गेले दोन वर्षं कोरोनाच्या संकटामुळे ओस पडलेला शाळेचा परिसर आता पुन्हा गजबजू लागला आहे. दिवाळीची सुट्टी असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीचा असो. हा कालावधी वगळता वर्षभर शाळा बंद ठेवण्याची वेळ बहुधा शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोरोना काळामुळे आली असावी. शाळेच्या भिंतींनीही विद्यार्थी शिक्षकांच्या गैरहजेरीत एवढा प्रदीर्घ काळ शांततेत व्यतित केला नसावा. यंदा शाळेची घंटा पुन्हा वाजली. मुलांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. ऑनलाइन क्लासेस आणि ऑनलाइन परीक्षेचा अनुभव घेतलेले विद्यार्थी आता शाळेच्या वर्गात बसून पुन्हा शिकवणी घेणार आहेत.
शालेय जीवनात मैत्रीचे एक पर्व असते. वर्गातील पेद्या सुदामाला त्यांना शाळेच्या वेळेत भेटता येणार आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्राथमिक शाळेचे वर्ग मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांत सुरू झाले आहेत. माध्यमिक शाळेचे वर्ग १५ जूनपासून प्रत्यक्ष भरणार आहेत. विदर्भातील कडाक्याचे तापमान असल्याने तेथील शाळा १७ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे विदर्भ वगळता राज्यभरातील पूर्णवेळा शाळा सुरू झाल्या आहेत, असे म्हणावयास हरकत नाही. केजीपासून दहाव्या इयत्तेपर्यंतची मुले प्रत्यक्ष शाळेत जाण्यासाठी निघाल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. काही शाळांनी पहिल्या दिवशी पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आता नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचे वेळापत्रक घरोघरी तयार होताना दिसेल.
मुंबईसारख्या महानगरात स्कूल बसमधून बहुतांश मुले शाळेत जातात. त्यामुळे त्यांना स्कूलबसपर्यंत सोडणे आणि शाळेतून घरी सुटल्यानंतर पुन्हा स्कूलबसची वाट पाहत राहणे हाही घरातील आई किंवा वडीलधाऱ्यांचा दिनक्रम असतो. मात्र, सांताक्रूज येथील पोद्दार स्कूलची बस चार तास गायब झाल्याची घटना आजही पालकांच्या डोळ्यांसमोर ताजी आहे. त्यामुळे अनेक पालकांनी स्कूलबस कोणत्या मार्गाने जाते याची माहिती मिळावी यासाठीचे जीपीएस यंत्रणा बसवून घेतली आहे याची खातरजमा करण्यास शाळेकडे सुरुवात केल्याचे सांगण्यात येते.
दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कोविडचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. आजही राज्यात एक १ हजार आठशेहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत, तर मुंबई महानगरात कोविडच्या नव्या रुग्णांची संख्या अकराशेच्या आसपास आहे. राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळांसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. शाळा सुरू झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यांच्या संदर्भात योग्य खबरदारी घेण्यात यावी यासाठी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचे वक्तव्य आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्याबरोबर आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांवर आली आहे.
मास्कची सक्ती नसली तरी, मास्कचा वापर मुलांना करण्याची सवय लावण्याची आता गरज आहे. ज्या विद्यार्थ्यांची तब्येत ठीक नसेल त्याला शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घ्यायला हवा. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे इतर मुलांना संसर्ग होऊ नये याची काळजी शाळा व्यवस्थापन आणि पालकांना घ्यावी लागणार आहे. कोविडचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाकडून जी नियमावली दिलेली आहे त्याची शाळांमध्ये योग्य अंमलबजावणी करण्याचे काम शाळा व्यवस्थापनाला करावे लागणार आहे. शाळेतील स्वच्छता, सॅनिटायझरची फवारणी, मुलांची सुरक्षित आसन व्यवस्था याकडे शाळेला लक्ष द्यावे लागणार आहे.
त्याचबरोबर शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाळेच्या वेळेत मुलांशी संपर्क येतो. त्यांना मास्क सक्ती नसली तरी, शाळेच्या वेळेत किमान शिक्षक वृंद आणि स्टाफ यांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन काही शाळांना केले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि विद्यार्थ्याच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवी नियमावली तयार करायला हवी. ही नियमावली सर्वच शाळांना बंधनकारक असायला हवी. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येत असला तरी सध्या तरी राज्यात भीतिदायक चित्र नाही. कोरोनाचे संकट गेलेच असेच मुलांना आणि पालकांना वाटत आहे. तरीही धोका टळलेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत असल्याने शाळेला तसेच पालकांना मुलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.