतीय साड्यांचाच व्यवसाय करायचा. पारंपरिक शब्दावरून चंद्रकांत वाटवेंनी नाव सुचवले, ‘एथनिक’ आणि इथूनच सुरू झाला ‘एथनिक फॅशन’चा प्रवास.
१ जानेवारी २०२० रोजी व्यवसाय सुरू झाला. हळूहळू जम बसतोय असं वाटत असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि सारं काही ठप्प झालं. मात्र शशिकला मात्र नव्या उमेदीने कामाला लागल्या. वेबिनार, ऑनलाइन, नेटवर्किंग मिटिंग्ज या माध्यमातून त्यांनी आपलं व्यावसायिक नेटवर्क वाढविण्यास सुरुवात केली. महिलांसाठी ऑनलाइन स्पर्धा घेतल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. शेकडो बक्षिसांचे वाटप केले. खास कोरोना योद्धा महिलांसाठी स्पर्धा आयोजित केली. त्याला देखील भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक झाले. वैद्यकीय, पोलीस, महानगरपालिका, शासन अशा विविध क्षेत्रांतील शेकडो महिला कोविड योद्ध्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला.
एथनिक फॅशन आता महिलांच्या फॅशनचा एक भाग झाला. शशिकला एक कवयित्री देखील आहेत. साडी संदर्भात रचलेलं काव्य आणि संबंधित साडी इतकी एकरूप होऊन जाते की, ही साडी जणू तिच्याच भावना व्यक्त करते की काय, असे वाटू लागते. शशिकला या साडीला जणू बोलतंच करतात. भविष्यात या साड्या विविध प्रदर्शनांमध्ये सादर करून साडी विक्रीला नवा आयाम देण्याचा शशिकला यांचा मानस आहे.
इंग्लिश-विंग्लिश चित्रपटात श्रीदेवीने लाडूचा उद्योग करणाऱ्या शशिकला या उद्योजिकेचं पात्र साकारलं होतं. त्या पात्रातील मेहनती, हुशार, कल्पक असणारी लेडी बॉस ही खऱ्या अर्थाने शशिकला वाटवे आहेत, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.