नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा आघाडीचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये गोल करण्यात धडाकेबाज कामगिरी केली आहे. मंगळवारी हाँगकाँगविरुद्ध एएफसी आशियाई कपच्या पात्रता सामन्यात छेत्रीने ८४ वा गोल केला. या गोलमुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. यासोबतच सुनील छेत्रीने रिअल मॅड्रिडचे दिग्गज आणि हंगेरीचे फुटबॉलर फेरेंक यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोच्या नावे ११७ गोल आहेत. मेस्सी चौथ्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीने अजून सहा गोल केल्यास तर मेस्सीलाही मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. सध्या इराणचे अली देई १०९ गोलसोबत दुसऱ्या क्रमांकावर आणि मलेशियाचे मुख्तार दाहरी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मुख्तार दाहरीने आपल्या करिअरमध्ये ८९ आंतरराष्ट्रीय गोल केले.
सुनील छेत्रीने याआधी ऑक्टोबर २०२१ मध्ये पेले यांच्या ७७ गोलचा रेकॉर्ड मोडला होता. छेत्री सध्या सक्रीय असणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी फक्त रोनाल्डो आणि मेस्सीच्या मागे असून यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.