Monday, July 22, 2024
Homeमहत्वाची बातमी“शेअर बाजारातील मंदी कायम”

“शेअर बाजारातील मंदी कायम”

डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजारात बाऊन्स बॅकनंतर या आठवड्यात पुन्हा एकदा घसरण पाहावयास मिळाली. निर्देशांक निफ्टीने या आठवड्यात १६६११ हा या आठवड्यात उच्चांक नोंदविला. पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांक काही काळासाठी रेंज बाऊंड राहू शकतात. अल्पमुदतीच्या चार्टनुसार १५९०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी असून जर ही पातळी तुटली तर निफ्टीमध्ये आणखी मोठी घसरण होऊ शकते. सध्या मात्र १५९०० या पातळीकडे लक्ष ठेवून व्यवहार करणे आवश्यक आहे. निफ्टी १६५०० ते १५९०० या पातळीत काही काळ वेळ घालवू शकतात. त्यामुळे १६५००च्या वर जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये मोठी तेजी येणार नाही. दीर्घमुदतीच्या चार्टनुसार मात्र निर्देशांक आणखी मोठ्या मंदीचे संकेत देत असून जर दीर्घमुदतीच्या चार्टनुसार १५६७० पातळी तुटली, तर मात्र निफ्टीमध्ये ८०० ते १००० अंकांची मोठी घसरण होऊ शकते. ज्यामध्ये निफ्टी १४५०० पर्यंत खाली येऊ शकते.

रिझर्व्ह बँकेने अपेक्षेनुरूप रेपो दरात थेट अर्धा टक्क्यांची वाढ करून तो सध्याच्या ४.४० वरून ४.९० टक्क्यांवर नेण्याचा निर्णय पतधोरण समितीच्या बैठकीत या आठवड्यात घेण्यात आला. महिनाभराच्या अवधीत सलग दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ केलेली आहे. रेपो दरात जरी वाढ केलेली असली तरी रोख राखीव प्रमाण अर्थात सीआरआर ४.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलेले आहे. यावेळी महागाई दराच्या अनुमानात देखील वाढ करण्यात आली. २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर ५.७ टक्क्यांवरून वाढवत ६.७ टक्क्यांवर नेला आहे, तर अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ७.२ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलेला आहे. रेपो दर वाढीमुळे आता कर्ज महाग होणार असल्यामुळे त्याचा परिणाम घर खरेदीवर देखील दिसून येईल. जागतिक पातळीवर वाढत असलेले खनिज तेलाचे भाव, परकीय गुंतवणुकीचे होत असलेले निर्गमन याचा परिणाम या आठवड्यात रुपयावर देखील दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने या आठवड्यात ऐतिहासिक नीच्चांकी पातळी गाठली. सध्या वाढत असलेले कच्चे तेल ही शेअर बाजाराच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ होत आहे. यातच घाऊक महागाई दराचे आकडे या महिन्यात आले. त्यानुसार महागाई दराने १७ वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली. खनिज तेल, अन्नधान्य, इंधन, नैसर्गिक वायू, इत्यादी किमती मागील वर्षाच्या तुलनेत खूप जास्त वाढलेल्या आहेत. तसेच भारतात व्याजदरासाठी महत्त्वाचा असणारा किरकोळ महागाई निर्देशांक देखील वाढलेला आहे. रिर्व्ह बँकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी याच महिन्यात रेपोदरात वाढ केलेली आहे. देश-विदेशात सुरू असणाऱ्या प्रतिकूल घटना, वाढत असलेले कच्चे तेल अमेरिकेतील बँकेकडून केलेली व्याजदर वाढ, यात सुरू असलेली विदेशी गुंतवणूकदारांची विक्री या सर्व घटकांचा परिणाम म्हणून रुपयामधील घसरण सुरूच आहे. आपण मागील लेखातच सांगितल्याप्रमाणे महागाईचा भडका आणि व्याजदरात होत असलेली वाढ यातून पुढील काळात अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता आहे.

सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा आणि गती मंदीची आहे. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसीस) मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार बजाज टेलिफिल्म्स, टेस्टी बाईट, ग्रासिम, जागरण प्रकाशन यांसह अनेक शेअर्सची दिशा अल्पमुदतीसाठी मंदीची आहे. मागील आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या घसरणीनंतर “श्रीसिमेंट” या शेअरने २०११३ ही पातळी तोडत मंदी सांगणारी रचना तयार केलेली असून आज १९१७८ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात आणखी घसरण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे योग्य स्टॉपलॉस ठेवून यामध्ये मंदीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ९१०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी वाढ होऊ शकते. या आठवड्यात सोन्यात देखील घसरण झालेली आहे. त्यामुळे अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा आता मंदीची झालेली असून अल्पमुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५१००० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यात मोठी घसरण होणार नाही.

निर्देशांकानी मोठ्या मंदीचे संकेत दिलेले असल्यामुळे पुढील काळात शेअर्स खरेदी किंवा विक्री करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर करूनच व्यवहार करावेत. पुढील काळात निर्देशांकात होणाऱ्या घसरणीत दीर्घमुदतीसाठी योग्य शेअर निवडून निर्देशांकांची दिशा आणि गती बघून टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

samrajyainvestments@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -