साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’, असे संतवचन आहे. सध्याच्या काळात साधू-संत कोण आहेत, हे ओळखणे सर्वसामान्य व्यक्तीला अवघड गोष्ट होऊन बसली आहे. मात्र आपल्या अमोघ वाणीने, कार्यकर्तृत्वाने, प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाने आपल्या सभोवताली असलेल्या सामान्य माणसाला आपलेसे करण्याची किमया ज्याला साधते, त्या व्यक्तींचा गौरव होतो. अशा मोजक्या व्यक्तींना देवमाणूस, भला माणूस म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे. असेच एक वेगळे चित्र मंगळवारी महाराष्ट्रात पाहावयास मिळाले. ‘ते आले… त्यांनी संवाद साधला आणि त्यांनी मराठीजनाची मने जिंकली…’ असे काहीसे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत करता येईल. मोदी यांनी मंगळवारी ‘महाराष्ट्र जिंकला’ असे एका शब्दातही बोलता येईल.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी हरिनामाच्या जयघोषात मोदी… मोदी… असा जयघोष दुमदुमला. ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. तुकारामांची पगडी परिधान करणारे पंतप्रधान मोदी हे जणू वारकरी संप्रदायातीलच एक असल्याचे तेथील प्रत्येकाला वाटत होते. देशाचा पंतप्रधान श्री क्षेत्र देहू येथील सोहळ्याला हजर राहील, याची याआधी कोणी कल्पना केली नव्हती. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही, तर भारताच्या सांस्कृतिक भविष्यालादेखील प्रशस्त करणार आहे’’, असे म्हटले तसेच ‘‘संत तुकाराम महाराजांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत’’, असे सांगून संत तुकारामांची महती पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विशेष म्हणजे आषाढी वारीसाठी २० जून रोजी तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पणाचा सोहळा संपन्न झाल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे.
या एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. “मी याआधीही राजभवनात आलो आहे. राजभवनाच्या इतिहासाला आधुनिकतेचे स्वरूप दिले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या अनुरूप शौर्य, आस्था, आध्यात्म आणि स्वातंत्र्य चळवळीच्या भूमिकेचेही दर्शन होते. इथून महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू केलेली जागा लांब नाही. या भवनाने स्वातंत्र्याच्या वेळी तिरंग्याला अभिमानाने फडकताना पाहिले आहे. आता जे नवीन रूप झाले आहे. त्यामुळे राष्ट्रभक्तीची मूल्ये आणखीन सशक्त होतील. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक सेनानी आणि महान व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीला आठवण्याची ही वेळ आहे”, या पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रभक्तीला स्फुल्लिंग देणाऱ्या भाषणाला महाराष्ट्रातील तमाम मराठीजनांनी दिलखुलास दाद दिली आहे.
देहू भूमीतील पंतप्रधानांचा वारकऱ्यांशी झालेला संवाद हा आजही नरेंद्र मोदी यांची जनमानसाच्या मनावर किती छाप आहे, हे दाखवणारा क्षण ठरला आहे. गेले आठ वर्षे पंतप्रधान पदावर विराजमान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून विकासाचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात साकारताना आता भारतीय जनतेला दिसत आहे. “हे विश्वची माझे घर” अशी संत ज्ञानेश्वरांची शिकवण आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आदर करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा जागतिक पातळीवरील वाढत जाणारा प्रभाव ही भारताच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. आज जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा आपत्तीजनक घटना घडते, त्यावेळी भारताची भूमिका काय आहे? याकडे जगातील देश आता मोठ्या आशेने पाहू लागले आहेत. कोरोना काळात जगातील अन्य देशांना लसीचा पुरवठा करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे जगातील अनेक देशांनी कौतुक केले आहे. रशिया-युक्रेन युद्धात भारताची भूमिका काय? याकडे दोन्ही देशांचे लक्ष लागले होते.
शेजारील लंका जेव्हा आर्थिक संकटात सापडली, तेव्हा मोठ्या भावाच्या नात्याने भारताने मदत केली आहे. २०२० साली ६४ अब्ज डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणूक भारतात झाली होती. मात्र २०२१ सालात यात १९ अब्ज डॉलर्सची घट होऊन देशात येणारी थेट परकीय गुंतवणूक ४५ अब्ज डॉलर्सवर आली. ही बाब भारतीय अर्थव्यवस्थेची चिंता वाढविणारी ठरते, असे दावे केले जात होते. मात्र परकीय गुंतवणुकीत इतकी मोठी घट झाली असली, तरी जागतिक पातळीवर सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताचे स्थान कायम राहिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘ट्रेड अॅण्ड डेव्हलपमेंट’ विभागाने ही आश्वासक माहिती दिली. त्याचप्रमाणे, पुढच्या दीड वर्षांत सुमारे दहा लाख जणांची भरती करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रालयांना दिले आहेत. याबाबतचा आराखडा पंतप्रधानांनी विविध मंत्रालयांकडून मागविला असून पुढच्या १८ महिन्यांत या नोकरभरतीसाठी जोरदार मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. मोदी यांच्या या निर्णयामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या देशभरातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
‘मोदी है तो मुमकिन है…’ हे पुन्हा एकदा दिसून येत आहे.