Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यसोडतीनंतरही इच्छुकांची धाकधूक

सोडतीनंतरही इच्छुकांची धाकधूक

सीमा दाते

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. प्रभागांच्या आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर आता सगळ्यांच पक्षांची ओढाताण सुरू आहे. ३१मे रोजी प्रभागांची सोडत निघाल्यानंतर ६ जूनला हरकती आणि सूचना पाठवण्यासाठीची शेवटची तारीख होती. या वेळी २३२ हरकती आणि सूचना पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. मात्र या हरकती आणि सूचना पाहता अनेकांना आरक्षणाची तक्रार असल्याचे पाहायला मिळत आहे.

महापालिकेतील २३६ प्रभागांपैकी १०९ जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवून त्या अंतर्गत सोडत काढण्यात आली. यामध्ये पूर्वी जे प्रभाग महिला आरक्षित झाले नव्हते ते प्रभाग प्राधान्य क्रम १ व २ नुसार अनुक्रमे ५३ व ३३ अशा प्रकारे ८६ जागांवर महिला आरक्षण निश्चित केले, तर उर्वरित २३ जागांवर चिठ्ठी पद्धतीने २३ जागांसाठी सोडत काढण्यात आली. दरम्यान अनुसूचित जातीच्या १५, अनुसूचित जमातीच्या २ प्रभागांची निश्चिती करण्यात आली. त्यामधून अनुसूचित जातीच्या ८ आणि अनुसूचित जमातीच्या १ महिला प्रभागासाठी लॉटरी काढण्यात आली आहे, तर सोडतीनंतर देखील अनेक हरकती आणि सूचना उपस्थित केल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे २०१७मध्ये प्रभाग खुले होते ते आरक्षित केले आहे आणि आरक्षित होते ते खुले करण्यात आले आहेत. मात्र या हरकती आणि सूचनासाठी ६ जूनची अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र २३२ सूचना आणि हरकती प्राप्त झाल्या आहेत. यात अनेक तक्रारी आल्या आहेत.

तर या तक्रारींमध्ये प्राप्त झालेल्या सूचनांमध्ये एकूण ५४ हजार लोकसंख्येपैकी केवळ पाच हजार लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे, असा प्रभाग असेल तो सर्वसाधारण करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. काही प्रभागांमध्ये तर प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. यामुळे पुरुष वर्गावर अन्याय झालेला असल्याची ही तक्रार करण्यात आली आहे, तर दुसरीकडे मुलुंड विभागातील अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या म्हणजे (७१३७) या प्रभागात असल्याने हा प्रभात अनुसूचित जातीकरिता आरक्षित होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आळीपाळीने आरक्षण पद्धती अवलंबलेली नाही, असे दिसत आहे अशी देखील हरकत उपस्थित केली आहे. तर हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित केला आहे, त्यावर पुनर्विचार करण्याची सूचना करण्यात आली आहे. या प्रभागाच्या अानुषंगाने संबंधित एकूण ९४ तक्रारी आलेल्या आहेत. तर एकाच प्रकारच्या पत्राच्या अनेक तक्रारदारांनी नाव आणि पत्ता बदलून देखील तक्रारी केल्या आहेत. मात्र या सगळ्याच तक्रारींवर चर्चा केल्यानंतर १३ जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मात्र या आधीच आता राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. आपले प्रभाग राखण्यासाठी इच्छुक आणि माजी नगरसेवकांची ओढाताण सुरू आहे. आपल्या नेत्यांकडून तिकिटांसाठी शिफारसी लावल्या जात आहेत. मात्र आता या शिफारसीनंतर १३ जूनला सोमवारी राजपत्रात यादी जाहीर केली जाणार आहे, त्यानंतर नेमकं काय होतं आणि कोणासाठी जागा खुली होते ते पाहावं लागणार आहे. या निवडणुकीत शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टी हे ७ पक्ष जरी असले तरी मुख्य निवडणूक सेना-भाजपमध्ये होणार आहे आणि म्हणूनच सगळ्यात जास्त रस्सीखेच ही शिवसेना-भाजपमध्ये पाहायला मिळते आहे, तर यावेळी आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीनिशी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उतरणार आहे. पश्चिम उपनगरात, तर आम आदमी पार्टीची तयारी देखील झाली आहे.

उपनगरातील झोपडपट्टी परिसरात आम आदमी पक्ष टार्गेट ठेवून आहे. त्यामुळे वसाहती, झोपडपट्टी, चाळी यांमध्ये आम आदमी पक्षाचे नेते, कार्यकर्ते स्वत: उतरत आहेत, तर भाजप आणि मनसे एकत्रित लढणार का? यावर जरी शिक्कामोर्तब नसले तरी

अंतर्गत युतीमुळे एकमेकांना मदत करणार आहेत, तर दुसरीकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याची शक्यता आहे, तर आता मात्र सगळेच आपल्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे सोमवारी आता नेमकं काय होतंय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -