सुकृत खांडेकर
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या मोजक्या शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. पण त्यातून त्या अनेकांना धडा शिकवतात. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमृता यांनी ट्वीट केले. ‘अब देवेंद्र अकेला नहीं है, सारी कायनात उनके साथ है…।’ महाआघाडीतील नेत्यांनी अकेला देवेंद्र क्या कर सकता है। अशी खिल्ली उडवली होती, त्यावर अमृता यांनी एकच सणसणीत सिक्सर मारली. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निकालाच्या अगोदरच राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार खासदार म्हणून विजयी होणार असे ठामपणे म्हटले होते. निकालानंतर देवेंद्र फडणवीस हेच मॅन ऑफ द मॅच असतील, असे त्यांनी भाकीत वर्तवले होते. त्यांचे भविष्य वास्तवात उतरले. राज्यसभेसाठी शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार असे दोन उमेदवार मैदानात उतरवले होते. संजयचा पराभव होणार असे आशीष शेलारांपासून भाजपचे अनेक नेते उघडपणे सांगत होते. पण सत्तेच्या धुंदीत राहिलेल्या शिवसेनेने आजूबाजूला काय घडते आहे, हे नीट बघितलेच नाही. मुख्यमंत्रीपद आपल्याकडे आहे आणि राज्यात आपले सरकार आहे अशा गुर्मीत शिवसेना राहिली. एका संजयचा पराभव झाला. एक संजय पडता पडता वाचला. मुख्यमंत्र्यांना आपला उमेदवार निवडून आणता आला नाही, हाच संदेश देशभर गेला. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक झाली. सात उमेदवार रिंगणात होते. महाआघाडीकडे विधानसभेत एकशे सत्तर आमदारांचे बळ आहे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार आरामात निवडून आला. शिवसेनेने आपल्याकडे संख्याबळ नसताना दोन उमेदवार उभे करून जुगार खेळला. या जुगारात शिवसेना फसली. भाजपने तीन उमेदवार उभे करून मोठा धाडसी खेळ खेळला. उमेदवार उभे करण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक खेळी यशस्वी झाली. नियोजन व सूक्ष्म व्यवस्थापन यावर भाजपचा कटाक्ष होता. निवडणूक व्यवस्थापनात कामाचे वाटप पद्धतशीर व काटेकोर करण्यात आले होते. दुसरीकडे सत्तेच्या नशेने शिवसेनेला गाफील ठेवले. महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेला तुमचे तुम्ही बघा… असे म्हणून सोडून दिले. महाआघाडीकडे १७० आमदारांचे भक्कम पाठबळ असताना व एमआयएम व सपाने पाठिंबा दिला असताना शिवसेनेचा उमेदवार पडतो कसा आणि विजयी झालेल्या भाजपचे धनंजय महाडिक यांना जास्त मते मिळतात कशी?
महाआघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला ४२चा कोटा असताना त्यांच्या उमेदवारांना जास्त मते मिळतात, मग शिवसेनेला कोट्याएवढीही मते का मिळाली नाहीत? शिवसेनेने अपक्ष आमदारांना गृहीतच धरले होते. त्यांची आपल्याला मते मिळणारच असे सेनेचे गणित होते. निकालानंतर मात्र अपक्षांनी व छोट्या पक्षांनी आपल्याला दगा दिला असा कांगावा शिवसेनेने केला. अपक्षांनी सरकारला पाठिंबा दिला म्हणजे प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच मतदान करायला हवे असे नव्हे. पण याद राखा, सरकार आमचे आहे, बघून घेतो, दगाबाजी केली त्यांना मतदारसंघात निधी देताना विचार करावा लागेल… अशा धमक्या शिवसेनेने दिल्या. पराभव आपल्या चुकीमुळे झाला हे मान्य न करता अपक्ष आमदारांवर खापर फोडण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालवला.
अपक्ष आमदार असले तरी त्यांना तीन-चार लाख मतदारांनी निवडून दिले आहे. पण निकालानंतर अपक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम शिवसेनेने केले. कोणी कोणी आपल्याशी दगाबाजी केली, त्यांची नावेही जाहीर करण्यापर्यंत शिवसेनेची मजल गेली. शिवसेनेने नामोल्लेख केलेले काही अपक्ष शरद पवारांकडे धावले व आम्हाला बदनाम केले जात आहे, असा त्यांनी संताप प्रकट केला. निवडणुकीत घोडेबाजार झाला व आमदार विकले गेले असे आरोप झाले. मतदारांनी आमदारांना निवडून दिले ते काही घोडे म्हणून नव्हे याचे तरी शिवसेनेने भान ठेवायला हवे होते.
वसई-विरार पट्ट्यात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार विधानसभेत आहेत. त्याच ठाकुरांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत शार्प शूटर म्हणून ख्याती असलेल्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला शिवसेनेने उभे केले होते. वसई-विरार पट्ट्यातील दहशतवाद संपविण्यासाठी आपण येथे आलो आहोत, अशा वल्गना त्या पोलीस अधिकाऱ्याने प्रचारसभेत केल्या. तो पोलीस अधिकारी आता जेलमध्ये आहे व हितेंद्र ठाकूर ताठमानेने सर्वत्र फिरत आहेत. त्यांच्या बहुजन विकास आघाडीने शिवसेनेला मते दिली नाहीत, असा आज टाहो फोडला जातो आहे. गेल्या काही वर्षांपासून निवडणूक काळात आपल्या पक्षाच्या आमदारांना फाइव्ह स्टार हाॅटेलवर बंदिस्त करण्याची पद्धत सुरू झाली. आपल्याच पक्षाच्या आमदारांवर पक्षाचा विश्वास नाही का? मराठी बाणा सांगणाऱ्या शिवसेनेवर रिसाॅर्ट व फाइव्हस्टार हॉटेल्सचा आसरा घेण्याची पाळी का यावी? भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी निवडणुकीपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकून भाजपचे तीनही उमेदवार विजयी होतील, असे म्हटले होते. एक लाखाची पैज कोणी लावतेय का, अशी त्यांनी विचारणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील यांनी त्यांचे आव्हान स्वीकारले. निकालानंतर राहुल एक लाखाचा चेक घेऊन अरविंद देशमुख यांच्याकडे गेले, अरविंद यांनी त्यांचे स्वागत केले, पण त्यांनी देऊ केलेला चेक स्वीकारला नाही. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला अशी अवस्था शिवसेनेची झाली. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले, संजय राऊत काठावर वाचले. नाही तर सगळं उलटं झालं असतं…. धनंजय महाडिक जिंकले, कोल्हापुरात जल्लोष झाला. संजय राऊत जिंकूनही मुंबई शांत होती. महाडिक परिवारातील बावीसजण प्रचारासाठी राज्यभर फिरत होते. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार होते, त्या हॉटेलवर अन्य कोण कोण होते, याची पुसटशी कल्पनाही सेनेला नव्हती. विविध राज्यांत सत्ताधारी पक्षाला राज्यसभा निवडणुकीत यश मिळाले. राजस्थानात काँग्रेसला, हरयाणात भाजपला, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला यश मिळाले. मग महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव का व्हावा?
महाराष्ट्रात भाजपच्या यशात आशीष कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे. ते मूळचे शिवसेनेचे. शिवसेनेत असताना सुभाष देसाईंच्या समवेत स्थानिय लोकाधिकार समितीचे काम करीत असत. उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला केल्याने ते २००३ मध्ये काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेससाठी त्यांनी दिल्लीला जाऊन रणनितीकार म्हणून काम केले. काँग्रेसच्या २००९ च्या विजयात त्यांचा मोठा वाटा होता. २०१७ मध्ये ते भाजपमध्ये आले. सध्या ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. भाजपच्या पीयूष गोयल व अनिल बोंडे यांना ४८ चा कोटा देण्याची कल्पना त्यांचीच. देवेंद्र फडणवीस व अश्विनी वैष्णव यांना ती पटली व अमलात आली. त्याचा लाभ महाडिक यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी झाला. शिवसेनेने गमावलेल्या रणनितीकाराने भाजपला विजय मिळवून दिला.
sukritforyou@gmail.com
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…